‘शेवटी आज तो दिवस आला… आज तर खात्रीच झालीय मला! किती सोहळा केला होता तिला आणताना.. एका सहित सगळं संपवलं. तिने वळूनही नाही बघितलं जाताना. भांडणं, मतभेद काय नवरा बायकोत होत नाहीत… एव्हढं काय बिनसलं! इतका दुस्वास… ‘
राहुलला कळेना आपल्या आयुष्यात होतंय काय. एक एक करत पत्ते कोलमडत होते आणि घर उध्वस्त होत होतं. हातातून वाळू निसटून जावी तसा आयुष्याचा लगाम हातातून सुटत चालला होता. एक व्यावसायिक नाटक येणार होतं दिग्दर्शक म्हणून… तेव्हाच का कोरोना यावा आणि सगळं उत्पन्नच थांबून जावं.. बायको, व्यवसाय सगळं सुटलं आणि एका अथांग खोल डोहासारखं आयुष्य घाबरवत राहिलं. ‘स्वप्न पडतात चित्र विचित्र.. झोपेतही शांतता नाही.. देव आहे का? आणि तो असेल तर त्याला हवंय काय? आणि तो नसेल तरी मीच का? सगळं माझं बॅड लक. मी अनलकी आहे.’ टॅक्सी घराजवळ पोहोचेपर्यंत राहुलला भानच नव्हतं.
तो घरी पोचला आणि त्याच्या मैत्रिणीचा शीतलचा फोन आला.
शीतल: “काँग्रॅट्स”
शीतलचा टेक इट इझी स्वभाव त्याला माहित होता. पण हे अतीच झालं होतं. तो चिडला
राहुल: “काय वेड बीड लागलंय काय?”
शीतल: “अरे कायमची कटकट गेली आयुष्यातून. आता एन्जॉय कर लाईफ…”
राहुल: “तू काय बडबडते आहेस तुला कळतंय का..सुधारणार नाहीस तू”
शीतल: “स्कोपच नाहीय सुधारायला अजून. पण तुला खूप सुधारायचंय अजून.”
राहुल: “इतकं सोपं नाहीय.”
शीतल: “कठीण डोंगर चढायलाच मजा येते..माहितेय का.”
राहुल: “आय ऍम नोव्हेअर…”
शीतल: “आताच जन्म झालाय असं समज आणि नव्याने जगायला लाग. लकिली तू मोठाच आहेस. आईवर अवलंबून राहायला नको. हा हा”
राहुलने रागाने फोन कट केला.
यापुढे राहुल एक सतत वैतागलेला चिडचिडा मुलगा झाला. आईवर चिडत राहायचा. सतत त्याला तब्बेतीचे प्रॉब्लेम्स व्हायला लागले. हळू हळू तो यातून बाहेर यायला लागला. मित्र मैत्रिणींशी गप्पा व्हायला लागल्या. पण गप्पांमध्ये सतत तो स्वतःच्या आजारांविषयी बोलत राहायचा. मित्र मैत्रिणी याने कंटाळून लांब होत गेले. त्यालाही जाणवलं सगळे टाळताहेत. तसंही आजच्या गतिमान जगात कोणाला कोणासाठी वेळ असतो? रविवारी नातेवाईकांच एकमेकांच्या घरी जाणं संपुष्टात आलंय. व्हॉट्सऍप ग्रुप वर फक्त एकमेकांच्या आनंदाचे फोटो शेअर करायचे आणि विनोद करायचे. राहुलने कंटाळून फेसबुक, व्हॉट्सऍप सगळं बंद करून टाकलं. जवळच्या काही मित्र मैत्रिणींशी जे त्याला समजून घेत होते, त्याचा कान बनत होते फक्त त्यांच्याशी फोनवर संवाद ठेवला त्याने. केलेली बचत आणि आईला मिळणारी बाबांची पेन्शन यावर घर चाललं होतं. राहुलने तब्बेतीच्या समस्यांसाठी रेकी, मानसोपचार तज्ञ असे उपाय करायला सुरुवात केले. पण फरक पडत नव्हता. रात्रीची झोप लवकर यायचीच नाही. तळमळत राहायचा तो. बायकोच्या आठवणी डोळ्यांसमोर तरळत राहायच्या. मानसिक शारीरिक गरजा छळत राहायच्या… कॉलेजच्या काळात आणि त्यानंतर त्याने खूप केलं होतं. नाटकं, लिखाण खूप. नंतर त्याने रेडिओ स्टेशन वर आर जे म्हणून व्ययसाय स्वीकारला होता. पण करोनाने ते बंद पडलं. तो महाविद्यालयाच्या स्पर्धांची नाटकं दिग्दर्शित करायचा तेही बंद झालं. करोना कधी जाईल काहीच कळत नव्हतं. आणि या खोल गर्तेच्या आयुष्यात तो प्रश्न आ वासून उभा राहिला ‘जगायचं कशासाठी?’ हळू हळू राहुलला सगळं मिथ्या वाटायला लागलं. रिकामे अर्थहीन सकाळ संध्याकाळचे फेरे. मानसोपचार तज्ज्ञांच्या औषधाचेही परिणाम होई ना. तो एका न संपणाऱ्या खोलात आत आत जात होता. दिवस जात होते तशी खोली अजून गहिरी होत होती. आयुष्याचा प्राणवायू कमी कमी होत होता. आणि मरण आपलंसं वाटायला लागलं होतं. सगळं बॅड लक….
एक दिवस राहुल शून्यात नजर लावून बसला होता. आई बाजारात गेली होती. त्याला एकदम मरणाची ओढ लागली. माझ्यासारख्या बॅड लक असणाऱ्या माणसाने जगून काय उपयोग. तो स्वयंपाक घरात गेला. त्याने तिथला धारदार चाकू उचलला. तितक्यात त्याचा फोन वाजायला लागला… आधी त्याने दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. पण फोनची रिंगटोन कर्कश्यपणे त्याच्या कानात शिरत होती. त्याने चाकू ठेवला आणि तो दिवाणखान्यात फोन जवळ आला. शितलचा फोन होता. त्याने उचलला.
शीतल: “अरे राहुल ऐक ना. कोणीतरी तुझा नंबर मागतंय देऊ का?”
राहुल: “कोणीतरी म्हणजे कोण?”
शीतल: “ऐकून तुला मस्त वाटेल. देते हा मी फोन नंबर. एका मिनिटाच्या आत फोन येईल. फोन टाकू नको इकडे तिकडे.”
राहुल: “अगं पण कोण ते तरी…”
तिने फोन ठेवून दिला
राहुल: “ही मुलगी ना..”
एक मिनिटाच्या आत राहुलचा फोन वाजला. राहुलने उचलला.
बाई: “बेटा राहुल… कैसे हो?”
राहुल: “कौन?”
बाई: “अरे हम आपका “रात की सफर” प्रोग्राम सुनते थे रेडियो पर. बहोत सुकून मिलता था. हम सब नारी विकास केंद्र की महिलाएं है. हमारा कोई नही इस दुनिया मे बेटा.. औरो को भी बात करनी है.. देती हूं।”
दूसरी बाई: “राहुलजी. आपका प्रोग्राम बहोत बढ़िया था। जैसे दिल से और अच्छी बातें करते थे ना मस्त लगता था। मैंने भी फोन किया था आपके प्रोग्राम में एक बार। “
अशाच अनेक बायका राहुलशी बोलल्या… राहुल आनंदी आणि नम्र झाला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकू लागलं. तो फोन ठेवून वळला तितक्यात शितलचा फोन आला..
शीतल: “म राहुल.. एव्हढे सगळे फॅन्स मजा आहे तुझी.”
राहुल फक्त समाधानाने हसला.
शीतल: “बघ.. नकळत तू अनेक जणांचा मित्र आणि आधार बनला आहेस. अरे आम्ही तर ऑफिसला जाऊन पाट्या टाकतोय. आणि तू अनेकांचा हिरो..”
राहुलच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
राहुल: “सांगू का तुला मी.. मी आत्महत्या करणार होतो.”
शीतल: “कधी????”
राहुल: “आत्ताच तुझा फोन येण्यापूर्वी.”
शीतल: “बावळट किती फॅन्सनी आत्महत्या केली असती तुझ्या मागे.”
राहुल हसला..
शीतल: “मूर्खासारखं काही करू नकोस. नोकरी, साथीदार, मुलं हेच काही परिपूर्ण आयुष्य नाही.. खूप आहे जगात करण्यासारखं. आणि तू आधीच लोकांना आधार दिलायस तुझ्या कार्यक्रमांमधून. जाईल करोना सगळं नीट होईल. उपाशी मरत नाहीस ना. मस्त ब्रेक आहे हा. काहीतरी छान प्लॅन कर. जे मग सादर करता येईल… कळलं ?”
राहुल: “सॉरी यार.. मी खूप मोठी चूक करणार होतो. तू वाचवलस मला. “
शीतल: “अरे देव तारी त्याला कोण मारी.. वाचलास.. म्हणजे खूप लकी आहेस लक्षात ठेव.”
बोलून राहुलने फोन ठेवला. आणि तो स्वतःशीच बोलला “हो खूप लकी आहे मी…”