Intense Marathi Articles

आठवणींच्या जाळ्यात

मधल्या जागेतून तेव्हाच्या स्वयंपाक घरात जाताना वाटेत आई म्हणजे माझी आजी आदाळयावर करली कापत बसलेली असतांना दिसते ….. ते माशाचं सळसळण … आणि वाटतं बरंच काही हरवलंय….. शनिवारची अर्धा दिवस शाळा… मम्मी घरी असल्याची गोडुली भावना… तिने काहीतरी स्पेशल च बनवलेलं असत… कधीचा तरी चविष्ट अंडा राइस आठवतो… आणि गोड शेवयांचा जर्मन चा डब्बा… असं वाटतं बरंच काही हरवलंय… चार वर्ष मोठ्या दादाने मेहनतीने खांद्यावर उचलून आणलेलं असतं मला शाळेतून…आणि एक रस्त्यावरची आगावू बाई म्हणते “एवढी मोठी झालीस… चालता येत नाही ?” मला आपलं उगाच वाटतं हिला माझं सुख बघवत नाहीय… शाळेत जायचं नसलं की अर्ध्या रस्त्यावर पोटात दुखायचं नाटक… की दादा परत घरी आणणार… आठवलं की वाटतं बरंच काही हरवलंय…