रम्य ते बालपण आणि रम्य ते शाळेचे दिवस असं म्हटलं जातं. पण माझं डोकं नेहमीप्रमाणे उलटंच फिरतं. कधी कधी वाटतं देवाने माझा मेंदुच वेगळ्या पदार्थाचा बनवलाय. मला आठवतो शाळेचा पहिला दिवस. जेव्हा मी एकसारखे कपडे घातलेल्या कळपाचा भाग बनले. आणि एका मुलीने मी ग म भ न लिहीत असलेली पाटीच पुसली. ही एक गोष्ट चांगली झाली. जगात वावरताना खायच्या टप्प्या टोमण्याचं ट्रेनिंग इथे सुरू झालं. मित्र मैत्रिणी खूप छान मिळाले. पण त्यांचे पहिला दुसरा असे नंबर असतात हे नव्याने कळलं. मला तर वाटायचं देवाची प्रत्येक निर्मिती अप्रतिमच असेल. प्रत्येक नमुना खास…स्वतःच अस्तित्व निर्माण केलेला. मग हे नंबर कशाला हा तेव्हा पडलेला प्रश्न मला अजूनही डाचतो. आता तर शाळेतच पैशाचं महत्व कळतं. “पैसा फेको नॉलेज लो” हे शाळांच ब्रीदवाक्य केलं पाहिजे.
असो. एकसारखे कपडे घातल्यावर शिक्षकांनी मुलांना एकसारखी वागणूक दिली तर काही उद्देश साध्य होईल ना. शाळेतले टवाळखोर टगे माझ्या नेहमी कुतुहुलतेचा विषय राहिले….एव्हढी स्पर्धा लावली असताना ते मस्तमौला बिनधास्त स्वतःच आयुष्य हवं तसं जगत असत. तो बिनधास्तपणा माझ्याकडे असता तर कदाचित मला लावलेले नंबर दिसले नसते..माणूस खूप काळ कुठल्याही खोलीत बसण्यासाठी पूरक बनलाय असं मला अजिबात वाटत नाही. पण शिस्त यशस्वी होण्यासाठी लावली पाहिजे असं म्हणतात. पण यश म्हणजे काय आणि यशस्वी झाल्यावर काय कायापालट होतो हे माझ्या कोत्या बुद्धीला न समजे…असो…फार लिहीत नाही नाहीतर शाळाप्रेमी माणसं माझ्यावर टीकास्त्र उगारतील… धन्यवाद