Marathi Short Stories

गरजा?

नवीन नवीन लग्नं, फक्तं एक आठवडा झाला होता. एक आठवडा एकमेकांना ओळखण्यात आणि जवळ येण्यात गेले. अर्थातच हनिमून! घरी आल्यावर संसाराची मांडणी, जडणघडण सुरू झाली. आणि एके दिवशी बायको नवऱ्याला म्हणाली “हे वन बी एच के घर कुठे पुरणार आपल्याला. तुम्ही टू बी एच केच घ्यायला पाहिजे होतं. आपले नातेवाईक राहायला आले तर कुठे राहतील…” आणि नवरा धास्तावला… ‘वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी कर्ज न करता, कॅश वर हे घर मी घेतलं, हो बाबांची मदत होती पण मीही काही कमी मेहनत केली नाहीय.’ हा विचार मनात येऊनही त्याला अस्वस्थ वाटलं. ‘मी कुठे कमी पडलो का…’

आणि असं वरचेवर होत राहिलं.
बायको: “काय हे कपाट भरलं सुध्दा! दोन नव्या फॅशन चे ड्रेसेस आलेत फॅशनकार्ट वर, मला घ्यायचे होते… कुठे ठेवू?”
तिचा मलूल चेहरा त्याला बघवला नाही. लॅपटॉप बंद करून तो बाहेर निघून गेला. आणि जास्तीत जास्त असले विषय टाळून तो गप्प राहत गेला.

बायको: “मी बोलत राहते आणि आजकाल तुझं लक्षच नसतं. मी काय म्हणत होते, पनवेल ला नवीन प्रोजेक्ट होतोय. सगळे टू बी एच के आहेत. एरिआही पॉश लोकांचा आहे. आपण घेऊया का.”
आता गप्प कसं बसणार. त्याच तक्रारीने सुरुवात झाली होती.
नवरा: “तुला माहीत आहे जॉब बरोबर मी माझी कंपनी काढायच्या प्रयत्नात आहे. तिकडे भांडवल लागेल ग… मी नाही कुठे म्हणतोय, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करूयात… वेळ तर दे मला.” यावर ती समजून घेईल असं त्याला वाटलं… पण
बायको: “किती वेळ लागेल… माझं आयुष्य संपेल तोपर्यंत…”
नवरा: “अगं का अभद्र बोलतेस.”
आणि ती चिडून निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या दूर जाणाऱ्या प्रतिमेकडे बघत राहिला.

आता तो जास्तीत जास्त मित्रांबरोबर राहायला लागला. त्याला समजून घेणारे, आधार देणारे, प्रोत्साहन देणारे मित्र…
बायको: “काय हे इतकं उशिरापर्यंत कुठे होतास?”
नवरा: “अगं मित्र जेवल्याशिवाय सोडेच ना.”
बायको: “काय!!! जेवून आलास!!!”
नवरा: “हो ग”
बायको: “आणि मी बनवलंय ते?”
नवरा: “फ्रिज मध्ये ठेव… उद्या खातो मी नक्की.”
आणि तो तिला समजूत घालायला जवळ घ्यायला लागला. ती त्याचा हात झटकून निघून गेली….

आणि ‘कहानी मे ट्वीस्ट’ असतोच…यांच्याही कहाणीत आला… अमेरिकेहून बायकोचा भाऊ येणार होता. आणि बायको चिंतेत
बायको: “अरे कुठे राहील एव्हढ्याशा घरात तो… आणि नको येऊस असं तरी कसं सांगू…”
नवरा: “अरे आपल्या बेडरूम मध्ये झोपेल तो. तेव्हढाच तर प्रश्न आहे. आपण बाहेर झोपू…”
बायको: “अमेरिकेत मोठी मोठी रो हाऊसेस असतात त्यांची… इथे श्वासही घ्यायला जमणार नाही त्याला…”

भाऊ आला आणि गप्पांच्या बैठकी जमल्या… बोलण्या बोलण्यात बायकोने विषय काढला “दादा तू आमच्या बेडरूम मध्ये झोप हा…”
भाऊ: “अरे काय त्यात… मी हॉल मध्ये झोपेन… तुमची प्रायव्हसी नका भंग करू. हा हा हा”
बायको: “अरे तुला नाही जमणार हॉलमध्ये… एकतर एव्हढा छोटा हॉल आहे…”
भाऊ: “छोटा… अरे मी या हॉलच्या अर्ध्या जागेत पुरेन… बाकीची जागा काय मी लोळायला वापरू? हा हा हा… तुम्हा बायकांना ना सगळं छोटं, थोडं, कमी वाटतं… माझी बायको पण अशीच. न्यू यॉर्क मध्ये तिने मोठं घर बघितलंय. आणि तेच घ्यायचं असा हट्ट धरून बसलीय. मी म्हटलं तिला मी करतोय ना! पण जरा दम धरायला नको. बायकांना किती असलं तरी कमीच पडतं. आता माझ्या बहिणीने तुला त्रास दिला की अजून मोठंच घर घे. आत्ताच घे, तर तुला कसं वाटेल…सांग मला”
नवरा बायकोने एकमेकांकडे चमकून बघितलं… आपल्या भावाला असा त्रास झालेला तिला पटेना… पण ती सुद्धा तर तेच करत होती. तिने खाली मान घातली आणि हीच वेळ होती नवऱ्याची.
नवरा: “अरे असं कसं म्हणतोस तू? तुझी बायको श्रीमंत घराण्यातली आहे. कसं सहन होणार तिला. तुमच्याकडे किड्स रुम नाहीय अजून. उद्या मुलं झाली की त्यांना कुठे ठेवणार गेस्ट रुममध्ये? आणि गेस्ट ना कुठे ठेवणार गॅरेज मध्ये?”
भाऊ भांबावून बघत राहिला.
नवरा: “अरे ती आजची करिअर करणारी नारी आहे. तिला जास्तच दिलं पाहिजेस तू… तू तुझे सर्वतोपरी प्रयत्न करत असशील… पण तिला लागणार ते लागणारच ना… तिचे कपडे खूप असतील, तिचे शूज खूप असतील, तिच्या अपेक्षा आभाळा एव्हढ्या असतील… तू कधी पूर्ण करणार, तिचं आयुष्य संपल्यावर??”
बायको ओशाळून उठून निघून गेली. नवरा भावाला म्हणाला “दे टाळी” भावाला काहीच न समजल्यामुळे त्याने गोंधळून आपला हात पुढे केला. नवऱ्याने टाळी दिली आणि भावाला कडकडून मिठी मारली… भाऊ आपला गोंधळलेलाच…
आणि राजा राणी यापुढे छोट्या संसारात सुखाने नांदत राहिले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *