Marathi Short Stories

डील विथ इट!

राहान आपल्या परीने भराभर नोट्स लिहीत होता. पण सगळ्यांचं लिहून झालं तरी त्याचं संपत नसे. सर त्याच्यासाठी थोडा वेळ जास्त थांबत असत. आईने त्याची ही भाषांमधली कमतरता ओळखून त्याला अशा शाळेत घातलं होतं जिथे अभ्यासातील प्रगतीवरून वर्गवारी करून अभ्यासात प्रगती नसणाऱ्या मुलांकडे विशेष लक्ष देण्यात येत असे. सरांच लक्ष नाही असं बघून नमीत राहान च्या डोक्यावर पेन मारत होता. आणि प्रत्येक पेनाच्या माऱ्याबरोबर त्याला डंबो, स्लो मोशन, डफर असं म्हणत होता. राहान रागाने त्याला विरोध करत होता पण लिखाण संपवायची शर्यत त्याला फार विरोध करू देईना. राहान अस्वस्थ होत होता, चिडत होता. पण सरांना तरी किती वेळा सांगणार. नमीत सुधारत नव्हता. नेहमी राहान ला त्रास देत राही.

सर मराठी कविता शिकवत होते. राहान च्या डोळ्यासमोर हिरवे हिरवे गार गालिचे पहुडले होते. राहान त्या गालिच्यांवर फुलपाखरांच्या मागे धावत होता. तितक्यात राहान च्या पाठीवर हलका फटका बसला. सरांनी काहीतरी लिहायला सांगितलं होतं. पण राहान ची मध्ये मध्ये तंद्री लागायची. राहान ला खूप अपमानकारक वाटलं. शहरातल्या शाळांमध्ये मारायला परवानगी नव्हती. पण सांगलीच्या शाळेत असे एखाद दुसरे फटके मिळायचे त्याला. अशा वेळी त्याला वाटायचं एक खोलच खोल दरी आहे आणि त्यात आपण पडत चाललोय. या पडण्याला काहीच अंत नाहीय.

त्याची बहीण मुक्ता खूप बोलकी आणि अभ्यासात चांगली होती. सुट्टीत दोघे घरी आले होते तेव्हा शेजारच्या बापट आंटी नि विचारलं कसं चाललंय मुलांचं.
आई: “सहावीची परीक्षा झाली ना. मुक्ताला सत्त्यांणव टक्के आणि राहानला त्र्याहात्तर.”
बापट आंटी: “वा फार हुशार आहे मुक्ता…” आणि त्या बऱ्याच वेळ मुक्ता बद्दल बोलत राहिल्या. राहानला याची सवय झाली होती. पण सुप्त मनातून त्याला नेहमी मुक्ताला त्रास द्यायचे आदेश यायचे. वास्तविक सांगलीच्या शाळेत जाऊन राहान ची टक्केवारी खूपच वाढली होती. पण आई व्यतिरिक्त कुणी त्याची फार काही दखल घेतली नव्हती. राहान ला एका अंधाऱ्या खोलीत स्वतःला बंद करून घ्यावसं वाटायचं.

राहानचे बाबा वारल्यावर त्याची आई खूप अस्थिर आणि अस्वस्थ झाली होती. ती मुलांसाठी उत्तमात उत्तम निर्णय घेत होती पण सगळं सांभाळायची धावपळच एव्हढी होती की ती मुलांना वेळ काही नीट देऊ शकत नव्हती. राहान चे बाबा राहान बरोबर खूप खेळत असत. तो राहतो त्या बिल्डिंग मध्ये कुणी मुलंच नव्हती. सगळे रिटायर्ड आजी आजोबा जास्त. आणि शाळेत तर त्याचं मनच रमत नव्हतं. शाळेत खूप खेळ होते पण राहान तिथे काही नीट खेळूच शकत नसे. तिथे गावची मुलं फार. हक्काचे मित्र नव्हते. कशात प्रशंसा नव्हती.

सुट्टीत घरी आले दोघे की राहानची आईच्या मागे भुणभुण सुरू असायची.
राहान: “आई मला मुलं त्रास देतात तिथे. स्लो बोलतात.”
आई: “नको लक्ष देऊ.”
राहान: “तो जगदीप मला बोलतो, माझे बाबा शेतकरी आहेत. ते महत्वाचं काम करतात. तुम्ही शहरातली माणसं काही कामाची नाहीत.”
आई: “अरे जाऊदे ना तू अभ्यास कर तुझा.”
राहान: “आई सर पण मारतात.”
आई: “चल काहीतरी सांगू नकोस. खूप चांगली शाळा आहे ती. करतील ते चांगलंच करतील.
राहान: आई मला नाही जायचं त्या शाळेत.”
आई: “राहान तुला कुठल्याच शाळेत जायचं नसतं. पण तसं नाही चालत.”
राहान: “का नाही चालत? मी घरीच अभ्यास करून परीक्षा देईन.”
आई: “राहान तुझा अभ्यास घ्यायला वेळ आहे का मला. तिथे तुझे बाकी शारीरिक व्यायाम पण होतात. एव्हढं कुठे मला जमणार आहे?”
आई पण काकुळतीला आली. पण मुलासमोर कुठे डोळ्यात पाणी येऊ देईल. ती स्वयंपाक घरात निघून गेली. राहानचं बोलणं अर्धवटच राहिलं…

आई राहान मुक्ताला भेटायला आली होती. मुक्ता आईला सगळ्या शाळेतल्या कहाण्या सांगत होती. तिने वर्गात कशी पटापट उत्तर दिली, योगा मध्ये तिला विशेष सर्टिफिकेट कसं मिळालं, तिच्या मैत्रिणींबरोबर काय काय गप्पा झाल्या. मग ती राहान च्या रुम वर गेली. राहान गप्पच होता. आईने विचारलेल्या प्रश्नांवर फक्त हम नाही अशी उत्तरं देत होता.
आई: “राहान काय झालंय”
राहान: “काय नाय”
आई: “मग एव्हढा गप्प का”
राहान गप्पच राहिला. आई पण काही बोलली नाही. ती तरी काय बोलणार. ती गेली. राहान जिने उतरुन मैदानात आला. तितक्यात नमीत मागून जात होता. त्याने मुद्दाम जमिनीवरची माती उचलून राहानच्या अंगावर उडवली. राहान खूप वैतागला. पण त्याला काय करायचं कळेना. तो रडायलाच लागला. तो आई गेली त्या दिशेने धावायला लागला. गेट पर्यंत आला. पण आई केव्हाची निघून गेली होती. तो तिथेच रडत बसला.

तितक्यात योगा चे शिक्षक तिथून जात होते त्यांनी राहानला पाहिलं. ते काळजीने त्याच्या जवळ आले.
सर: “ए बाळ… काय झालं?”
राहान काही बोलेना.
सर: “चल वर चल…”
ते त्याला एका रिकामी वर्गात घेऊन गेले.
सर: “अरे काही बोलशील का?”
राहान काही बोलेना आणि राडायचंही थांबेना. सरांनी जाऊन मुख्याध्यापक बाईना सांगितलं. बाईंनी राहानला बोलवून घेतलं तेव्हा राहान थोडंस रडायचा कमी झाला होता. मुख्याध्यापक बाईंनी राहानच्या आईचा रेकॉर्ड मधला नंबर काढून आईला फोन लावला. आई नुकतीच तिच्या सांगलीतल्या चुलत बहिणीच्या घरी पोचली होती. आईला फोन वरच्या संभाषणाने फार काळजी वाटली. ती तातडीने निघाली.

ती शाळेत मुख्याध्यापकांच्या खोलीत पोचली तेव्हा राहान हुंदके देत बसला होता. आई राहान च्या जवळ जाऊन गुढग्यांवर बसली. तिने राहान ला दोन्ही हातांनी पकडलं. आवाजात काळजी आणि निर्धार आणून ती बोलायला लागली.
“राहान परिस्थितीने तुला संधी दिलीय…मोठं व्हायची. स्वतःला कमतरतेसकट स्वीकारायची… तुला कळतंय ना मी काय बोलतेय. हे जे आहे तेच खरं आहे… हेच सत्य आहे… तुला तुझा निर्णय घ्यायचाय. राडायचंय की लढायचंय. लढायचं म्हणजे मारायला नकोय रे कुणाला. तू तुझ्या स्वभावाशी प्रामाणिक राहा. तू ठरव तुला काय करायचं… कारण हेच सत्य आहे राहान… आपले बाबा नाही आहेत राहान. ते गेले तेव्हाच तू मोठा झालायस. आता हे फक्त तू समजून घेणं बाकी आहे. समजून घे इथे तुला शिक्षक त्रास द्यायला मारत बोलत नाहीयेत. तुला तुझी जबाबदारी कळावी म्हणून बाळा. तू ही वेळेने दिलेली जबाबदारी उचलू शकतोस राहान. यु आर स्ट्रॉंग बॉय. हो ना. आणि काय फरक पडतो कोण कसं वागतं. महत्वाचं आहे तुला काय करायचंय. आणि जे काही घडतंय तुझ्या बरोबर त्याला तुला कसं रीऍक्ट करायचंय. तुला स्वतःच स्थान निर्माण करायचंय राहान. तुला पहिल्यांदा एव्हढे मार्क मिळालेत. मग छानच आहे ना. तुझा इथे छान व्यायाम होतो. यावर फोकस कर राहान. आणि तू जेव्हा सगळं व्यवस्थित शिकायला लागशील ना. तुझं मन तुझ्या गोल्स मध्ये रमेल. मग सगळं दुय्यम असेल. धिस एव्हरीथींग हॅपनिंग इज सेकंडरी राहान. डील विथ इट राहान! डील विथ इट!” आणि आई तशीच उठून परतली. तिने मागे ही वळून नाही पाहिलं. राहान स्तब्ध होता. पण त्याला कळलं होतं. धिस इज इट अँड आय हॅव टू डील विथ इट!”

दिवाळीच्या सुट्टीत राहान घरी आला तेव्हा त्याची मुद्रा प्रसन्न दिसत होती. आई सुखावली.
मुक्ता: “आई राहान ने काय केलं माहितेय?”
आई: “काय केलं?”
मुक्ता: “काहीच नाही केलं!”
आणि राहान मुक्ता दोघं हसायला लागले.
आई: “अरे काय हसताय…सांगा तरी मला.”
मुक्ता: “अरे सांगते काय, काहीच नाही केलं आणि तो नमीत त्याला त्रास द्यायचा थांबला.”
आई: “म्हणजे?”
मुक्ता: “अरे तो काही ना काही याला त्रास द्यायचा आणि राहान शांत राहायचा. टोटल इग्नोर… मग तो पण दमला. आई राहान इज जिनिअस ना?”
राहान मोठया मोठ्याने हसायला लागला.
राहान: “आई क्लास टेस्ट मध्ये मॅथ मध्ये मला आऊट ऑफ ट्वेन्टी नाईनटीन मिळाले.”
आई: “वाह काय सांगतो आहेस…”
आई राहान च्या जवळ गेली.
आई: “गुड बॉय!”
आईने राहान ला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात आसवं तरळली. पण या वेळी ही आसवं समाधानाची होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *