लग्नाचं वय! लग्नाचं वय! ऐकून साक्षी वैतागली होती.. पण वेळेत सगळ उरकलं पाहिजे हेही तिला कळत होतं. करिअर तर पुढे पुढे आव्हानं देतच राहातं.. शेवटी साक्षीने स्थळं पहायचं ठरवल.
आई: “सातार्डेकर एकदम विश्वासू आहेत. त्यांनी पूर्ण विचार करूनच हे स्थळ आणलं असणार. पहिलंच स्थळ आहे अजून पाहू असं म्हणून उगाच पुढे ढकलू नकोस.”
साक्षी:”हो ग आई… तू तयारी कर आधी पटापट.. उशीर झाला तर इम्प्रेशन वाईट पडेल.”
आई: “हा काय तुझ्या नोकरीचा इंटरव्ह्यू आहे इम्प्रेशन वाईट पडायला…”
आई आणि साक्षी कार ने निघाले आणि रेस्टॉरंट मध्ये वेळेत पोहोचले. सुमित आणि सुमितचे आई बाबा अगदी वेळे आधी येऊन रेस्टॉरंट मध्ये बसले होते. साक्षीला पाहून सुमितचा चेहरा खुलला.. पण सुमित मध्ये पाहताक्षणी छाप पडावी असं काहीच नव्हतं… दिसणं हे काही सक्षीच लग्नाचं प्रमाण नव्हतं.. म्हणून तिने त्याला बाद केलं नाही..
इकडची तिकडची बोलणी झाली. मुला मुलीला वेगळ बोलू द्यावं अस सुमितच्या आईच मत पडलं… मग त्या दोघांना बाहेर फिरून येऊ द्या असा विचार मांडण्यात आला आणि त्याला साक्षी तयार झाली.
सुमित: “माझी ऑफिसची मीटिंग आहे आठ वाजताची.. तुमची हरकत नसेल तर आपण उद्या भेटूया..”
साक्षी: “पण शनिवारी तुम्हाला सुट्टी असते ना.”
सुमित: “सध्या एक महत्त्वाचा प्रोजेक्ट येतोय तर थोड जास्त काम आहे.”
साक्षीच्या मनात पाल चुकचुकली.. हा वर्काहॉलीक आहे की काय. आताच असं बोलतोय तर नंतर मला वेळ देईल काय…
दुसऱ्या दिवशी सुमित आणि साक्षी बागेमध्ये भेटले.
साक्षी: “तुम्हाला काम खूप आवडत वाटत.”
सुमित: “तसं नाही पण काम केलं की त्यातल्या सगळ्या आव्हानांची मजा घेता आली पाहिजे. नाहीतर आयुष्य नीरस होईल.”
साक्षीला पटत..
सुमित: “तुम्हाला छंद जोपासायला वेळ मिळतो का?”
साक्षी: “आमचा टेरेस फ्लॅट आहे तर मला झाडं लावून त्यांची काळजी घ्यायला खूप आवडत..”
सुमित: “ओह.. काय योगायोग आहे. मलाही झाडांची काळजी घ्यायला खूप आवडत. आमच्या रो हाऊसच्या भोवती मोठी झाड पण लावलीत मी.. चिकू पेरू वगैरे..”
साक्षी: “काय म्हणता मग तर खूप मजा येईल”
सुमितने चमकून तिच्या कडे बघितलं आणि मिश्किल चेहरा करून विचारलं..
सुमित: “हा तुमचा होकार समजू का मी?”
साक्षी लाजली. आणि विषय बदलण्यासाठी म्हणाली
“अजून काय छंद आहेत तुमचे?”
सुमित: “वाचन! आता फार वेळ मिळत नाही पण पूर्वी मी खूप वाचायचो”
साक्षी: “कशा प्रकारचं वाचता तुम्ही”
सुमित: “मला काल्पनिक आणि माहितीपूर्ण असं दोन्ही वाचायला आवडतं.”
साक्षी: “मग सध्या काय वाचलं किंवा वाचताय?”
सुमित: “सृष्टीची रचना देवाने केली की उत्क्रांतीतून झाली याचा उहापोह करणारं एक पुस्तक आहे.”
साक्षी: “अरे वा! काय म्हटलंय मग त्यात?”
सुमित बोलत राहिला आणि साक्षी ऐकत राहिली.. मनाचे धागे एकमेकांत गुंफून एक सुंदर नक्षी बनू लागली..
दुसऱ्या दिवशी साक्षी प्रसन्न मनःस्थितीत उठली आणि तिला असं वाटून राहीलं की ही प्रेमाची जादू आहे का? …….
ऑफिस मध्ये तिचा नवीन मदतनीस येणार होता आज. तिला तिच्या सगळ्या कामाची रूपरेषा त्याला द्यायची होती. साक्षी ऑफिसमध्ये वेळेत पोहोचली आणि रिसेप्शन मध्ये एक खूप देखणा मुलगा बसलेला पहिला… साक्षीला पाहताच तो उठून उभा राहिला.
अद्वैत: “हॅलो साक्षी मॅडम!”
साक्षी: “ओह तुम्ही अद्वैत सावंत का?”
अद्वैत: “हो. गुलाम आपकी सेवा मे हाजिर है!”
साक्षीला पटकन हसू आलं…
साक्षी: “ओळखी करण्यात पटाईत दिसता तुम्ही…”
अद्वैत: “अजून खूप गोष्टीत पटाईत आहे.. आप आजमाके तो देखिये..”
साक्षी पुन्हा हसली
साक्षी:”तुम्ही मला ओळखलं कस?”
अद्वैत: “साक्षी मॅडम सुंदर आहेत असं म्हटल होत मला कुणीतरी..”
साक्षी परत हसली
साक्षी:”आशा करते तुम्ही बोलण्यात आहात तसेच कामात पण हुशार असाल.”
अद्वैत: “आशा नाही ऑर्डर.. तुम्ही ऑर्डर करायची आणि आम्ही ती चांगल्या प्रकारे पूर्ण करणार. बघालच तुम्ही”
साक्षीने दिवसभर अद्वैतला ट्रेनिंग दिलं.. पण दिवसाच्या शेवटीही ती टवटवीत फुलासारखी खुललेली होती.. आज ती जितकी हसली तेव्हढी ती कधीच हसली नव्हती….
दुसऱ्या दिवशी कसलंस स्वप्न बघत साक्षी उठली.. तिच्या अस्पष्ट जागृतीवर कुठलासा अस्पष्ट चेहरा येत होता… आणि थोड्याच वेळात तो चेहरा स्पष्ट झाला… अद्वैत… अद्वैत हात पसरून तिला मिठीत बोलावत होता आणि साक्षी ताडकन उठली.. तिला आठवल तिने सुमितकडे वेळ मागितला होता की आपण एकमेकांना अजून ओळखुया.. लग्नाची घाई आणि ओझं वाटायला नको… ती संध्याकाळी सुमितला भेटणार होती… आणि तिला मेल्याहून मेल्यासारख झालं.. अद्वैतचा चेहरा असा का शिरू पाहतोय माझ्या मनात…
ती ऑफिसला पोहोचली तेव्हा अद्वैत कडे बघायची तिची हिम्मत होईना.. ती त्याच्याकडे बघायचं टाळून त्याला काम समजावत राहिली.. अद्वैत तिच्याकडे रोखून एकटक बघतोय असं काहीतरी तिला जाणवल आणि तिने त्याला थोडंसं स्पष्ट शब्दात विचारलं.
“असे काय बघताय?”
अद्वैत: “मी??? मी बघतोय की तुम्ही फारच गंभीर दिसताय कालच्यापेक्षा.. एनी प्रॉब्लेम?”
साक्षीला जाणवलं आपण नॉर्मल वागायला हवं
साक्षी: “असं काही नाहीय..”
असं म्हणत तिने छोटंसं स्मितहास्य दिलं…
अद्वैत: “मला वाटल तुम्ही माझ्या प्रेमात पडलात..”
साक्षीने ताडकन अद्वैतकडे पाहिलं…
अद्वैत:”तुम्हाला हसवायला बोललो मी, तुम्ही तर अजून सीरियस झालात..”
साक्षी संभ्रम लपवायला खोटं खोटं हसली…
पण अद्वैत हुशार होता.. तिच्या नजरेची भाषा त्याला कळली. त्याला अंदाज आला की काहीतरी साक्षीच्या मनात चालू आहे.. साक्षी सुंदर होती.. मोकळ्या आणि छान स्वभावाची वाटत होती.. अद्वैत पेक्षा जास्त कमवत असेल पण तिला त्याचा गर्व होण शक्य वाटत नव्हत.. अद्वैतचही लग्नाचं वय झालंच होत ना… दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि नजरा नजर झाली…. त्याची प्रश्नार्थक नजर जणू काही विचारत होती मी होऊ शकतो का तुझा लाईफ पार्टनर?
दुसऱ्या दिवशी रविवार होता. साक्षीला सात वाजता जाग आली. आज जरा मलूल वाटत होतं तिला. तिच्यासोबत जे होतंय ते बरोबर आहे की चूक असा संभ्रम होता. दोन ऑप्शन असणं स्वतःला ग्रेट समजणाऱ्या लोकांना सॉलिड वाटेल पण साक्षीची विवेकबुद्धी तिला ही घटना आवडू देईना. ती उठून बसली. तिने फोन हातात घेतला. आणि सहजच फोन बुक मध्ये जाऊन तिची बोटं नंबर चाळू लागली. तिने बोटाने स्क्रोल केलं आणि नंबर लिस्ट गरकन वर जाऊन एका नंबर वर येऊन थांबली. मेधा… कधी कधी योगा योगाचा असा अद्भुत कळस होतो की देवावर विश्वास दृढ होतो.
साक्षीने प्रसन्न होऊन एक समाधानाचा श्वास घेतला. मेधा एक अतिशय हुशार स्मार्ट अशी मॅरेज कौन्सेलर होती. साक्षिला मॅरेज कौन्सेलर वगैरे थेरच वाटायची. पण आज तिला त्याच महत्त्व पटल. या परिस्थितीत मेधाच आपल्याला मदत करू शकते याची तिला खात्री पटली आणि ती उत्साहाने बिछान्यातून बाहेर पडली…
कॉफी शॉप मध्ये मेधा आणि साक्षी बसले होते. साक्षी ने सगळी परिस्थिती मेधाला सांगितली होती.
मेधा: “तुला सुमित बद्दल काही फिलिंग्ज आहेत तरी का? कारण आफ्टर ऑल इट्स अरेंज थिंग…”
साक्षी: “सुमित कडे सेटल्ड आयुष्य आहे, पैसा आहे. तर अद्वैत कडे बहारदार व्यक्तिमत्त्व..”
मेधा: “हे बघ पैसा आणि वर वरच व्यक्तिमत्व या सुरुवातीला दिसणाऱ्या आणि आकर्षित करणाऱ्या गोष्टी असल्या तरी सहजीवनात त्यांचं महत्त्व दुय्यम असू शकत. खास करून तुझ्यासारख्या वैचारिक रित्या प्रगल्भ मुलीसाठी. सहजिवनासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एकमेकांशी जुळण. तुला कोणत्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या तू तडजोड करू शकतेस हे पाहण अतिशय महत्त्वाचं आहे.”
साक्षी: “एव्हढ कस ठरवणार ज्याबद्दल काहीच माहीत नाही त्यात.”
मेधा:”त्यासाठी तुला दोघानाही भेटाव लागेल आणि तेही बऱ्याचदा.”
साक्षी:”अग तू काय मला डबल टायमिंग करायला सांगते आहेस.”
मेधा:”हे बघ तुला नाही करायचं तर स्पष्ट एकाला सांग सिच्युएशन.”
साक्षी:”पण मला असं दोघानाही तोडवस वाटत नाहीय.”
मेधा:”दोघांना सांगून बघ मग कदाचित एक स्टेप मिळेल तुला या प्रॉब्लेम मधून पुढे जाण्याची!”
साक्षी: “बर…”
सोमवारी साक्षी ऑफिस मध्ये गेली. ती आता खूप नॉर्मल झाली होती. अद्वैत तिच्या आधीच ऑफिसमध्ये येऊन बसला होता. त्याने एक नजर साक्षी कडे पाहिलं आणि साक्षीने स्मितहास्य केलं.
अद्वैत उठून सक्षिकडे आला.
अद्वैत:”ऑर्डर लेने के लिये बंदा हाजिर है”
साक्षी हसली..
साक्षी:”आज खूप काम आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नेहमी असत.”
अद्वैत: “इतकं काम आहे की गुलाम राणी साहेबाना संध्याकाळी कॉफी साठी नाही नेऊ शकणार?”
साक्षी: “मी संध्याकाळी बाहेर आहे… एक स्थळ आलंय त्यांना भेटायला चाललेय.”
अद्वैतचा चेहरा लगेच बदलला. आणि तो रागिष्ट चेहरा करून पटकन वळून जागेवर जाऊन बसला. साक्षीला हे अजिबात आवडल नाही. एव्हढा राग आणि काहीच समजूतदारपणा नाही. तिला वाटल होत अद्वैत यावरही काही विनोद करेल आणि हसण्यावारी नेईल पण अपेक्षा भंग झाला होता…. अद्वैत दिवसभर तुसड्या सारखा वागत राहिला. आणि साक्षी मलूल झाली.
संध्याकाळी साक्षी सुमित बरोबर बागेत बसली होती. ती शांत शांतच होती.
सुमित: “काही झालय का?”
साक्षी: “मी तुम्हाला खर सांगू? ऐकण्याची तयारी आहे तुमची?”
सुमित:”हो नक्की. जे काय असेल ते मोकळेपणाने सांगा.”
साक्षी: “तुम्हाला भेटल्याच्या दुसऱ्या दिवशी मला ऑफिसमध्ये दिलेला नवा असिस्टंट जॉईन झाला आणि का कोण जाणे आम्ही एकमेकांकडे अट्ट्रॅक्ट झालो.”
सुमितचां चेहरा थोडा पडला.
सुमित:”मग काय ठरवताय तुम्ही.”
साक्षी:”अजून काहीच नाही.”
सुमित: “ह्ममम… तुम्ही हवा तेव्हढा वेळ घ्या.”
साक्षीने सुमितकडे भावनाविवश होऊन बघितलं. त्याच शांत राहण, समंजसपणे बोलण तिला खूप आवडलं आणि तिला सुमित सुंदर दिसू लागला.
असेच काही दिवस गेले आणि अद्वैत पुन्हा सक्षिशी कामाव्यतिरिक्त बोलायला लागला.
अद्वैत: “ठरल का मग लग्न?”
साक्षी:”नाही अजून काही ठरवल नाहीय मी.”
अद्वैत हसला
अद्वैत: “ज्याचा नशिबात असणार त्यालाच मिळणार राणी सरकार. आपण लग्नाची शक्यता पडताळली तर?”
साक्षीला हे एकदमच अनपेक्षित होत. पण हे असं तिला खूप छान वाटल. एकदम छान.
ती हसायला लागली.
त्या संध्याकाळी दोघे समुद्र किनारी गेले. अद्वैतने स्वतःबद्दल सगळ साक्षी ला सांगितलं आणि साक्षी ने अद्वैतलां. साक्षी आधीचे काही दिवस सुमितलाही भेटत होती. त्यामुळे सुमितही साक्षीला चांगला कळला होता.
रात्रीच्या जेवणाला साक्षी मेधाला भेटली
मेधा: “हा घे पेपर. दोन कॉलम कर. एका बाजूला लिही सुमित एका बाजूला लिही अद्वैत. आणि दोन्ही कॉलम चे आणखी दोन कॉलम कर. एका बाजूला लिही पॉझिटीव्ह एका बाजूला लिही निगेटिव्ह. आतापर्यंत त्या दोघांविषयी जे काही कळलंय त्याची यात मांडणी कर. साक्षी ने सांगितल्याप्रमाणे करायला सुरुवात केली.
सुमित – सकारात्मक – समजूतदारपणा, जसे आपण आता राहतो तसं राहणीमान ठेवू शकतो, स्वतःची स्पेस देतो, कुठलीही गोष्ट शांतपणे हॅण्डल करतो, हवं ते करायचं स्वातंत्र्य देतो, तडजोड करायला तयार असतो.
अद्वैत – सकारात्मक – तल्लख विनोदबुद्धी, दिसायला साजेसा, राग मनात ठेऊन राहत नाही, कामात हुशार असल्याने आर्थिक दृष्टीने स्थिर होऊ शकतो, मला आलेल्या रागाला पटकन घालवू शकतो मस्करी करून, सतत प्रेम व्यक्त करत राहतो.
सुमित – नकारात्मक – कमी बोलतो, विनोदबुद्धी फार नाही, थोडा कामात गुंतणारा वेळ कमी देऊ शकतो
अद्वैत – नकारात्मक – पटकन खूप रागावतो, आर्थिक रित्या तडजोड करावी लागेल, मुडी
साक्षीने तो कागद मेधाला दिला. मेधाने तो वाचला.
मेधा: “आता यातले कोणते गुण तुला खूपच आवडतात आणि खूप आवश्यक आहेत तू स्वतःला ओळखतेस त्यावरून आणि कोणते तू अजिबात सहन करू शकत नाहीस याची लिस्ट काढ. तू स्वतःला लहानपणापासून ओळखतेस तर उगाच तू आतापर्यंत न केलेल्या गोष्टी गृहीत धरू नकोस. स्वतःचा स्वभाव ओळखून लिही”
साक्षीने सगळ्या कागदावर नजर फिरवली आणि लहानपणापासून स्वतःला आठवल. आपण कधी कसे वागतो आणि आपल्याला काय हवंय याचा उहापोह केला. आणि लिहायला सुरुवात केली.
‘खूप आवश्यक आहे समजूतदारपणा कारण आपण थोडे रगिष्ट आहोत. आपण स्वतंत्र वृत्तीचे आहोत म्हणून तडजोड करणारा साथीदार हवा. राग येणारा नवरा केला तर सततची भांडण होत राहतील आणि आपल्याला शांतता आवडते. विनोदबुद्धी असणं आणि राग पटकन निघून जाणं जरी खूप छान असल तरी त्याचं महत्त्व माझ्यासाठी समजूतदारपणा असल्यापेक्षा महत्त्वाचं नाहीय. कुणीतरी आपलं शांतपणे ऐकून घेणं आणि समजावून अडचणीत मदत करण आपली सतत तारीफ करण्यापेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. दिसणं कितीही आकर्षक असल तरी आपला मेंदू सांगतोय दिसण दुय्यम आहे’
तिने एकदा पुन्हा नीट कागदाकडे बघितलं विचार केला आणि उत्तर लिहिलं सुमित आणि त्यावर बरोबरची खूण केली. आणि तो कागद खुश होत मेधाकडे सरकवला.
काँग्र्याचूलेशन्स!!! तुझी निवड करून झालीय
आणि सक्षिशी हात मिळवला.
साक्षी लग्नात खुश होती. अद्वैत तिच्या लग्नाला आला नाही. त्याने साक्षीने दिलेली पत्रिका टेबलावर भिरकावून दिली होती आणि समोरून निघून गेला होता. साक्षीला खूप राग आला होता या वागण्याचा. तिने अद्वैतला कोणतीही हिंट दिली नव्हती त्याने असं वागायला. पण तो लग्नाला आला नव्हता तेच बर होत. माणसाने जून सारं सोडून द्यावं आणि आणि स्वतः केलेल्या निवडीत सुखाने राहावं. सगळ्यांनाच निवड करायची संधी मिळत नसते……