मोबाईल वाजला. निषाद ने फोन उचलला.
निषाद: “हा अभिमन्यू. मित्रा तू सिलेक्ट झाला आहेस… अभिनंदन! मला एम. डी. म्हणत होते सॉलिड माणसाचं रेकमेंडेशन केलंस म्हणून… हो ऑफिशिअली फोन येईलच तुला…”
दुसऱ्या दिवशी मीटिंग रुम मध्ये सगळे बसले होते. एम. डी. नि प्रवेश केला. सगळे उठून उभे राहिले ग्रीट करायला आणि बसले. अभिमन्यू निषाद च्या बाजूलाच बसला होता. व्यक्तिमत्वाने उजवा. बुद्धीने उजवा. अभिमन्यू चा आज ऑफिस मध्ये पहिला दिवस होता.
एम. डी.: “व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. गेला आठवडा सेल्स साठी ओ के होता. आपल्याला लवकरच आपली मार्केटिंग स्ट्रेटेजी बदलावी लागेल तरच ग्रोथ होईल. तुम्हाला माहीत आहेच या मंथ मध्ये आपली नवीन पर्सनल केअर रेंज लॉन्च होतेय. आपल्याला ती प्रमोट करायला नव्या विचारांची गरज आहे. म्हणूनच जंटलमन आपली ओळख करून देतो. नवीन रुजू झालेले अभिमन्यू चिटणीस आपली सगळी पर्सनल केअर रेंज सांभाळतील.”
आणि एम. डी. ने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
निषादच्या काळजाला पीळ पडला. हे नवीन पर्सनल केअर रेंज निषादलाच लीड करायला मिळेल असा बोलबाला होता. निषादला पण वाटत होतं की त्यालाच मिळेल. पण हे वेगळंच झालं. निषादचं मन सुन्न झालं. वास्तविक अभिमन्यू निषादच्या कॉलेज ग्रुप मधेच होता. त्यामुळे ते जवळचे मित्र होते. बऱ्याच वर्षाच्या दुराव्याने फरक पडला नव्हता. अभिमन्यू ला निषादनेच स्वतःच्या ऑफिस मध्ये रेकमेंड केलं होतं. पण अभिमन्यूने निषाद चाच प्रोजेक्ट मिळवला…
मीटिंग संपून सगळे बाहेर आले. निषाद तडक त्याच्या केबिन मध्ये निघून गेला. अभिमन्यूला थोडं विचित्र वाटलं. अभिनंदन ही केलं नाही. बाजूला उभ्या असलेल्या काराडकरांचं लक्ष होतं. ते अभिमन्यूकडे आले.
कराडकर: “हा प्रोजेक्ट निषाद सरांना मिळणार होता लीड करायला.”
आणि कराडकर अर्थपूर्ण हसले… अभिमन्यूला जे कळायचं ते कळलं.
आणि असंच होत राहीलं. निषादपेक्षा अभिमन्यूच्या कल्पना वरचढ ठरत होत्या. त्याने आपल्या चांगल्या स्वभावामुळे मित्रही फार बनवले. निषाद अभिमन्यूशी तुटक वागायला लागला. त्याचा जळफळाट कधी कधी उठून दिसत असे.
अभिमन्यू: “निषाद मला वाटतं आपण आज रात्री बाहेर जेवायला जाऊया… आपल्या पूर्ण कुटुंबाला घेऊन… डिनर ऑन मी…”
निषाद: “हो तूच बिल भर कारण अप्रेजल ही तुझंच चांगलं होणार आहे. कदाचित लीड मार्केटिंगची पोस्टही तुलाच मिळेल.”
आणि निषाद निघून गेला.
अशाच एका मीटिंग मध्ये अभिमन्यू आणि निशाद दोघे तयारी करून आले होते. एम. डी. नि निषादला त्याची कल्पना सांगायला सांगितली. “माझी अशी कल्पना आहे की एक आजी असते. सासू… ती नातवाला सांगत असते आमच्या वेळी नव्हती हा अशी थेरं… आम्ही स्वस्तवालं जे असेल ते तेल वापरायचो. सून ऐकत असते. ती म्हणते… म्हणूनच सासरे बुआंना हृदयरोग आहे आणि यांना नाही… आणि आपलं तेल ती पुढे करते.”
एम. डी.: “हम्म चांगली आहे कल्पना… अभिमन्यू तुला काय वाटतं?”
अभिमन्यू: “मला असं वाटतं की वेळ आलीय सर्वस्वी वेगळा विचार करण्याची. बदलत्या जगाचा पायंडा आपण घातला पाहिजे तरच आपण वेगळे म्हणून लक्षात राहू. नेहमी बाई ने नवऱ्याच्या हृदयाचा विचार का करायचा. माझी अशी कल्पना आहे की नवरा किचन मध्ये बिर्याणी बनवत असतो आणि बाजूला आपलं निर्लेप तेल ठेवलेलं असतं. तितक्यात मॉडर्न कपडे घातलेली बायको आत येते. आज बिर्याणी बनवतोस हे ठीक आहे पण तेल पण नवीन… नवरा म्हणतो… हो सर्वोत्तम काय आहे त्याचा विचार करायलाच हवा ना. माझी लाडकी बायको पण जेवणार आहे ना.”
एम. डी.: “ब्रिलिअंट… वेगळेपणामुळे आपण एकदम लक्षात राहू… सगळ्यांच काय मत आहे?”
सगळ्यांच मत पडलं अभिमन्यूचीच कल्पना हिट होईल…
सगळे बाहेर आले.
अभिमन्यू: “निषाद चल कॉफी पिऊ.”
निषाद: “का? माझ्याबरोबर कॉफी का?”
अभिमन्यू: “तू आजकाल कसा वागतो आहेस कळतंय का तुला?”
निषाद न बोलताच निघून गेला…
अप्रेजल लेटर येतात… अभिमन्यूला साहजिकच लीड मार्केटिंगची पोस्ट मिळालेली असते. अभिमन्यूची स्ट्रेटजी वापरून कंपनीला बराच नफा झालेला होता. त्या निमित्ताने एम. डी. नि छोटी पार्टी ठेवलेली होती. निषाद घरी ड्रिंक्स घेत होता. तो पार्टीला थांबला नव्हता. टेबल वरचा फोन वाजला.
निषाद: “हॅलो”
अभिमन्यू: “निषाद… कुठे आहेस?”
निषाद: “घरी”
अभिमन्यू: “घरी काय करतो आहेस. पार्टी ला थांबायचंस ना.”
निषाद तुच्छतेने हसतो…
अभिमन्यू: “असा काय हसतो आहेस. तडक निघ आणि ये पार्टी ला.”
निषाद: “माझा मूड नाहीय.”
अभिमन्यू: “तुझा मूड मी आल्यापासून कायमचा बिघडलाय…”
निषाद: “कळतंय ना तुला मग का छळतोयस? लिव्ह मी अलोन.”
अभिमन्यू: “एकटं राहून कोणतेही प्रॉब्लेम्स सुटत नसतात.”
निषाद: “बरोबर बोललास, तू एक प्रॉब्लेम आहेस माझ्यासाठी…”
अभिमन्यू: “मला खरोखर तुला काय सांगायचं माहीत नाहीय. पण तू आज पार्टीला यायला हवस.”
निषाद ओरडून बोलतो.
निषाद: “अरे पण का?”
अभिमन्यू: “फक्त माझा मित्र म्हणून…”
निषाद चा धीर सुटतो. तो रडायला लागतो. फोन ठेवून देतो. कॉलेज च्या बऱ्याच आठवणी त्याच्या नजरेसमोरून जायला लागतात. अभिमन्यू तेव्हाही सगळ्यांत हुशार होता. पण त्यामुळे मैत्रीत तेव्हा कधीही फरक पडला नाही… ‘सतत एकत्र राहिलो, खूप मजा केली… म आता हा तुटकपणा आपल्यात कुठून आला? आपण आता मोठे झालोत की लहान झालोत…’
निषाद खूप वेळ रडत राहिला…
पार्टी रंगात आलेली होती. सगळे नाचत होते. अभिमन्यू मात्र लांब एकटाच ड्रिंक्स घेत बसलेला होता… तितक्यात त्याच्या पाठीवर थाप पडते… तो मागे वळून पाहतो…
अभिमन्यू: “निषाद तू…”
अभिमन्यूला खूप आनंद होतो…
अभिमन्यू: “थँक्स मित्रा!”
अभिमन्यू उठून उभा राहतो आणि निशाद त्याला घट्ट मिठी मारतो…
निषाद: “अरे तुझी पार्टी आणि तू असा एकटाच का बसला आहेस. अभिनंदन तुझं… चल डान्स फ्लोर वर…”
दोघेही डान्स फ्लोर वर येतात. निषाद ला त्यांच्या कॉलेज चा नागीण डान्स आठवतो… तो नागीण डान्स करायला लागतो… अभिमन्यूला आठवून खूप हसू येत… तोही निषाद ला जॉईन होतो… माहोल जमतो… खूप धमाल उडते…