Intense Marathi Articles

Mother’s Day

Mother’s Day

माझ्या मानसिक आजाराची सुरुवात नक्की कधी कशी झाली हे सांगता येत नाही. पण कॉलेजमध्ये असतानाचं ठळक आठवतं. कॉलेजमध्ये विशेषकरून आर्ट्स मध्ये काहीच कष्ट नसतात. ट्रेनचा प्रवासही ऑड वेळा असल्यामुळे आरामाचा असायचा. बऱ्याच वेळेचं आठवतं. शून्य मनस्थितीत उठून, शून्यातून प्रवास करून पोहोचायचं. लेक्चर्सना शून्यात नजर लावून बसायचं. आजूबाजूचे दोस्त आणि इतर लोकांचे शून्य अर्थांचे आवाज… मग कॉलेज संपलं की घरी येऊन स्वतःच एक शून्य होऊन सोफ्यावर पडून राहायचं. ती थिजलेली भयाचं आवरण असलेली अवस्था माझ्या अजूनही भेटीला येते. पण तेव्हा तिचं आवरणही खूप मजबूत होतं आणि ती सतत मला गुंडाळून असायची. खूपदा आठवतय मी अशी गलितगात्र पडलेले असताना स्वयंपाक घरातून भांड्यांचे, बांगड्यांचे, स्वतःशीच बोलण्याचे जिवंत आवाज यायचे. त्या तुटून लोंबकळलेल्या फांदीच्या अवस्थेत एका अभेद्य, प्रेमळ खोडामुळे आपण अजून सावरून आहोत ह्या एका सुरक्षिततेच्या भावनेला मी घट्ट धरून बसायचे. ती प्रेमाने उठवायची, जेवण द्यायची, माझ्या अवस्थेला पूर्णतः समजून माझ्या मनातले अश्रू स्वतःच्या डोळ्यातून व्यक्त करणारी एकमेव व्यक्ती माझी आई… नंतर तो भक्कम प्रेमळ डोलारा निखळून पडला आणि सगळं घर विखरून गेलं. तेव्हा रिकाम्या घरात गर्द एकांतात नैराश्याच्या कड्यावर मी बेंबीच्या देठापासून रडताना स्वतःला आठवते तेव्हा स्वतःचीच खूप कीव येते.
Mother’s Day तर रोजच असतो म्हणतात. हो तो रोजच असतो. आणि माझ्यासाठी तो आता कधीच नसेल…

– शीतल मुळीक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *