Marathi Short Stories

साडेसाती

निर्मला भाजीला फोडणी घालत होती. संध्याकाळचे सात वाजले होते आणि निमेशचा अजून पत्ता नव्हता. नितीन ऑफिस वरून परस्पर निमेश ला शोधायला गेला. पण अजून काहीच बातमी नव्हती. बस ड्रायव्हर फोन उचलतच नव्हता. ती दर १५ मिनिटांनी त्याला फोन करायचा प्रयत्न करत होती. नितीन काहीतरी कळवेल म्हणून ती वाट बघत होती. मनात विचार यायला लागले म्हणून ती कामाला लागली.

तितक्यात तिचा मोबाईल वाजला.
नितीन: “हॅलो अगं निमेश ची बस चुकली. खेळत राहिला जवळ राहणाऱ्या एका मित्राबरोबर. घाबरून एकटा यायला निघाला आणि एका सायकल वाल्याने ठोकलं.”
निर्मला: “काय!!!!!”
नितीन: “अगं घाबरू नकोस. आपलं नशीब म्हणून सायकलनेच ठोकलं. पायाला आणि थोडा डोक्याला मार लागलाय. नथिंग सिरीयस असं डॉक्टर म्हणालेत. तू ये लगेच. मी व्हॉट्सऍपवर पत्ता टाकतो.”

निर्मला आणि नितीन निमेशला घेऊन आले. निमेश बरा होता तसा पण आईचं हृदय ते… पिळवटणारच! निर्मला भिंतीला डोकं टेकून शांतपणे बसली होती डोळे मिटून.
नितीन: “निर्मला”
निर्मलाने डोळे उघडून नितीनकडे पाहिलं.
निर्मला: “काय रे?”
नितीन: “एक सांगायचं होतं. ही वेळ बरोबर नाहीय पण तुझ्यापासून मी कधीच काही लपवलेलं नाहीय. आणि ही गोष्ट लपणार ही नाही.”
निर्मलाने नितीनच्या हातावर हात ठेवला.
निर्मला: “बोल ना रे!”
नितीन: “आमच्या ऑफिस मध्ये रिट्रेनचमेन्ट केली. उद्यापासून मी कामावर जाणार नाहीय.”
नितीन हातावर डोकं ठेवून बसला. निर्मलाला धक्का बसला. तिला काय बोलायचं कळतंच नव्हतं. पण ती खचली तर नितीनला कोण सांभाळणार.
निर्मला: “नको विचार करुस. झोप आता. उद्या सकाळी फ्रेश होऊन विचार करू. जगात असंख्य नोकऱ्या आहेत. झोप तू.”

रात्रीचे १२ वाजले. निर्मला टक्क जागी होती. तिच्या मनात विचार आले. ‘आपण आई ची मस्करी केली. पण काहीतरी तथ्य असावं. नाहीतर आत्ताच कसं हे झालं? साडेसाती चालू आहे नितीनची. त्याशिवाय असं होणार नाही.’ तिला राहवलं नाही. एव्हढ्या उशिरा फोन करणं बरोबर नाही पण न राहवून तिने केलाच. बराच वेळ रिंग वाजली आणि आईने फोन उचलला.
आई: “हॅलो”
निर्मला: “हॅलो”
आई: “अगं एव्हढ्या रात्री, सगळं ठीक आहे ना???”
निर्मलाच्या डोळ्यात पाणीच आलं.
निर्मला: “आई”
आई: “अगं बोल काय झालं??”
निर्मला: “निमेश ला सायकल ने ठोकलं बरंच लागलंय त्याला. घरी आणलंय पण खूप दुखतंय त्याला. आणि आई नितीन ची नोकरी गेली.”
आई: “बघ मी म्हटलं नव्हतं. अजूनही सांगते, गावी जाऊन शांती करून येऊया…”
यावर निर्मलाचं रडणं थांबलं. तिने डोळे पुसले. आणि आईला म्हणाली.
“मी सांगते तुला. चल खूप उशीर झालाय. झोप आता.” निर्मलाने फोन ठेवला आणि विचार केला. ‘असेलही साडेसाती. पण माझ मन त्या साडेसातीपेक्षा स्ट्रॉंग आहे.’ आणि निर्धार करून ती झोपली.

सकाळी पाचलाच निर्मला नीतीनला जाग आली. निर्मलाने नितीनच्या केसातून हात फिरवला. “झोपलास ना रे नीट?”
नितीन: “मध्ये मध्ये जाग येत होती ग. टेन्शन आलंय.”
निर्मला: “उठ अंघोळ कर आणि जॉबसाठी अप्लाय करायला लाग.”
नितीन: “इतकं सोपं वाटतं तुला?”
निर्मला: “प्रयत्नार्थी परमेश्वर. उठ.”
नितीनला तिने साडेसातीचं काही सांगितलं नव्हतं. तो उठला आणि आटपायला गेला. निर्मला निमेश च्या खोलीत गेली. बाळ शांत झोपला होता हे बघून तिला बरं वाटलं. निर्मला चा निर्धार बघून नितीनला पण जोश आला. त्याने सगळं आवरलं आणि ‘नौकरी.कॉम’ वर अप्लाय करत बसला…..

काही दिवसांनी निमेश शाळेत जायला लागला. पण त्याचा पाय थोडा थोडा दुखत राही. नितीन ने खूप प्रयत्न केले पण त्याला हवी तशी संधी मिळेना. इकडे निर्मला अस्वस्थ व्हायला लागली होती. खरच काय होईल? साडेसाती असेल? विचार करून ती नितीनजवळ आली.
“नितीन मी काय म्हणते, तू कमी पगाराची संधी स्वीकारावीस.”
नितीन: “काय बोलतेयस…”
निर्मलाने त्याचे हाथ पकडले.
“हे बघ नितीन. तू कामावतोस तितक्या पैशांची आपल्याला खरच गरज आहे का? तुला ज्या संधी येतात त्याने पण भागेल ना आपलं व्यवस्थित. काय गरज आहे एव्हढी हाव करायची. अन्न, वस्त्र, निवारा याशिवाय माणसाच्या काही गरजा नाहीत. पण तू असाच प्रत्येक संधीला नाही म्हणालास मग मात्र काय होईल माहीत नाही. आपले असलेलं सेविंग पण संपून जाईल हळू हळू.”
नितीन ने सुस्कारा सोडला. “ठीक आहे. खरं आहे तू म्हणतेस ते.” आणि दोघांनी मिठी मारली.

निर्मला ने फिजिओ थेरपिस्ट ची अपॉयंटमेंट घेतली. निमेश घरी आला तसं निर्मला त्याला म्हणाली
“चल चल कपडे बदलू नकोस. आपल्याला डॉक्टरकडे जायचंय.”
निमेश: “आई डॉक्टर कशाला? मला भीती वाटते.”
निर्मला: “अरे घाबरायचं काय व्यायामाचा डॉक्टर आहे फक्त. जे एक्सरसाईझ सांगतील तेव्हढे करायचे.”
निमेश: “मला दुखेल तर…”
निर्मला: “दर्द अच्छा होता है”
निमेश: “अरे दर्द नाही दाग आहे ते”
निर्मला: “अरे ठीक होने के लिए दर्द भी अच्छाहि होता है”
आणि तिने निमेशला गुदगुल्या केल्या. निमेश हसला.
निमेश: “हे हे नको ग मॉम.”

एक महिना गेला. नितीन ने कमी पगारात नवीन ऑफिस जॉईन केलं. निमेश ला हळू हळू बरं वाटत होतं. इथून तिथून प्रॉब्लेम्स यायचे, जसं निमेश च्या ऑफिस मध्ये पॉलिटिक्स होतं. निर्मला त्याला रोज समजवायची. निमेशलाही फुटबॉल खेळायला मिळत नाही म्हणून तो नाराज असायचा. निर्मला त्यालाही समजवायची. असेच दिवस जात होते.

आईचे फोन चालूच होते. पण आई निर्मला ला आवडत नाही म्हणून काही विषय काढायची नाही. पण एक दिवस आई बोललीच.
“अगं मी काय म्हणते. येऊया काय शांती करून?”
निर्मला: “आई मन शांत असलं ना की अजून कुठे शांती करायची गरज लागत नाही. जिथे समस्या असते ना तिथेच उपाय ही असतो. आपण स्वीकार केला ना की सगळं सोपं होतं. उगाच इकडे तिकडे मदत मागत फिरण्यात काही अर्थ नाहीय. आयुष्य आहे. उतार चढाव प्रत्येकाच्या आयुष्यात जात येत असतात. कायमचे सगळे प्रॉब्लेम्स थांबतील अशी कोणती शांती असेल ना तर मी नक्की करेन. चल बेल वाजली. निमेश आला असेल. मी करते परत कॉल. बाय.”
आणि निर्मलाने फोन ठेवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *