ग्धा धावत घरात शिरली आणि तिने बॅग सोफ्यावर टाकून दिली.
मुग्धा: “आई भूक लागली.”
आई: “मुग्धा काय हे!!! बॅग नीट ठेव आधी मगच जेवण.”
मुग्धा: “आई एव्हढं काय अडतं…”
आई: “शिस्त असली पाहिजे बाळा. घर व्यवस्थित दिसलं पाहिजे ना. दुसऱ्यांसाठी नाही. आपल्या मनाला बरं वाटतं.”
मुग्धा ने कंटाळत बॅग जागेवर ठेवली.
मुग्धा: “ठेवली आता दे जेवण.”
आई: “अगं कपडे बदल, हात पाय धु.”
मुग्धा: “ते करते ग मी…”
मुग्धा हात पाय धुवायला गेली. इकडे मुग्धाने ठेवलेली बॅग टेबलवरून खाली कोसळली. आणि बॅगेची चेन पण लावली नव्हती म्हणून काही पुस्तकं बाहेर पडली. आईने डोक्यावर हात मारला आणि ती बॅग उचलायला गेली. बॅग उलटी पडली होती त्यामुळे आईने पटकन बॅग उचलताच सगळं सामान बाहेर पडलं.
आई: “काय हे.” असं म्हणत आईने बॅग नीट आवरायला घेतली. मुग्धाला सगळ्याचे क्लास लावले होते त्यामुळे आईला फार अभ्यासात लक्ष घालावं लागत नसे. मुग्धा होती पण चुणचुणीत आणि अभ्यासात हुशार त्यामुळे काहीच टेन्शन नव्हतं. आईने म्हटलं बघूया हिच्या वह्या. आणि ती एक एक वही चाळायला लागली. तिने काही वह्या बघितल्या. मुग्धाचं हस्ताक्षर बघून ती खुश झाली. बऱ्याच उत्तरांना पैकी च्या पैकी मार्क्स होते. आई समाधानाने एक एक वही बघत होती. तिने हिस्टरी च बुक ठेऊन द्यायला उचललं आणि अचानक त्या पुस्तकातून पैसे जमिनीवर पडले. आईने आश्चर्याने पैसे उचलले. पूर्ण २१० रुपये होते ते. आईला आश्चर्य वाटलं. आपण तर मुग्धाला पैसे देतच नाही. मग तिच्याकडे एव्हढे पैसे कुठून आले…