Marathi Short Stories

मनाच्या कुपीत

आसावरी धावत धावत रिझल्ट लावलेल्या बोर्डकडे गेली. गर्दीत पुढे घुसून ती लिस्ट वर आपलं नाव शोधू लागली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. लिस्टवर तिचं बोट फिरू लागलं आणि तिच्या नावावर येऊन थांबलं. “सी ग्रेड”… ती ढासळली. एव्हढी मेहनत केली होती. सर पण म्हणाले होते, “बी ग्रेड” तरी मिळेल. पण एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षेत “सी ग्रेड” आणि इंटर्मिजीएट ड्रॉईंग परीक्षेतही “सी ग्रेड”. तिचे डोळे पाण्याने भरून आले…. ती आपला चेहरा लपवत वॉशरूम मध्ये गेली. दरवाजा बंद करून ती ओकसाबोक्शी रडू लागली. तिचं आयुष्य हादरलं होतं. चित्रकला तिचं पाहिलं प्रेम होतं. ती हरवून जात असे चित्र काढताना…ती बॉर्न टॅलंटेड नव्हती. पण तिने खूप मेहनत केली होती. पण… नशिबाच्या आधी आणि नाशीबापेक्षा जास्त कोणाला काय मिळतं??

आसावरीने डोळे पुसले. चेहरा धुतला आणि ती बाहेर आली. शाळा सुटली होती. तिच्या मैत्रिणी तिची वाट बघत होत्या. रस्त्यावर चालताना मस्ती मजा चालली होती. सगळे खुशीत होते. निमिताला अनपेक्षितपणे “बी ग्रेड” मिळाला होता. म्हणून ती एकदम खुश होती. इथे आसावरीला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. चेहऱ्यावर खोटं हसू आणून ती मैत्रिणींबरोबर चालली होती. पण खोल मनात तिला वाटत होतं हे दुःख कधी संपेल का???

आसावरी घरी आली. तिची आई स्वयंपाक घरात काम करत होती. तिने धावत जाऊन आईला मिठी मारली आणि ती रडायला लागली. आईला काळजी वाटली. आसावरीला जवळ घेऊन तिने विचारलं
आई: “काय झालं आशु?”
आसावरी रडतच राहिली. काही सांगेना… आईला खूप काळजी वाटली. हुंदके आवरत आसावरी बोलली
आसावरी: “मला इंटर्मिजीएट ड्रॉईंग परीक्षेतसुद्धा “सी ग्रेड” मिळाली.
आई: “ओह… ठीक आहे ना आशु. जाऊदे आयुष्य खूप मोठं आहे. एका परीक्षेचं एव्हढं मनावर घेऊ नको.
आसावरी: “मला चित्रकला खूप आवडायची ग!!!”
आई: “आवडायची म्हणजे??? ती एक परीक्षा निर्णय देणार का???”
आसावरी: “आई खूप वाईट वाटतंय ग मला.”
आई: “हो ग बेटा!”
आणि आईने आसावरीला खूप वेळ मिठीत ठेऊन रडू दिलं.

दहावी होती आसावरीची. तिने कमर्शिअल आर्ट्सला जायचं ठरवलं होतं. ती बॉर्न टॅलंटेड नव्हती पण आवड तीच होती तिची. खूप मेहनत घेतली होती तिने. पण आता तिला कळेनासं झालं काय करायचं. कमर्शिअल आर्ट्सला जायची तर तिची हिम्मत राहिली नव्हती.

दिवस रात्र तिच्या मनात हाच विचार घोळत राही. पुढे काय करायचं??? तिला काहीच सुचत नसे. चक्रासारखे विचार तिच्या डोक्यात फिरत राहायचे. तिला विचार करून करून खात्री वाटायला लागली ती आयुष्यात काही करू शकत नाही. आणि तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोळायला लागले.

स्नेहलला जाणवायला लागलं होतं आसावरी बदलतेय. ती अबोल झाली होती. पूर्वीसारखी बोलत नव्हती. तसा त्यांचा पाच जणींचा ग्रुप होता. पण स्नेहलला आसावरी जास्त जवळची होती. आसावरीला “सी ग्रेड” मिळाल्याबद्दल ती फार काही बोलली नाही तिच्याशी, कारण तिला माहीत होतं आसावरीला वाईट वाटलं असणार. पण आता आसावरीशी बोलणं भाग होतं. तिच्यातले बदल त्रासदायक होते. एकदा सगळ्या घरी येत होत्या आणि स्नेहलने आसावरीच्या खांद्यावर हात ठेवला.
स्नेहल: “आशु काय झालंय तुझं?”
आसावरीने स्नेहलकडे बघितलं आणि रडायलाच लागली. स्नेहल तिला पटकन बाजुला घेऊन गेली
स्नेहल: “आशु… काय ग हे…बोल माझ्याशी बोल”
आसावरी: “स्नेहू कंटाळा आला आयुष्याचा… मला मरायचं आहे..”
स्नेहल: “अगं काय बोलतेयस??? आईशी बोललीस का हे….चल मी तुझ्या घरी येते.”

स्नेहल आसावरीच्या घरी आली. तोपर्यंत आसावरी रडायची थांबली होती.
आई: “अरे स्नेहल! ये ये”
स्नेहल आत येऊन बसली.
आई: “थांब पाणी आणते”
स्नेहल: “नको काकी, तुम्ही बसा आधी इकडे.”
आई: “का ग काय झालं”
स्नेहल: “काकी आशुला सायकियाट्रीस्ट कडे घेऊन जा”
आई: “मी बघतेय ती बदलतेय. एकलकोंडी झालीय”
स्नेहल: “तिला आत्महत्या करावीशी वाटतेय काकी. ती डिप्रेशन मधे आहे.”
आई: “काय??? आशु माझ्याशी बोलायचं तरी…”
स्नेहल: “नशीब ती माझ्याशी बोललीय. निदान कळलं तरी.”

आई बाबा आसावरीला सायकियाट्रीस्टकडे घेऊन गेले. आसावरीची व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू झाली. सायकॉलॉजिस्टकडून कौन्सिलिंग सुध्दा सुरू झालं. आसावरीच दुसरं प्रेम पुस्तकं हे होतं. खूपशा चर्चेनंतर आसावरीने लायब्ररीअन व्हायचं ठरवलं. आता आसावरीने अभ्यासात पूर्ण लक्ष दिलं. डोक्यात काही विचार येऊ नये म्हणून ती सतत अभ्यास करत राहायची.

दहावीचा रिझल्ट लागला. आसावरीला ९८ टक्के मिळाले. आसावरीचे आई बाबा खूप खुश झाले. ती शाळेत दुसरी आली होती. आसावरीच्या बाबांनी पुन्हा एकदा तिला विचारलं
बाबा: “आशु! एव्हढे मार्क्स मिळालेत तू सायन्सला पण जाऊ शकतेस.”
आसावरी: “नाही बाबा मला आवड आहे तेच करते. मी लायब्ररीअन बनणार. कमी पैसे मिळाले तरी चालतील.”

पारितोषिक वितरण सोहळा होता. आसावरी शाळेत दुसरी आलेली होती. ती बक्षीस घ्यायला वर गेली असताना बक्षीस देणाऱ्या प्रमुख पाहुण्यानि तिला विचारलं ‘तू काय करणार?’ आसावरी म्हणते ‘आर्टस्’. प्रमुख पाहुण्या आवर्जून तिचा उल्लेख भाषणात केला.
प्रमुख पाहुण्या: “नुसतंच मार्कांकडे न बघता स्वतःची आवड काय आहे हे बघून करिअरची निवड करणं हे विशेष आहे. इथे दुसरा नंबर मिळवणाऱ्या आसावरीचं त्यासाठी मी कौतुक करते.”
आसावरी खुश झाली.

अनेक वर्ष गेली. आसावरी लायब्ररीअनच्या नोकरीत रमलेली होती. तिला एक मुलगी होती. तिचा नवरा मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर होता. एकदा ती नोकरीवरून घरी जात असताना वाटेत तिला कारमधून उतरणारी श्रेया दिसली. तिला आठवलं. श्रेयची चित्रकला अप्रतिम होती शाळेत असताना. तिला एलिमेंटरी व इंटर्मिजीएट दोन्ही परीक्षांमध्ये “ए ग्रेड” मिळाला होता. तिला वाटलं श्रेयाशी बोलावं. श्रेया काहीतरी छानच करत असणार. तिने श्रेयाला हाक मारली. श्रेयाने मागे वळून पाहिलं.
श्रेया: “ए हाय!!! आसावरी ना तू!”
आसावरी: “अगं हो! कशी आहेस श्रेया?”
श्रेया: “अगं मजेत! तू कशी आहेस?”
आसावरी: “मी पण मस्त! अगं माझं घर जवळच आहे. चल ना थोड्या गप्पा मारू. चहा घेऊ.”
श्रेया: “अगं नको पुन्हा कधी.”
आसावरी: “असा कधी कधीच परत येणार नाही. चल आत्ताच”
श्रेया: “हा हा! बरं चल तू इनसिस्ट करते आहेस तर.”
दोघीजणी आसावरीच्या घरी आल्या. आसावरीने चहा बनवला आणि बरोबर चिवडा आणला. दोघी चहा घेत गप्पा मारत बसल्या.
आसावरी: “काय करतेस तू श्रेया?”
श्रेया: “अगं वेब डिझायनर आहे.”
आसावरी: “वाह! मस्त ग! तू होतीसच नाहीतरी टॅलंटेड! चित्रकला छान होती तुझी.”
श्रेया: “काही मस्त बिस्त नाही हा! क्लाएंटची अपेक्षा पूर्ण करता करता नाकी नऊ येतात. आपल्याला काही वेगळच आवडतं आणि क्लाएंटला भलतंच काहीतरी हवं असतं. स्वतःच्या आवडत्या प्रोफेशन मध्ये असूनपण मनासारखं काही करता येत नाही. दुरून डोंगर साजरं तसं आहे ते.”
आणि श्रेया बोलतच राहिली…
आसावरी विचारमग्न झाली. तिला वाटतलं जे काही झालं ते ठीकच झालं मग.
श्रेया: “काय ग! कसल्या विचारात पडलीस?”
आसावरी: “काही नाही ग असंच. तू बोल.”
श्रेया: “तुझं पण ड्रॉईंग चांगलं होतं. पण मी ऐकलं तू लायब्ररी सायन्स केलंस.”
आसावरी: “हो. पुस्तकांच्या सानिध्यात बरं वाटतं.”
श्रेया: “गुड..सो यु हॅव जॉब सॅटिसफॅक्शन!”
आणि दोघीनी छान गप्पा मारल्या….

श्रेया निघून गेल्यावर आसावरी बेडरूममध्ये गेली. तिने तिचं पुस्तकांचं कपाट उघडलं आणि स्वतःची ड्रॉईंगची वही बाहेर काढली. ती तिने उघडली आणि एका एका चित्रावरून नजर फिरवू लागली. डोंगरात वाहणारा झरा, मावळतीचा सूर्य, शेत, नदीकाठ… ती अजूनही काढत असलेली चित्र होती ती. तिने वही बंद केली आणि छातीशी कावटाळली… जरी तिने चित्रकलेच्या बाबतीत काही करिअर केलं नाही तरी तिने मनाच्या कुपीत जपलेली ही चित्रकला तिला खूप आनंद देऊन जायची. आणि त्यातच तिच्या जीवनाचं साफल्य होतं…. 

2 thoughts on “मनाच्या कुपीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *