निळकंठ निकम, वय ७५ वर्ष, उत्साही, आणि वयाच्या मानाने दिसायला तरुण! खूप कौतुक व्हायचं त्यांचं त्यांची ठणठणीत तब्बेत बघून. त्यात मोकळा बोलका स्वभाव. जिथे जायचे तिथे मैफिल रंगवायचे. आजही ते नेहमीच्याच उत्साहात ठाण्याच्या त्यांच्या हृदय विकार तज्ञांना भेटून आले होते. त्यांनी दारावरची बेल वाजवली आणि त्यांच्या सुनेने नम्रताने दार उघडलं.
निळकंठ निकम: “एकदम ठणठणीत आहे मी. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. खाली उतरलो आणि लगेच डायरेक्ट ठाण्याला जाणारा ऑटो मिळाला. एक मिनिटहि थांबावं लागलं नाही..”
नम्रताने हसत त्यांना दुजोरा दिला.
“तुम्ही आहातच लकी…”
निळकंठ निकम: “हो तर! सगळी कामं पटापट होतात माझी. कधी कुठला अडथळा येत नाही.”
नम्रताने त्यांच्या हातातल्या पिशव्या घेतल्या आणि कपाटात ठेवून दिल्या.
नम्रता: “जेवण तयार आहे. वाढू ना.”
निळकंठ निकम: “हो हो.. तुम्ही जेवलात ना?”
नम्रता: “थांबलो आम्ही. एकत्रच जेऊया म्हणून. नाश्ता खाऊन सगळ्यांची पोटं भरली खूप.”
निळकंठ निकम: “चल वाढ मग. येतो मी हात पाय धुवून.”
जेवणं टेबलवर आणून ठेवली आणि नम्रता श्रीकांतला, तिच्या नवऱ्याला बोलवायला बेडरूम मध्ये गेली.
निळकंठ: “श्री चल जेवायला.”
श्री: “आले का पूज्य पिताश्री?”
नम्रता: “हो आले… तू आज काय दिवसभर काम करणार आहेस?… मला वाटलं साफ सफाईत मदत करशील..”
श्री: “अगं आज नाही जमणार. हवं तर साफसफाई पुढच्या रविवारी करू..”
नम्रता: “तुझ्या नोकरीचं म्हणजे काही सांगता येत नाही..”
श्री: “हो ग.. सरकारी नोकरीत असल्यामुळे तुला कळणार नाही.. आताचं कॉर्पोरेट लाईफ असंच आहे.”
नम्रता: “बाबा यायचे ना बरोब्बर ६ ला.”
श्री: “अरे ते फॅक्टरीत मॅनेजर होते. मी आय टी इंडस्ट्रीत आहे.. आणि नाहीतरी आम्ही कुठे त्यांच्यासारखे लकी आहोत…”
नम्रता: “हो ते तर आहे.”
श्री: “काय हो!!! तू पण ना..!”
नम्रता: “काय मी पण???”
श्री: “त्यांच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालतेस…”
नम्रता: “काही अंधश्रध्दा नाहीय हा. असतं तसं.”
श्रीने जाऊदे असे हातवारे केले आणि तो जेवायला बाहेर आला.
निळकंठ: “काय माय डिअर सन.. यावेळी सिनिअर मॅनेजर बनणारच म्हणजे.”
श्री गप्पच राहिला.
निळकंठ: “नाही असं ट्वेन्टी फॉर बाय सेव्हन काम करताय म्हणून म्हटलं..”
श्री: “मी माझं काम करतोय. बाकी विचार करत नाही.”
निळकंठ: “आम्ही सगळ्या गोष्टी ठरवून केल्या. घर लग्न गाडी सगळं. ठरवत होतो म्हणून बाप नसताना, खिशात पैसे नसून सुध्दा एव्हढ सगळं उभं केलं मी.”
श्री गप्पच राहिला आणि जेवायला लागला.
तितक्यात नम्रता बाहेर आली.
नम्रता: “बाबा त्याला तुमच्यासारखं नशीब लागतं ना. श्रीचं माहीतच आहे तुम्हाला. सगळ्यांना वाटत होतं इंजिनिरिंगला टॉप करेल पण आला पाचवा. याला डावलून दुसऱ्या माणसाला मॅनेजर केलं होतं आधी. तुम्ही सोडूनच द्या त्याचं.”
आणि नम्रता हसली.
निळकंठ खुश झाले आणि श्री ने नम्रताकडे जळजळीत कटाक्ष टाकला.
जेवून झालं आणि श्री पुन्हा बेडरूम मध्ये कामाला जाऊन बसला. नम्रता वामकुक्षीसाठी आत आली.
श्री: “असं काही नाहीय नम्रता. मी तुला किती वेळा सांगितलं.”
नम्रता: “काय नाहीय???”
श्री: “बाबा खूप लकी आणि माझं लक खराब असं काही नाहीय.”
नम्रता: “जाऊदे रे तो विषय..”
श्री: “ओ के आता दाखवुनच देतो मी तुला.”
नम्रता: “काय दाखवतो????.”
श्री: “मी पोरकटपणा म्हणून सोडून देत होतो. पण आता बघंच!.”
नम्रताने हा काहीतरी बडबडतोय असे हातवारे केले आणि झोपून गेली.
एकदा रात्री श्री ऑफिसवरून घरी आला. आल्या आल्या तो नम्रताकडे स्वयंपाकघरात गेला.
“काय ग आज बाबा घाटकोपरला पेन्शन ऑफिसमध्ये जाऊन आले का?”
नम्रता: “तू आजकाल रोज काय आल्या आल्या बाबांची खबर घेतोस?”
श्री: “सांग तर.”
नम्रता: “अरे बसच नाही आली म्हणत होते. मी म्हटलं मग उबर ने जा. पण कशाला एव्हढे पैसे घालवायचे उद्या बघतो म्हणून नाही गेले.”
श्री: “बघ अडलं ना काम त्यांचं..”
श्री घाईघाईने हॉल मध्ये आला.
श्री: “काय बाबा? झालं का पेन्शन ऑफिसचं काम?”
निळकंठांनी पेपर बाजूला करून श्री कडे पाहिलं.
“नाही. आता उद्या जाईन.”
आणि ते पुन्हा पेपर वाचायला लागले.
श्री: “का? आज काय नशिबाने साथ नाही दिली?”
निळकंठांनी पुन्हा एकदा पेपर बाजूला करून श्रीकडे पाहिलं आणि पुन्हा पेपर वाचायला लागले…
काही दिवस गेले. श्री कामावरून घरी आला. नेहमी हॉलमध्ये असणारे बाबा दिसले नाहीत म्हणून त्याने विचारलं,
“बाबा कुठे आहेत?”
नम्रता: “अरे बेडरूमध्ये झोपलेत. पडले गेटमध्ये.”
श्री: “पडले कसे??? लागलंय का?”
नम्रता: “नाही फार! पण मुका मार लागलाय म्हणून झोपलेत.”
श्री: “नाही फार लागलं ना मग ठीक आहे. बघ हेच का त्यांचं लक..”
नम्रता विचार करत श्रीकडे बघत राहिली.
श्री बाबांच्या बेडरूममध्ये गेला.
निळकंठ झोपून मोबाईलवर काहीतरी बघत होते.
श्री: “काय म बाबा! लकने आज साथ नाही दिली वाटतं..”
हे दुसऱ्यांदा घडत होतं की श्री त्यांना खोचकपणे बोलत होता. ते वैतागून श्रीकडे दुर्लक्ष करू लागले..
शनिवार होता. श्री मोबाईलवर गेम खेळत बसला होता. नम्रता नॉव्हेल वाचत बसली होती. दारावरची बेल वाजली. श्रीने दरवाजा उघडला. निळकंठ बँकेत हयातनामा द्यायला गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरुन श्रीने लगेच ओळखलं काम झालेलं नाहीय. लगेच त्याचा खोडकरपणा बाहेर आला.
“काय बाबा आज लक काय म्हणतं?”
निळकंठ काय बोलणार. तडक कपडे बदलायला आत निघून गेले. नम्रता हे सगळं पहात होती..
तिने श्रीला ओढून सोफ्यावर बसवलं.
“तुझं काय चाललंय श्री?”
श्री: “तुझ्या डोळ्यात अंजन घालतोय. अगं बाबांची सवय आहे. पटापट आणि चांगल्या झालेल्या गोष्टी ते मिरवतात आणि न झालेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.. कोणी काही लकी अनलकी नसतं… इट्स अबाउट थिंकिंग!”
नम्रता: “हो आलंय माझ्या लक्षात. आता थांबव हे सगळं.. मला कळलं पुरे झालं.. पण तुझ्या लक्षात येतंय का? याच सकारात्मक दृष्टिकोनामुळे ते खुश आहेत. निरोगी आहेत. नाहीतर बघतोस ना त्यांच्या वयाची इतर माणसं… “
श्री: “हम्मम… हेही खरच! पण तू तर आता मला अनलकी समजत नाहीस ना?”
नम्रता कान पकडते.
“नाही बाबा! तू खूप मिळवलं आहेस आयुष्यात.. पण त्यांचा पिच्छा सोड… त्यांना करुदे असा विचार की ते लकी आहेत. ओ के?”
श्री: “ओके माय डिअर..” आणि नम्रताला जवळ ओढतो
नम्रता: “अरे बाबा येतील बाहेर.. वेडा कुठला..”