चिंटू घरभर नवीन रिमोटची कार घेऊन फिरत होता. धावपळ करणारी त्याची आई संध्या, मध्ये मध्ये येणाऱ्या चिंटूला दटावत होती. चिंटू सॉरी आई म्हणत होता पण त्याची कार नवीन असल्याने त्याला आवरता येत नव्हती आणि मधेच स्वयंपाकघरात शिरत होती. चिंटूच्या आजी लक्ष्मीबाई आईला स्वयंपाकात मदत करत होत्या. चिंटूचे आजोबा नरहर खरे सुद्धा तिथे लुडबुड करत होते. खरे कुटुंब म्हणजे गुण्यागोविंदाने एकत्र नांदणार कुटुंब. एक गोष्ट फार वेगळी होती. बायकांची कामं पुरुषांची कामं असा भेदभाव नव्हता. संध्या सरकारी नोकरीत छान सुप्रीटेंडन्ट होती. लक्ष्मीबाईंनी शाळेची मुख्याध्यापिका बनून निवृत्ती घेतली होती. चिंटूला सध्या थोडी थोडी कामांची सवय लावली जात होती. आईचं स्पष्ट मत होतं की जेवण बनवणं, घरची काम करणं हे लाईफ स्किल आहे आणि ते सगळ्यांना आलंच पाहिजे. सगळेजण मिळून मिसळून काम करायचे आणि सगळे मिळून मिसळून रिकामा वेळ साजरा करायचे. खूप गप्पा मारायचे, चिंटू बरोबर खेळायचे, कॅरम, पत्ते, आणि खूप धमाल. परिपूर्ण काहीच नसतं असं बोलताना विचार करावा लागेल असं त्यांचं कुटुंब होतं. पण आज चिंटूचा बाबा म्हणजे रवींद्र नव्हता. तो सिंगापोर ट्रिप बुक करायला गेला होता. अख्ख कुटुंब मजा करणार होतं. पुढच्या आठवड्याचंच बुकिंग मिळत होत आणि सगळे उत्साही झाले होते. रवींद्र घरी आला आणि सगळं नीट झाल्याचं सांगितलं. सगळे खुश झाले.
सकाळी नरहर यांना जाग आली तीच येणाऱ्या कसल्या तरी आवाजाने. कोणीतरी काहीतरी ठोकत होत. नरहर घाई घाईत उठून दिवाणखान्यात आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. समोरचं एक वडाच झाड एक माणूस तोडत होता. नरहर लगबगीने अंगणात आले.
नरहर: “अरे काय चाललंय हे… थांब रे… कशाला त्या झाडाच्या जीवावर उठला आहेस?”
तो माणूस थांबून नरहरांकडे बघायला लागला. असं होणार हे माहीत असलेला शेजारचा वसंत लेले थोडा लांब एका झाडाच्या पारावर बसूनच होता. तो घाई घाईत तुटणाऱ्या झाडाच्या ठिकाणी आला.
लेले: “कशाला ओरडताय… आमचं आहे ते झाड. माझ्या पूर्वजांनी लावलंय.”
नरहर: “पण ते आमच्या अंगणात आहे. तुम्ही असं तोडू नका. आणि कशाला तोडताय ते?”
लेले: “एके ठिकाणी लाकडांचा सौदा झालाय. आणि वडाच झाड बाकी काय उपयोगाचं… अजून खूप आहेत इथे.”
नरहर: “अरे किती पैसे पैसे कराल… कुठेतरी आवर घाला याला.”
लेले: “झाड माझं, डोकं माझं, विचार माझे… तुम्ही कोण बोलणारे? गप्प तुमचं काम करा.”
नरहर मग त्यांना विनंती करायला लागले. पण काही इलाज चालेना तसे तोंड पाडून ते आत गेले.
नरहर खूप भावनिक आणि हळवे होते. त्यांना खूप वाईट वाटलं. ते झाड त्यांच्या घराच्या अगदी जवळ होतं. त्यामुळे त्यांचा आणि चिंटूचा त्याच्या भोवती खूप वावर होता. ते तोंड पाडून बसले असताना लक्ष्मीबाई तिथे आल्या. त्यांना बाहेरचं ऐकू आलं होतं.
लक्ष्मीबाई: “आता यासाठी किती दिवस दुःख करणार आणि मौनव्रत पाळणार.”
नरहर: “तू माझी मस्करी करू नकोस.”
लक्ष्मीबाई: “मस्करी नाही करत हो. पण किती हळवं असावं माणसाने… अशा घटना आयुष्यात होत राहणार. घट्ट करावं मन.” नरहरांनी सुस्कारा सोडला. पण त्यातून पटकन बाहेर पडण त्यांना काही जमलं नाही.
दुसऱ्या आठवड्यात सगळी लगबग होती. बुधवारी निघायचं होतं. सगळेच उत्साहात होते आणि त्यात मंगळवारी सकाळीच नरहर यांच्या मेहुण्यांचा फोन आला. नरहर यांची बहीण आजारी होती खूप. नरहरांनी फोन ठेवला आणि ही बातमी सगळ्यांना सांगितली. नरहारांची बहीण आजारी असताना अस फिरायला जाणं कुणालाच योग्य वाटेना. पण पैसे परत मिळणार नव्हते. खूप वेळ चर्चा करून शेवटी ठरलं नरहर एकटेच थांबतील बहिणीच्या घरी. लक्ष्मीबाईंनी थांबते म्हणून खूप हट्ट धरला पण नरहरांनी जाण्याविषयी त्यांना पटवून दिलं.
सगळे बुधवारी सकाळी गेले आणि नरहरांनी बॅग भरली बहिणीकडे जाण्यासाठी. ते निघाले. ते बस मध्ये बसले होते. रवींद्रने किती सांगितलं ओला करून जा पण त्यांना बसच आवडायची. कामाचा दिवस असल्याने अकरा वाजता गर्दी नव्हती. खिडकीतून छान थंड हवा येत होती.. आणि त्यांना डुलकी लागली.
साखर झोपेत असताना त्यांचा फोन वाजायला लागला. अननोन नंबर होता. त्यांनी फोन उचलला. मी अंधेरी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. तुमच्या घरचे जात होते त्या गाडीला अपघात झालाय. तुम्ही तातडीने सेवन हिल्स हॉस्पिटल मध्ये या. नरहर हादरले… दोन क्षणांसाठी ते सुन्न झाले. पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि बस मधून उतरून टॅक्सी पकडली. ते सेवन हिल हॉस्पिटल मध्ये पोचले. खाली थांबलेल्या हवालदाराकडे चौकशी करून ते तिसऱ्या मजल्यावर गेले. ते पोलिसांजवळ गेले आणि ऐकलेल्या वाक्यांवर त्यांचा विश्वास बसेना.
तिघांचा जीव गेला होता. रवींद्रने नरहरांबद्दल पोलिसांना सांगितलं पण तोही नरहर पोचेपर्यंत जगू शकला नव्हता. घराची कळा बदलली होती. सगळे नातेवाईक जमले होते. नरहरांच्या भावाच कुटुंब त्यांच्या बरोबर काही दिवस राहणार होतं. ते नरहरांना सोबत घेऊनच जाण्याच्या विचारात होते. पण नरहर पूर्ण बधिर झाले होते. डोळे निस्तेज. जसा पुतळा असावा. काहीच बोलत नव्हते आणि बहुतेक काही ऐकतही नव्हते. कोणी बोललं तर नुसते बघत राहायचे.
असेच दिवस चालले होते. नरहारांची विधवा चुलत बहीण थांबली. बाकी सगळे गेले. नरहर माणसात येतील म्हणून ती खूप प्रयत्न करत होती. पण काहीच सुधारणा दिसेना. त्यांना भावाने त्यांना मानसोपचार तज्ञाकडे न्यायला सुरुवात केली. ते थोडं थोडं बोलायला लागले. पण डोळे तसेच निस्तेज. दिवसभर खुर्चीवर बाहेर बघत बसून राहायचे.
मुलांची सुट्टी सुरू झाली होती. कुणकुणाच्या घरी त्यांच्या नातेवाईकांची मुलं राहायला आली होती. ती जवळच रिकाम्या जागेत खेळत होती. तितक्यात त्यांचा बॉल नरहरांच्या जवळ येऊन आपटला. एक मुलगा धावत आला. आणि बॉल शोधू लागला. तितक्यात त्याला तोडलेल्या वडाच्या झाडावर काही दिसलं. तो तिथे जाऊन गुढग्यात वाकून बसला आणि झाडाचा उरलेला बुंधा निरखू लागला. नरहर बघत होते. त्याला बघताना त्यांना चिंटूची आठवण झाली. ते उठले आणि त्या मुलाजवळ आले. त्यांनी वाकून मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. मुलाने त्यांच्याकडे बघितलं. मुलाने स्मितहास्य केलं
मुलगा: ” हे बघा ना आजोबा झाड पूर्ण तुटलंय पण बघा त्याच्या खोडातून नवीन झाड आलंय.”
नरहर त्याच्या बाजूला त्याच्यासारखेच बसले. खोडाच्या कोपऱ्यातून पालवी फुटली होती. नरहरांच्या मनात आलं. एक वेगळा जन्म. शून्यातून नव्याने जगण्यासाठी. नवीन अनुभव घेण्यासाठी. नवीन आठवणी जपण्यासाठी… पुन्हा एकदा उभारी… पुन्हा एकदा भरारी… त्यांना रडू आलं. ते मुलाला मिठीत घेऊन रडायला लागले. मग त्यांनी मुलाचा पडलेला बॉल त्याला शोधून दिला. त्याला स्मितहास्य दिलं. डोळे नीट पुसले. आणि चुलत बहिणीला हाक मारली.
“अगं निले.. मी आज जेवण बनवतो ग…”
Wah Sheetal, dolyatun pahi aala. Khup sundar lihilyes.
Ohh what a strory..
Chhan lihites . Sheetal ekdum hridyala bhidali.
Kase jamate tula. Keep it up