Marathi Short Stories

पाणी

पाऊस तर थांबतच नव्हता. तिसऱ्या मजल्यावरच्या सक्सेनांकडे राऊतांच कुटुंब येऊन थांबलं होतं. चौपाटीजवळ कौतुकाने घेतलेलं घर, अतिशय विचार करून साकारलेलं इंटिरिअर… ते पण याच वर्षी. सौ राउतच नाही तर श्री राऊतांच्या मनातसुद्धा हेच विचार चालले होते. फक्त पूर्ण कुटुंबाने धीर सोडू नये म्हणून ते भीती आणि त्रास चेहऱ्यावर येऊ देत नव्हते. पाणी घरात शिरलं आणि शक्य तेव्हढं महत्वाचं सामान घेऊन नवरा बायको व त्यांचा एक मुलगा एक मुलगी असं चौकोनी कुटुंब सक्सेनांच्या घरात आलं. पण पाऊस तर अविरत चालला होता… सगळेच शांत बसले होते आणि सौ सक्सेना स्वयंपाकघरातून आल्या.
सौ सक्सेना: “खाना लगाया है। खा लेते है।”
सौ राउत: “माझ्या घशाखाली नाही उतरणार एकही घास… कधी थांबतोय हा पाऊस असं झालंय!”
श्री राऊत: “न खाऊन, उपाशी राहून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? अजून तुझी तब्बेत बिघडेल… चल थोडं थोडं खाऊन घेऊ. भाविक, भूमी चला हात धुवून येऊ.”
लहान मुलांना तर काहीच कळत नव्हतं. आई बाबांना त्रासात पाहुन ती गप्प बसून होती फक्त…
सगळे जेवायला बसले आणि मौनातच जेवण उरकलं. सौ सक्सेना फक्त हवं नको ते विचारत होत्या. तळमजल्यावरचं पार्किंग तर कधीच पाण्याने भरलं होतं. त्यामुळे गाड्या तर सगळ्यांच्याच पाण्याखाली गेल्या होत्या. कोणालाच रात्री नीट झोप आली नाही. रात्रभर पाऊस नुसता कोसळत होता.

सकाळी पाऊस थांबला होता. सकाळी लवकरच श्री व सौ राऊत आपल्या घराची काय अवस्था झालीय ते बघायला गेले. मुलं झोपली होती. त्यांनी दार उघडलं आणि घराची अवस्था बघून त्यांचा जीव हळहळला. सौ राउतच काय श्री राऊतांच्या डोळ्यात पण पाणी आलं. सगळं फर्निचर भिजून गेलं होतं. इलेक्ट्रॉनिक सामानाची वाट लागली होती. प्रश्न पैशाचा नव्हता. पण दुर्मिळ होतं सगळं. प्रत्येक वस्तूवर त्यांचं प्रेम होतं. आता हळू हळू सगळं आवरावं लागणार होतं. पण मन एव्हढं विषण्ण झालं होतं की काही करायची इच्छाच होत नव्हती. दोघे पुन्हा सक्सेना यांच्या घरात आले. मुलं अजूनही झोपली होती. सौ सक्सेना यांनी सगळ्यांसाठी चहा नाश्ता आणला. दोघांच्या चेहऱ्यावरुन त्यांची काय अवस्था झालीय हे सक्सेना दाम्पत्याच्या लक्षात आलं होतं.
सौ सक्सेना: “आज की रात आप इधर ही रहो। कल से साफसफाई शुरू करते है।” श्री राऊत यांनी फक्त होकारार्थी मान हलवली.

रात्री सगळेजण झोपले होते. सौ राऊतही थकून झोपून गेल्या. मात्र श्री राऊत यांना झोप येतच नव्हती. ते विचार करत होते. वातावरण दिवसेंदिवस बिघडत चाललं होतं. मुंबई तर सगळीच पाण्याखाली जायला लागली होती. जगणं कठीण झालं होतं. पुढे कसं होणार… अंदाधुंदीचा भ्रष्ट कारभार… माणसाच्या हावेने सगळं बिघडवून टाकलं होतं.. तितक्यात त्यांना समोरच्या भिंतीवर सावली दिसली… हो.. माणसाचीच सावली होती ती. राऊतांच्या काळजाचा ठोका चुकला. पण कोण शिरलं असेल घरात. त्यांनी विचार केला हळूच जाऊन बघूया. चोर वगैरे कुणी असेल तर सगळ्यांना उठवता येईल. बदलत्या वाईट परिस्थितीत चोऱ्या वाढल्या होत्याच. ते हळूच उठले. आणि सावलीच्या रोखाने गेले. ते खोलीच्या भिंतीपर्यंत आले. आणि त्यांनी आत वाकून बघितलं. खिडकीतून चंद्राचा प्रकाश खोलीत पसरला होता. त्या प्रकाशाला पाठमोरी कोणी एक बाई बसली होती. त्यांनी घाबरून दिवा लावला. बघतात तर काय.. काळी सावळी अशी एक बाई मांडीवर झोपलेलं मूल घेऊन बसली होती. तिचं कुंकू विस्कटलेलं होतं. तिचे डोळे रक्ताळलेले होते. ती प्रचंड रागाने राऊतांकडे बघत होती. राऊतांची दातखिळी बसली. त्यांना तो चेहरा ओळखीचा वाटत होता. आणि त्यांना आठवलं. १९९४ साल.. त्यांची नवीनच बढती झाली होती. सारेपाटा धरण प्रकल्पात कित्तेक घरं पाण्यात बुडणार होती. राऊत प्रमुख सचिव म्हणून जलसंपदा विभागात काम करत होते. पूर्ण खात्याने लाच खाऊन आपली तोंड बंद ठेवली. सारेपाटा प्रकल्पात कित्तेक कुटुंब उध्वस्थ झाली. काही जणांनी मोर्चा काढला. त्यावेळेस राऊत गाडीतून उतरून ऑफिस मध्ये शिरताना एका लहान मूल हातात असलेल्या बाईने पुढे होऊन त्यांचे पाय पकडले होते. तीची भाषा वेगळ्याच प्रकारची मराठी होती. पण तिचा चेहरा तिचे भाव सगळं व्यक्त करत होते. ती राऊतांचे पाय सोडीच ना. राऊतांच्या मनात तो चेहरा कायमचा घर करून राहिला. तोच हा चेहरा… हळू हळू त्या चेहऱ्याचे डोळे लालबुंद होत गेले. आणि डोळ्यांतून रक्त वाहू लागल. राऊत घाबरले. राऊतांना जोरात हृदयाचा झटका आला… ते खाली कोसळले. समोरची ती भयावह बाई हसायला लागली. राऊत तडफडत होते आणि ती बाई अजून जोरजोरात हसायला लागली. ती हसतच राहिली राऊत तडफडत राहिले आणि शेवटी त्यांनी प्राण सोडले. त्यावेळेस तिचं घर पाण्याखाली गेलं होतं. तिचा मृत्यू ओढवला होता. पण पाणी जात, पात, सांपत्तिक स्थिती, रंग काहीच ओळखत नाही. ते सगळ्यांना समान मानतं. त्यावेळेस तिची पाळी होती…आज राऊतांची…..

2 thoughts on “पाणी

  1. Baap re
    Kai lihitehs ga
    Kaljacha thokach chukala ase vatale
    Jabardast
    Zhadazhadati chi aatahavn yeun geli.

  2. गूढ पद्धतीची….जसे कर्म तसे फळ असा संदेश देणारी सुंदर कथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *