राऊत आजोबा यशोदाची आतुरतेने वाट बघत होते. वास्तविक एक आठवडा होता सुरज आणि सूनबाईना यायला. पण राऊत आजोबांचं वय वीस वर्ष कमी झालं होतं त्यांच्या येण्याची बातमी ऐकून. यशोदा आज सगळं घर कानाकोपऱ्यातून झाडून घेणार होती. सगळी ठेवणीतली भांडी घासून घेणार होती. दोन वर्षांनी येणार होते सुरज आणि फॅमिली. नातवंड श्रेया आणि समीर आता प्रत्येकी सहा व दहा वर्षांचे झाले होते. दोन वर्षात आपल्याला विसरले तर नसतील अशी राऊत आजोबांना धास्ती होती. एक आठवडा काय फटाफट जाईल. स्वतः जाऊन राऊत आजोबा रांगोळीचे रंग, कंदील, कारीट सगळं घेऊन आले होते. मग मुलं आल्यावर धावपळ नको.
यशोदा आली आणि तिने साफसफाई सुरू केली.
राऊत आजोबा: “नीट कर ग बाई सफाई. अमेरिकेत वाढलेली पोरं आहेत. सगळं जमलं पाहिजे त्यांना.”
यशोदा: “हो काका नका काळजी करू. मी नेहमी चांगलच काम करते.”
राउत आजोबा: “हो तरी पण तुझा स्पेशल टच असुदे आज घराला. आणि ते अडगळीचं सामान काढलंय मी, ते घेऊन जा. आणि रांगोळीचे रंग कारीट आहे तिथेच ठेव नाहीतर मला मिळणार नाहीत. सुनबाई छान रांगोळी काढते हा माझी… बघशीलच तू.”
यशोदा: “काका एव्हढं आनंदी मी तुम्हाला पहिल्यांदा बघतेय.”
आजोबा मनापासून हसतात.
संध्याकाळी सगळं आवरून आजोबा वॉक ला गेले. त्यांच्या कट्ट्यावर पोचले तेव्हा सगळे आजोबा जमा झाले होते.
शेणगे आजोबा: “काय राऊत आज उशीर झाला.”
राऊत आजोबा: “हो रे दिवाळीची साफसफाई काढली आज”
बेंद्रे आजोबा: “हो तुझी फॅमिली येणार ना. दोन वर्षानंतर माणसात येशील तू.”
राऊत आजोबा: “हो रे…एकटं राहून राहून कंटाळा आलाय. आजकाल स्वप्न पण पडायला लागलीत. एका अंधाऱ्या गुहेत मी एकटाच हरवलोय. लांबून कुठून तरी सुरज चे सूनबाईंचे आवाज येत आहेत… माझी नातवंड हाका मारत आहेत. पण सापडत मात्र कुणी नाही.”
सगळे ऐकून शांत झाले. शेणगे आजोबांनी राऊत आजोबांच्या पाठीवर थोपटलं. राऊत आजोबांच्या डोळ्यांत पाणी आलं. ते त्यांनी मागे फिरवलं.
बेंद्रे आजोबांनी विषय बदलला. रोजच्या गप्पा सुरु राहिल्या.
आजकाल आजोबांना उत्साहामुळे लवकर जाग येत असे. पण लवकर उठून दिवसभर करणार काय. आजोबांनी प्रातःविधी आटोपले आणि टी व्हि वर गझलांचा कार्यक्रम लावून बसले.
‘तुमको देखा तो ये खयाल आया… जिंदगी धूप तुम घना साया’
राउत आजोबांना आजींची आठवण झाली. चार वर्ष झाली तिला जाऊन. पण आठवणी जळमटांसारख्या मनाच्या कानाकोपऱ्यात चिटकून होत्या. मनाला सुन्नपणा आला. तितक्यात त्यांचा मोबाईल वाजला. मुलाचा फोन होता. त्यांनी आतुरतेने उचलला.
राऊत आजोबा: “हॅलो बेटा… अरे बरा आहे मी… तुमची वाट बघतोय आतुरतेने…… अरे काय बोलतोस… नाही कसं जमणार म्हणतोस आता… अरे असे काय ते ऑफिसवाले… माणसाला काही चॉईस आहे की नाही की नुसती गुलामगिरी…”
खूप वेळ आजोबा नुसते ऐकत राहिले आणि निराश होऊन त्यांनी फोन ठेऊन दिला… नुकतंच आजींच्या आठवणीने कोंदटलेलं मन भरून आलं. सुरज येणार नाही… सुनेची रांगोळी घरात सजणार नाही… मुलांच्या आवाजांनी घर भरणार नाही… त्यांना रडूच फुटलं…
होतं कोण सांभाळणारं? मन मोकळं होईस्तोवर रडून घेतलं त्यांनी… आणि मग डोळे पुसले…
दिवाळीच्या दिवशी राऊत आजोबा लवकर उठले. त्यांनी उटणं काढलं स्वतःपुरत, छान आंघोळ करून घेतली, देवाला नमस्कार केला… आणि ते स्वतः रांगोळी काढायला बसले… त्यांना कुठे काय येत होतं… पण एक डोंगर एक झाड आणि एक घर तर प्रत्येकाला येतं ना… तेच काढायचं ठरवलं त्यांनी… आपली दिवाळी दर वर्षी सारखी फिकी जाऊ द्यायची नाही याचा चंग बांधला होता त्यांनी. तितक्यात पिंट्याला फटाके फोडायला घेऊन जाणाऱ्या मधुरा ने त्यांना पाहिलं…
मधुरा: “काय आजोबा तुम्ही रांगोळी काढताय की काय…”
राऊत आजोबा: “हो ग प्रयत्न करतोय.”
मधुरा: “आजोबा मी काढून देते ना तुम्हाला…”
राऊत आजोबा: “तू कुठे असशील दर वर्षी…”
मधुरा: “अहो दर वर्षीच कोणाला ठाऊक…माझ्या आई बाबांनाही ठाऊक नाहीय ते. पण या वर्षी आहे ना. मग पुरे की…”
आजोबांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.
मधुरा: “आणि फराळाला पण या आमच्याकडे. आता चला आमच्याबरोबर, फटाके फोडुयात…”
राऊत आजोबा: “देवाला प्रसन्न केलं मी म्हणून तुझ्या रूपाने मुलगी आणि पिंट्या च्या रूपाने नातू भेटला…”
मधुरा: “काही बोललात का आजोबा?”
आजोबा: “काही नाही ग… मस्त एन्जॉय करूया चल…”
आणि राऊत आजोबांनी खूप फटाके फोडले, रांगोळीने दार सजवलं आणि छान फराळ खाल्ला. अशीच संध्याकाळ झाली… संधिप्रकाश आज उजळून निघाला होता.