Marathi Short Stories

टिंब

आई आरुषबरोबर फोन वर बोलत होती. पण आरुष काही नीट बोलेना.
आरुष: “आई मी बोलतो नंतर. खाली मित्र वाट बघत आहेत.”
आई: “एव्हढी काय रे घाई… किती दिवसांनी फोन केला आहेस एकतर!”
आरुष: “बिझी असतो आई. सायन्स ला आहे मी. कॉमर्स किंवा आर्ट्स ला असतो तर रोज तुझ्याबरोबर बोलत राहिलो असतो.”
आई: “वेगळा वागतोस आजकाल. तुसडा पण झाला आहेस. काही झालंय तर सांग मला…”
आरुष: “व्हॉट द फक आई… काही नाही झालंय. उगाच काय तू… चल मी ठेवतो आता, बोलू नंतर…”
आरुष ने फोन ठेवला आणि आईने इच्छेविरुद्ध फोन ठेवला. तिला काय आरुषचं वागणं आजकाल बरोबर वाटत नव्हतं. तितक्यात आरुषचा बाबा पेपर घेऊन खोलीत आला. तो दुसऱ्या बाजूला बेडवर पेपर वाचत बसला.
आई: “मी काय म्हणते”
बाबा: “बोलत राहा मी ऐकतोय.”
आई: “तो पेपर ठेऊन देशील का आधी…”
बाबा: “पेपर ठेवायला सांगशील म्हणून आधीच म्हटलं की ऐकतोय मी.”
आई: “आरुष हल्ली वेगळा वागतो. नीट बोलत नाही मोकळा होऊन. काही झालं असेल का?”
बाबा: “अरे इथे असेपर्यंत दहावीत होता तो. लहान होता. आई वडिलांच्या पंखाखाली होता. आता त्याला पंख फुटलेत. या वयात मित्र जवळचे वाटतात. तू आणि मी जुने झालो आता.”
आई: “हम्मम”
आणि आईने आरुषच व्हॉट्सऍप स्टेटस बघितल.
आई: “अरे तू हे बघितलंस का?”
बाबा: “काय ते…मी माझ्या तरुण मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही.”
आई: “ढवळाढवळ काय…काळजी वाटते आईच्या हृदयाला…हे बघा त्याच व्हॉट्सऍप स्टेटस…नुसतं एक टिंब….”
बाबाने बघितलं.
बाबा: “अरे असेल ट्रेंड काहीतरी टिंब ठेवायचं.”
आई: “नीट बोलत नाही आहे. मला टाळतोय… आणि आता हे टिंब… नक्कीच काहीतरी बिनसलंय… पूर्वी सगळं बोलायचा… आता काही सांगत नाहीय. मेजर काहीतरी असणार.”
बाबा नुसता बघत राहिला. काही असू पण शकेल असं त्याला वाटलं.
बाबा: “हे बघ, काही असलं तरी त्याला, तुला आणि मला सांगायचं नाहीय. लेट हिम हँडल.” आई शांत झाली.

दुसरा दिवस उजाडला. आई ज्युस बनवायला गाजर साफ करत होती. बाबा मिक्सर धूत होता आणि तिच्याशी गप्पा मारत होता. पण थोड्याच वेळात त्याला जाणवलं आईचं लक्ष नाहीय. त्याने आईला हाक मारली.
“अगं ए… मी काय बोलत होतो सांग..”
आई भानावर आली.
“सॉरी…विचार जातंच नाहीय मनातून..”
बाबा: “कसला विचार?”
आई अडखळत बोलली “का…ठेवलं असेल…टिंब…आरुष ने?”
बाबा: “अगं केव्हढसं ते टिंब आणि केव्हढा त्याचा विचार करायचा!”
आई: “मला चैन नाही पडणार काळल्याशिवाय…”
बाबाने वैतागून सुस्कारा सोडला.
आई: “मी निकिताला फोन करते. तिला काही बोलला असेल तर.” यावर बाबा काही बोलला नाही.
आई: “हॅलो निकिता.”
निकिता: “हा आंटी बोला.”
आई: “अगं जरा महत्वाचं बोलायचं होतं.”
निकिता: “बोला ना.”
आई: “आरुष तुला काही झालंय असं बोलला का?”
निकिता: “कशाबद्दल?”
आई: “काहीही ग… काही वाईट झालं, काही बिनसलं असं काही बोलला का ग?”
निकिता: “नो आंटी… आणि मुळात त्याचं माझं एक महिना काहीही बोलणं झालं नाही आहे.”
आई: “अगं काय बोलतेस, त्याची गर्लफ्रेंड ना तू.”
निकिता: “हो आई पण दोघेही बिझी आहोत ना. सो वुई निड स्पेस.”
आई: “खरं सांग तुझं त्याचं काही वाजलं का?”
निकिता: “नो आई… नथिंग लाईक दॅट…”
आई: “काय बोलणार आता तुला. चल बाय…”
आणि आईने निकिताने बाय बोलायच्या आधीच फोन ठेवला. तिला काय करायचं कळत नव्हतं.

पूर्ण अंधार होता… पाठमोरी एक आकृती दिसत होती. त्या आकृतीच्या हातात अचानक एक पांढरा खडू आला… आणि ती आकृती काळ्याकुट्ट अंधारात तिच्या हातातल्या खडूने काहीतरी काढायला लागली. त्या आकृतीने एक टिंब काढलं… ते टिंब हळू हळू मोठं होत गेलं आणि त्या आकृतीने हळू हळू मागे वळून पाहिलं… अरे हा तर आरुष… आरुष एकदम बारीक झालेला होता आणि त्याच्या डोळ्याखाली खोल काळी वर्तुळं झालेली होती. त्याचं पोट खापाटीला गेलं होतं.
आणि आई घाबरून जागी झाली… बऱ्याच तास तिला झोप आली नाही. तिने बाजूच्या ड्रॉवर मधून झोपेची गोळी काढली आणि टेबल वर ठेवलेल्या ग्लासातल्या पाण्याबरोबर खाल्ली… थोड्या वेळाने तिला झोप आली.

दुसऱ्या दिवशी आईला जाग आली तेव्हा लख्ख प्रकाश होता खोलीत. तिने पटकन घड्याळाकडे बघितलं. ‘बापरे अकरा वाजले’ आणि ती घाईघाईत उठायला गेली. तर तिचं अंग दुखलं. तितक्यात बाजूला बसलेल्या बाबाने तिला हात लावला.
बाबा: “अगं झोप झोप ताप आहे तुला.”
आई: “काय बोलतो.”
बाबा तिच्या जवळ आला.
बाबा: “घेतलंस ना टेन्शन टिंबाच?”
आईने फक्त खाली बघितलं.
बाबा: “मी बोलतो आरुष शी…”
आई: “प्लिज बोल आणि विचार त्याला काय झालं. आणि समजाव”
बाबाने लगेच आरुषला फोन लावला.
आरुष: “हॅलो बाबा…जरा मी घाईत होतो नंतर बोलतो तुझ्याशी.”
बाबा: “अरे काही घाई बीई नाही. आई आजारी पडलीय तुझ्यामुळे.”
आरुष: “काय… माझ्यामुळे आजारी… का पण?”
बाबा: “तू धड तिच्याशी बोलत नाहीस, वेळ देत नाहीस. तुला असं वागायला हॉस्टेल वर ठेवलं का आम्ही!”
आरुष: “पण एव्हढं काय झालं की आई आजारीच पडली?”
बाबा: “तू टिंब का ठेवल आहेस व्हॉट्सऍप च्या स्टेटस वर?”
आरुष: “टिंब…ते काय असतं?”
बाबा: “अरे फुलस्टॉप! फुलस्टॉप का ठेवलास. काय अर्थ काढायचा त्याचा???”
आरुष: “कसला फुलस्टॉप थांब मी बघतो बाबा.”
आणि थोडा वेळ शांतता गेली…
आरुष: “बाबा अरे मागे मी स्टेटस चेंज करत होतो तितक्यात मित्राने बोलावलं मला. त्यात ते राहूनच गेलं. चुकून फुलस्टॉप टाइप झाला असेल… पण त्यात आईला काय झालं?”
बाबा हसायला लागला.
बाबा: “तरी मी तिला सांगतोय, मुलगा फक्त मोठा झालाय बाकी काही नाहीये तर विचार करून आजारी पडली ती नेहमीप्रमाणे.”
आरुष पण हसला.
आरुष: “दे तिला फोन बाबा, तिच्याशी बोलतो”
बाबाने आईला फोन दिला.
आरुष: “अगं आई चुकून आलं ते काय ते तुमचं टिंब… आयुष्याचा शेवट नाही करणार मी. तू काय कासलीपण काळजी करतेस… आय लव्ह यु आणि मी तुझ्याशी व्यवस्थित वेळ काढून बोलत जाईन आजपासून… हॅलो… आई”
आईला हुंदका फुटला. ती रडायलाच लागली आणि तिने फोन बाजूला ठेवून दिला. बाबाने तिला जवळ घेतलं… आणि सगळ्यांची काळजी मिटली… 

2 thoughts on “टिंब

  1. Aaj Sushant Rajput chya suicide vhi batani ऐकली n nantar hi post वाचली. कुटुंब असणं आणि काळजी करणार असणं, ह्या सगळ्याच महत्त्व अधोरेखित झालं त्यामुळे. स्पेस हवी, माझं मी राहू शकते वैगेरे अगदी वृथा आहे. टोकाचे निर्णय घ्यायच्या मागे प्रचंड राग किंवा नैराश्य हेच असते. ह्या दोन्ही गोष्टी कुटुंबातील व्यक्ती बरोबर व्यक्त होऊन निवळू शकतात. आणि नाहीच त्यांना जमले तर समुपदेशकांची मदत घेणं काहीच गैर नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *