फोनच्या एस एम एस ची रिंग वाजली. कामात व्यग्र असलेल्या मनिषाने लॅपटॉप च्या स्क्रिन वरचं लक्ष न हटवता फोन उचलला आणि पटकन बघूया असं ठरवत एस एम एस वाचला. “अरे !!!” आणि तिचा चेहरा आनंदाने उजळला… ती उत्साहात उठली… पण सभोवती बघितल्यावर तिला जाणवलं, इथे ऑफिसमध्ये कुणाबरोबर हा आनंद वाटणार!!! आणि ती खाली बसली. पुन्हा एकदा एस एम एस वाचून ती समाधानाने हसली आणि तिला कुठेतरी वाचलेलं आठवलं. ‘जगातले सगळ्यात सुंदर शब्द “आय लव्ह यु” नसून “सॅलरी क्रेडीटेड” हे आहेत’ आणि ती स्वतःशीच हसली. ती या वाक्याचा पुरेपूर अनुभव घेत होती. तिचा पहिला पगार झाला होता!!!
संध्याकाळी घरी जाताना ती मिठाईच्या दुकानात गेली. लहानपणी तिच्या वडिलांनी तिला दिलेली, त्यांच्या मालकाने त्यांना दिलेली, रसमलाई ही मिठाई तिच्या चांगलीच लक्षात राहिली होती. तिने घरातल्या ती धरून चार माणसांसाठी प्रत्येकी एक असे चार रसमलाईचे तुकडे घेतले. पैसे देताना ती महाग स्वस्त अशी विशेषणं विसरून गेली होती. तिने घेतलेली ही तिच्या आणि तिच्या घरच्यांच्या आयुष्यातली पहिली गोष्ट. तिला आज तिच्या वडीलांच्या काळवंडलेल्या चेहऱ्यावर आनंद दिसणार होता. तिच्या सतत आजारी पडणाऱ्या आईच्या काळज्यांचा फार विचार न करता तिच्या वडिलांनी तिला पदवीधर बनवलं होतं. तिला मुळीच आवड नव्हती अभ्यासाची पण आज तिला त्यांची दूरदृष्टी पटली होती. तिला एम. ए. करायचं होतं आता. बरंच काही होतं तिच्या पैशांनी करायचं. आईचे रिपोर्ट्स काढायचे होते लगेचच. सगळ्यांसाठी नवीन कपडे, बाबांचा चष्मा, आणि दिन्याला चहाची टपरी काढून द्यायला पैसे जमवायचे होते…. आज ती मनसोक्तपणे दुकानांच्या आत काय काय आहे बघत होती. मोठं होता होता जगातली कोणतीच गोष्ट आपल्यासाठी नसते असं मानलं होतं तिने. हळू हळू या मानण्याला तडे पाडायचे होते तिला असं तिच्या स्वप्नाळू डोळ्यात व्यक्त होत होतं. तितक्यात ती एका दुकानासमोर थबकली…..तोच रंग, तशाच उशा, तेच डिझाईन…समोर ठेवलेल्या टेबल वर छोटा बोर्ड पण होता ‘ड्यूरिअन’आणि ती त्रस्त झाली…………. “आई हिचे कपडे कित्ती खराब आहेत आपला सोफा खराब होईल ना!” मालकिणीने स्वतःच्या मुलीला दटावलं होतं पण अपमान तर झाला होता ना… मनीषा तेव्हा सहा वर्षांची होती. तिला तिथून पळून जायचं होतं… पण तरीही ती मालकांच्या प्रेमळ समजावण्याने आणि आईच्या असहाय्य स्वभावामुळे बसून राहिली. तिला तेव्हा सगळ्यांपासून नजर चोरायची होती आणि या घटनेशी जोडलेला एकमेव निर्जीव साक्षीदार तिला मान खाली घातल्यावर दिसत होता…तो सोफा! त्या मौल्यवान सोफ्याला तिने असूयेने नीट पाहून घेतलं होतं. समोर चहाच्या कपाच्या बाजूला त्या नव्या सोफ्याचे कागद पडले होते… त्यावर लिहिलं होतं ‘ड्यूरिअन’….
“मेरे लिये कुछ भी नही लायी तू! जा अभी तू घर..” “अग तू सांग तर मग आणणार ना मी!”
“ऐसा पूछके कभी गिफट लाते है क्या?”
” हो मी आणते पुछके… आता सगळ्या आनंदावर पाणी फिरवू नको. तुझा आशिक आलाय बघ.. पटकन सांग काय हवं आणि जा.”
“मैं नही जा रही आज। हमारा झगड़ा हुवा।”
“ओह तभी तेरा मूड खराब है!”
“अच्छा ये बोल, खुदके लिए क्या लेगी?”
मनीषा थोडी विचारात पडली. हा विचार तिने केलाच नव्हता. तिच्या डोक्यात काही आलं आणि ती बोलली
“सोफा”
“सोफा!!! पागल हो गयी क्या? खुद के लिये कोई सोफा लेता है? ये ऐसे झोपडी मे तू सोफा रखेगी?”
“झोपडी मत बोल! पक्का घर है वो। वो बेड हटाके सोफा रखेगी। फिर मस्त सोयेगी!!!”
दिया हसली.
“ऐक ना! तू चल ना माझ्याबरोबर दुकानात! चौकशी करूया.”
“चलेगा। कब जाना है?”
“उद्या संध्याकाळी ये चायनीज कॉर्नर जवळ. सहा वाजता.”
दिया आणि मनीषा दुकानात सोफा बघत होते. दुकानाचा रिप्रेझेन्टेटिव्ह त्यांच्या जवळ आला आणि त्याने सुंदर स्मित दिलं.
“मॅम 57,890 ओन्ली!”
दिया जवळ जवळ ओरडलीच.
“चल मनीषा।”
आणि तिला ओढत न्यायला लागली.
“अरे रुक ना…हा इतका महाग का आहे?”
“क्वालिटी आहे मॅम. प्रीमियम लेदरेट वुइथ किल्न ड्राय सॉलिड वूड फ्रेम. प्रीमियम हाय डेन्सीटी फोम, ब्रँड आहे मोठा ड्यूरिअन.”
मनीषा विचारात पडली आणि तिच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. ते पाहून तो माणूस लगेच म्हणाला
“२००० रुपयांत विकत घेऊ शकता मॅम. इ एम आय वर! दर महिन्यात फक्त २००० द्या २९ महिने फक्त! मग तुम्हाला सोफा ५८००० ला मिळणार. जास्त फरक नाहीय पण फायदा बघा कसा, २००० त लगेच सोफा घरी. पत्ता द्या, होम डिलिव्हरी.”
“रुम नंबर २०३, पुढची वाडी, नाहूर रोड, इंदिरा नगर, मुलुंड वेस्ट.”
दिया आश्चर्याने डोळे विस्फारून मानिषाकडे बघायला लागली. पण तिचा कमालीचा उजळलेला चेहरा पाहून काही बोललीच नाही.
“तुम्हाला मी पेमेंट बद्दल सांगतो आता. डिलिव्हरी कधी हवी?”
“चालेल आत्ताच!”
दिया तिचा हात ओढून हळूच म्हणाली,
“अरे क्या अत्ता, रुम में बेड पड़ा है उसका क्या करेगी?”
“अरे हा! उद्या..”
दिया: “परसो करा परसो…समजा भय्या!”
आणि मनीषाला हळूच म्हणाली.
“एक दिन सोचले पागल!!”
मनीषा ऑफिसमधून भरभर घरी येत होती. तिला आईसाठी आजची डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली होती आणि सोफा पण डिलिव्हर होणार होता. घरात खूप वाद झाले होते सोफ्यावरून पण ती ठाम राहिली. आधी जाऊन ती निवांत सोफ्यावर बसून पाणी पिणार होती मग आईला घेऊन निघणार होती. घराजवळ आल्यावर तिचा वेग आणि उत्कंठा वाढली. पण घराजवळ गर्दी झालेली तिला दिसली. सोफा पाहायला सगळे शेजारी पाजारी जमले असतील असं वाटून ती हसली. ती घरात शिरली तर तिने पाहिलं सोफा तर आलाय पण त्यावर आई कसातरी चेहरा करून पडलीय. तिला खूप काळजी वाटली आणि बाजूला बसलेल्या बाबांना तिने विचारलं.
“काय झालं आईला?”
“चक्कर येऊन पडली म्हणून अपॉईंटमेंट लवकर करून गेलो आम्ही तिला घेऊन.”
आणि ते मनिषाला स्वयंपाकघरात घेऊन गेले. तेव्हा तिला त्यांचे लाल झालेले डोळे दिसले.
“कुठला दुर्मिळ बरा न होणारा आजार झालाय. फुफुसाचा फायब्रोसिस की काही. जास्तीत जास्त २ ते ३ महिने जगेल.”
असं म्हणून त्यांना जोरात हुंदका फुटला. मनिषा पूर्ण घाबरून गेली. तिने दारात येऊन केविलवाण्या नजरेने आईकडे पाहिलं. सगळा त्रास अंगावर काढला होता तिने. काही कल्पना येऊ दिली नव्हती त्रासाची कुणाला. गरिबीने असहाय्य झालेल्या त्या जीवाला काही आशाच दिसली नव्हती का?
आईसाठी ऑक्सिजनच मशीन, औषधं, शक्य होतील तेव्हढे उपचार होणं गरजेचं होतं. खर्च होता आणि मनही बंदिस्त झालं होतं. मानीषाला जमेल तेव्हढी सुट्टी घेऊन, लवकर येऊन घरची जबाबदारी, आईची काळजी घेणं भाग होतं.
असेच दिवस जात होते. सोफ्यावर निस्तेज होत जाणारी आई पाहाताना तिला गलबलून येई. मृत्यूची वाट बघत पूर्ण घर केविलवाणं झालं होत.
सगळा भार मनिषाच्या खांद्यावर होता. आईची औषधं, घर सांभाळता सांभाळता तिचा पगार संपत असे. आणि सोफ्याचे हफ्ते तसेच राहून जात. असं किती दिवस चालणार! सोफा घेतलेल्या दुकानातून तिला फोन यायला लागले. ती कळवळून विनंती करत असे. पण व्यवहाराला इथे पर्याय नव्हता.
एक दिवस असच ऑफिस मध्ये ती कामात लक्ष गुंतवत असताना तिचा मोबाईल वाजला. बाबांचा फोन होता, तिच्या काळजात धस झालं.. तिने फोन पटकन उचलला आणि घडू नये तेच घडल होत. क्रूर मृत्यूने तिच्या आईला ओढून नेलं होत…
धावत पळत ती घरात शिरली तेव्हा आईचं शव गोधडीवर ठेवलं होत. तिला थोड्या वेळ काहीच कळेना आणि तिचा फोन वाजला. तिने न बघताच उचलला. पलीकडून सोफ्याच्या दुकानाचा दुकानदार बोलू लागला.
“मॅडम मैं विकास चढ्ढा बोल रहा हूं, एलिगंट फर्निचर से।”
“हा बोलिये।”
“अरे ऐसा कैसे चलेगा सोफा उठाना पडेगा हम को। आप पैसा दे ही नही रही हो।”
मनीषा जड आवाजात बोलली
“कल लेके जाओ।”
मनीषाने फोन ठेवला आणि एक नजर सोफ्याकडे पाहिलं. तिला एक मोठा शून्य दिसला… आईच्या निस्तेज चेहऱ्याकडे पाहून ती धाय मोकलून रडू लागली.