गजराच्या आवाजाने निमिता उठली. बघते तर घड्याळात फक्त ५ वाजले होते.
‘असा कसा ६ चा गजर ५ ला वाजला?’
आणि तिने गजर बंद केला. खिडकीच्या बाहेरही अंधार होता.
‘एक तास झोपू शकतो आपण. नाहीतरी रात्रभर कुठे झोप आली. बॉस ने काय अपमान केला सगळ्यांसमोर… तेव्हापासून झोपच आली नाहीय ना नीट. पहिल्या रात्री तर रात्रभर टक्क जागी होते. भूकही लागतेय अस वाटत नाहीय तेव्हापासून. रूटीन चालवायचं फक्त आपलं. आईला कळायला नको. तिने आयुष्यातली सगळी आव्हानं समर्थपणे पेलली. तिला वाटेल काय ही आपली मुलगी. साधं ऑफिसचं काम नीट जमत नाहीय. लागल्यापासून ओरडा खातेय. स्वतःवरचा विश्वास हळू हळू संपूनच जाईल की काय असं वाटतय…..
……….
अरे विचार करता करता ६ वाजले.. चला इच्छा नसली तरी तयारी करावी लागेल..’
जड मनाने आणि शरीराने निमिता उठली
किचन मध्ये आई जेवण बनवत होती…
‘अरे हे काय आज आईने चक्क ड्रेस घातलाय.. रात्री तर साडीवर होती… कधी आऊटस्टेशनला जाताना ड्रेस घालते ती फक्त…’
निमिता: “आई”
आई: “काय ग”
आईने वळून बघितल
‘हीचे डोळे असे खोल का गेलेत? डोळ्यांखाली एका रात्रीत एव्हढी काळी वर्तुळ झाली… आईला आपली अपमानास्पद कहाणी कळली की काय आणि ती रात्रभर रडली की काय?
नकोच बोलायला आईशी…’
निमिता पटापट बाथरूमच्या दिशेने गेली… बाथरूममध्ये शिरली आणि दरवाजा बंद केला.. दरवाजाच्या मागे एक दोन नाही ५ पाली… ‘पाचही जणी डोकं वर करून जणू माझ्याकडेच बघत आहेत… काय करू…’
निमिता घाबरून गेली… पण आईकडे जायचीही भीती वाटत होती.. घाईघाईत आटपलं सगळं आणि बाहेर पडली……
बॅग घेऊन चालती झाली.. पण रस्त्यावर चालताना सगळीच माणस तिच्याकडेच बघत होती आणि काहीबाही बोलत होती…
‘एकतर या आड मार्गाला माणसांची एव्हढी गर्दी असण्याचं कारण नाहीय… आणि या माणसांना माझ्याकडेच बघून काय बोलायचय… काही कळतच नाहीय…’
गप्पपणे बस स्टॉप वर उभी राहिली… बस आली आणि निमिता बस मध्ये चढली…खिडकीतून बाहेर बघितल तर रस्त्यावर कोण गर्दी.. नुसती चेंगरा चेंगरी चालली होती…
‘हा गर्दीचाच रस्ता पण म्हणून इतकी गर्दी???? हे काहीतरी विचित्रच…’
तितक्यात बस मधला एक माणूस मध्येच उठून ओरडला
“ए निमिता…” आणि खाली बसला.. निमिताने दचकून पाहिलं…
‘निमिताच बोलला ना तो की नाही वेगळं.. नाही वेगळं कुठे मी स्पष्ट ऐकलं… बापरे कोण हा.. दारू पिऊन बस मध्ये चढलाय का? पण याला माझं नाव कसं माहिती?’
हळू हळू बस मधली गडबड खूपच वाढायला लागली…
‘इतकी का बोलताहेत माणस.. त्रास होतोय मला…’
बस पुढे जाईपर्यंत बस मधले आवाज वाढतच गेले… आणि तितक्यात तो वेडा माणूस पुन्हा उठून ओरडला…
“ए बावळट निमिता”
निमिता घाबरून गेली… तितक्यात बस कंडक्टर ओरडला “एम एच बी”
‘अरे हा तर माझा स्टॉप! बापरे! आला पण’
निमिता धक्के मारत घाई घाईत दरवाजाजवळ गेली.. सगळे तिच्याकडे वैतागून पाहत राहिले…ती उतरली… भांबावत चालत गेट मधून आत आली.. पॅसेज मधल्या कारंज्याजवळ कुणीतरी ओळखीचं उभ होत…
‘अरे आपले मराठीचे सर.. ते इथे काय करताहेत… पण आता त्यांना ओळख दाखवून काय करू? काय सांगू की मी आयुष्यात मागे पडलेय… किती कौतुक होत त्यांना माझं’
ती सरांच्या बाजूने पटापट पुढे जाऊ लागली… सर फोन वर बोलत होते
“निमिता तुला म्हटल होतं धीट हो… नुसत हुशार असून चालत नाही. स्वतःचा मुद्दा नीटपणे मांडता आला पाहिजे”
‘अरे सर फोन वर बोलताहेत की माझ्याशी??? आणि एव्हढे रागावून बोलताहेत… काहीच कळत नाहीय काय चाललय…”
निमिता धावतच लिफ्ट मध्ये गेली..तिने चौथ्या माळ्याच बटण दाबल… लिफ्ट पण जणू काही भराभर वर जात होती… लिफ्ट खूपच जोरात वर जाऊ लागली आणि निमिताचे ठोके वाढले… तितक्यात चररकन मोठा आवाज झाला आणि लिफ्ट मधले दिवे गेले…. निमिता घाबरून ओरडली… तिसऱ्या माळ्यावर लिफ्ट उघडली आणि निमिता धाडकन लिफ्टच्या दरवाजाच्या बाहेर कोसळली…….
निमिताची आई आणि डॉक्टर रूम मध्ये बसले होते.. निमिताशी बोलून झाल्यावर डॉक्टरांनी तिला बाहेर पाठवलं होत आणि ते आईशी बोलत होते..
“हा मानसिक आजाराचा प्रकार आहे आणि तो कोणत्याही वयात उद्भवू शकतो… याची नक्की कारणं अजून स्पष्ट नाहीयेत… पण काळजी करू नका हा आजार गोळ्यांनी कंट्रोल मध्ये राहतो..’
आईच्या डोळ्यात आसव तरळली आणि तिने बाहेर बसलेल्या निमिताच्या दिशेने ममतेने भरलेल्या हृदयाने आणि काळजीने भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं…
👌🏼
मस्त गोष्ट पिंकी