दोस्तांच्या ग्रुप वर वायफळपणा करताना थिल्लर अतीहुशारी करण्याचा माझा नेहमीचा छंद उफाळून आला आणि मी म्हटल, मी ९०% निर्वाण स्थितीत जगते. अर्थात नेहमीप्रमाणे बहुतेकांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. पण एक गंभीर अभिप्राय आला. निर्वाण १००% असावा.
एकदा कुठल्या ग्रंथातल्या विचारावर घरात चर्चा चालू होती, अलिप्तता म्हणजेच detachment वर. संसारात राहूनही त्यापासून अलिप्त राहणं वगैरे… मी या संकल्पनेचा कडाडून विरोध केला.. (मी तेव्हाच कुठल्यातरी लादलेल्या अलिप्ततेतून जात असावे… मी विरोधमुर्तीच आहे अशा माझ्या दोस्तांच्या मताशी मी अजिबात सहमत नाहीय)
एखाद्या गोष्टीची मजा घेतली नाही तर ती कराच कशाला आणि देवाने बनवले असू शकलेल्या अशा आपल्या अद्भुत पंचेंद्रियांवर मात करायची अद्भुत सिद्धी माझ्यासारख्या पामराने तरी कुठून मिळवायची? असो. एखादा गुरू मिळून मी ज्ञान मार्गावर जाण्याचा योग अजून तरी आला नाहीय.
पण पामराला प्रश्नचिन्ह बनून जगायचं नसेल तर स्वतःच उत्तर तर शोधावं लागत. आणि या पामाराने हा स्वतःचाच मार्ग आखलाय.
काही असेल तेव्हा धमाल आणि ते नसेल तेव्हा एकदम निर्वाण.. शांती… जरी आत्ता आत्मा विषयाधिन देह सोडून जाऊ म्हणतो तरी ना नाही… आणि देह तंगड्या पसरून OTT वर चाललेली रंगेल सिरीज बघत, झोम्याटो वरून आयते मागवलेले चिकन लॉलीपॉप खाऊन पडून राहू म्हणतो तरी त्यातही आत्मा रंगून जाई… दोस्त असतील तेव्हा पार्टी रंगेल आणि एकांतात देह तल्लीन होऊन निरवतेच्या अभंगात दंग होईल…
असतील पैसे तर होईल खर्च आणि रस्त्यावर जरी आले तरी हरवणार नाही जीवनाचा अर्थ..
मी ज्या पद्धतीने सगळ्यातून स्प्रिंग सारखी उडून फार वेळ न कुरकुरता आणि कुणाशीही संबंध न तोडता किंवा फार काळ दोष न देता, समतोल स्थितीत येते त्याला लोक ‘तू ग्रेट आहेस एकदम’ अस तरी म्हणतात किंवा ‘एकदम अनिश्चित बालिशपणा’ असही म्हणतात. पण ९०% निर्वाण हा जीवन मार्गातल्या खड्डेरुपी दुःखांवरून उडी मारून जाण्यासाठी आणि आनंदाचा व सुखांचा येथेच्छ उपभोग घेण्यासाठी शोधलेला माझा स्वतःचाच hack आहे.. and i am happy to be greatest hacker of life!!!