Marathi Short Stories

मन्याची छोटीशी गोष्ट

मन्या उर्फ मनीष जाधव! एक सामान्य गरीब मुलगा. नीरा खानच्या टीम मध्ये बॅक डान्सर म्हणून काम करणारा. त्याचं आयुष्य चाललं होतं ढकल गाडी सारखं. जिथे शूटिंग असेल तिथे नाचायला जायचं बाकी झोपडपट्टीत होताच ग्रुप टाईमपास करायला… नाक्यावर उभं राहून मुलींवर कमेंट करणाऱ्या मित्रांच्या फालतू गप्पांत सामील होणं यात आयुष्य पुढे पुढे चाललं होतं. पण तो मात्र जास्त कोणाबद्दल आणि जास्त कोणाशी बोलत नसे. मन्या २७ वर्षाचा झाला होता. आणि आई कोणतीतरी मुलगी त्याच्या गळ्यात बांधून द्यायला बघत होती. मग इतर झोपडपट्टीतल्या चार चौघांसारखं त्याचही आयुष्य, म्हणतात तसं, मार्गी लागलं असतं…

असंच मन्याचं आयुष्य वाहत असताना आईने मन्यासाठी ‘पोरगी’ पसंत केली. आई, मन्या आणि पाहुणे तिच्या घरी गेले. सविताने चहाचे कप घेऊन प्रवेश केला. सविता साधीशीच, मन्यासारखीच गरीब घरातली. दुसरं काही येत नाही म्हणून आईने स्वयंपाक, घर सांभाळणं एकदम नीट शिकवलं होतं.

आई: “मन्या विचार तुला काय विचारायचं ते”

मन्या सगळ्यांकडे बघत राहिला. ‘बात करनेको प्रायव्हसी मंगती है बॉस!’ सगळ्यांसमोर काय बोलणार?

मन्या: “मला मुलीला एकटीला वेगळं भेटायचं. मग ठरवेल काय ते.”

इतर पाहुणे नसते तर आईने मन्याला फटकाच दिला असता.

आई: “शिंग फुटली काय रे तुला?”

आणि आई रागाने बघत राहिली.

सविताचे वडील: “बरोबर बोलतायत जावई. आजकाल असंच हाय. भेटुदेकी दोघासनी. आमची काइ हरकत नाय!”

आई: “आत्ताच काय ते एकांतात बोल. जावा भाईर.”

मन्याला ही घाई आवडली नाही. पण करतो काय… दोघेजण बाहेर गेले. नाल्याच्या बाजूला माणसं नव्हती तिकडे गेले. थोडा वेळ कसं वागायचं या विचारात गेला. मग मन्याने धीर केला.

मन्या: “तू केलंस मला पसंत?’

सविता: “नाय पसंत करायला तुमच्यात काय दोष हाय काय!”

मन्या: “दोष असा नाय. पन तू माझ्याबरोबर राशील सुखात?”

सविता: “माहेरी एव्हढ्या त्रासात राहिले तर सासरी पन राईन की. तिकडे तर तुमची सोबत असेल.”

सोबतीच्या विचाराने मन्याला मनात गुदगुल्या झाल्या. मन्याला पोरगी पसंत पडली. आणि मन्याने मनात शप्पथ घेतली की आजपासून कोणत्या मुलीकडे बघायचं पण नाही. कितीही सुंदर असली तरी…

लग्न पार पडलं आणि मन्याचा सुखाचा संसार सुरू झाला. सविताने बोललेलं खरं करून दाखवलं. जे काही होतं त्यात ती मनापासून जगत होती. बायको खुश तर मन्याही खुश!

सेट वर गाण्याचं शूटिंग चालू होतं. मन्या पहिल्याच रांगेत होता. गाण्याचं शूटिंग संपलं. मन्याला बायकोला बाहेर भेटून तिच्यासोबत सासरी जायचं होतं. पुढच्या सिनचं शूटिंग बघत मन्या तिथेच थांबला.

डिरेक्टर: “अरे वो साईड आर्टिस्ट आया नही क्या!!!”

असिस्टंट डिरेक्टर: “उसकी मा बिमार है ऐसा कॉल आया थोडी देर पेहले.”

डिरेक्टर: “साला चू** कोई मा बिमार नही होगी. दुसरा जादा पैसे का काम मिला होगा उसको… सिन तो आज करनाही है!…… ए तू कौन है छोकरे?”

मन्याने मागे कोण आहे ते वळून पाहिलं.

डिरेक्टर: “ए पिछे क्या देखता है? तेरेकोही बोल रहा हू… थोडे डायलॉग बोल सकते हो क्या?”

मन्या धास्तावला. पण त्याने धीर केला.

मन्या: “हा हा! क्यू नही…”

डिरेक्टर: “आजा फिर… इसको स्क्रिप्ट दो और तय्यारी करके लो.”

असिस्टंट डिरेक्टरने मन्याची तयारी करून घेतली. चक्क एक उतारा होता. मन्या एकदम खुश झाला. त्याने पटापट मस्त तयारी केली.

मन्या सेटवर आला. हिरोच्या एका उताऱ्यानंतर त्याला बोलायचं होतं. तो भारावून गेला होता. हिरोचा उतारा संपला आणि मन्याने हिरोच्या खांद्यावर सांगीतल्याप्रमाणे सहानुभूतिने हात ठेवला…

मन्या: “साब हम छोटे लोग है… आपको क्या बोलेंगे… पर फिर भी बोलता हूँ… प्यार व्यार सब झूट है… ये कलियुग में सिर्फ पैसा बोलता है… आज मेरे पास पैसा होता तो मेरी गर्लफ्रेंड मुझे छोड़के पैसेवाले का हाथ पकड़के नही जाती. देर हो गई पर देर से ही सही, सच्चाई समझ मे आ गयी है… देखना साहब आपकी हीरोइन भी आपके पास नही आएगी… मालदार पार्टी मिल गयी है जो उसे…आप उसपे ऐसे जान मत छिड़को… मेरी मानो तो भूल जाओ उसे… भूल जाओ…”

डिरेक्टर: “कट!! भाई फाड़ दिया तूने!! मजा आ गया… प्रीमियर पे बुलाऊंगा तुझे. आ जाना.”

मन्या खुशित तरंगत होता. हा आपल्या बायकोचा पायगुण आहे असंच त्याला वाटत होतं. असाच खुश होऊन तो बायकोसोबत तिच्या माहेरी गेला. मन्या आज खूप बोलत होता. खूप उत्साहात होता आणि खूप मस्करी करत होता. सविताला वाटलं काहीतरी झालंय. नाहीतर नवरा एव्हढा खुश कसा?

सविता: “काय ओ आज रंग वेगळेच दिसतात तुमचे… काय झालं सांगा तरी.”

मन्याने सगळ्यांसमोर जाहीर सांगितलं.

मन्या: “अगं तुझ्या पायगुनाने आज पिक्चर मध्ये छोटासा रोल मिळालाय मला!!”

सविता: “काय सांगता काय!! काँग्रेचुलेशन…”

आणि मन्याच्या सासरची सगळी मंडळी खुश झाली… मन्या कसा आधीपासूनच गुणी आहे याची चर्चा झाली… यानंतर जे ओळखीचे भेटतील त्यांना मन्या ही बातमी देत गेला. दोस्त लोग त्याच्यासाठी खूप खुश झाले…

प्रीमिअरचा दिवस आला आणि मन्या, सविता आणि जवळचे दोस्त लोग प्रीमिअरला जायला तयार झाले. डिरेक्टरने एव्हढी लोकं येण्याबद्दल कुरकुर केली पण शेवटी तो तयार झाला. पिक्चर सुरू झाला आणि मन्याची सगळी मंडळी मन्याला पाहायला आतूर झाली.

मन्याचा सीन आला आणि मन्या खुश झाला. पण बघतो तर काय मन्याने हिरोच्या खांद्यावर हात ठेवला पण त्याचे डायलॉग आलेच नाहीत. हिरोच बोलत राहिला आणि फक्त हिरोच्या डायलॉगच्या मध्ये मध्ये मन्या दिसत राहिला. मन्या खूप अस्वस्थ झाला… त्याला राहावेना. तो अंधारातच उठला आणि डिरेक्टरच्या खुर्चीपाशी जाऊ लागला. मागची माणसं ओरडायला लागली. तितक्यात एका मित्राने त्याला हाथ पकडून बसवलं…

मित्र: “अरे पूर्ण पिक्चर बघ की. फक्त सोतालाच बगनार काय?”

मन्या बसला परत. पण त्याला मेल्याहून मेल्यासारखं होत होतं. तोंड लपवून कुठे जाऊ असं झालं होतं. पण करतो काय. गप्प बसून राहिला…

पिक्चर संपला आणि सगळे एकमेकांचं अभिनंदन करायला लागले. सविता खुशीत उठली…

सविता: “अगं बाई बाई माझा हुशार नवरा तो… हिरोच्या मागे गर्दीत नाचायचा तो स्क्रिन वर हिरोच्या खांद्यावर हात ठेवून दिसला.”

आणि कोणाची तमा न बाळगता सगळ्यांसमोर तिने मन्याला मिठी मारली… मित्रही जाम खुश झाले होते. आपला मन्या हिरोच्या खांद्यावर हात ठेवून हिरोच्या मागे… हे तर ‘सॉलिड एकदम!’

काय चाललंय दोन मिनिटं मन्याला कळेना. पण त्याच्या लक्षात आलं… आपण एका सीन मध्ये आहोत असंच त्याने सगळ्यांना सांगितलं होतं. डायलॉग आहेत असं काही तो कुणाला बोलला नव्हता… त्याचा मितभाषी स्वभाव इथे कामी आला होता… साधी माणसं! नुसत्या त्याच्या हिरोबरोबर दिसण्याने खुश होऊन गेली होती. मित्रांना त्याचा हेवा वाटत होता. मन्याने डायलॉग कापल्याचं दुख्ख सोडून दिलं. ‘सब खुश, तो अपून खुश.’

तितक्यात सविताला त्याच्या सासऱ्याचा फोन आला.

सविता: “हॅलो! … हो हो संपला पिक्चर…. हो हो एकदम क्लोज अप दिसला यांचा… हो हो… हिरोच्या खांद्यावर हात ठेवून हिरोच्या मागेच… हो आहेतच आमचे हे हुशार…बोला बोला त्यांच्याशी बोला!”

मन्या: “हो हो ठ्यांक्यु बाबा. हो हो तुम्ही बघाच सिनेमा. बरं बरं ठेवतो.”

सगळ्यांचा आनंद पाहून मन्या सगळं विसरून गेला… आपण फार महत्वाचे आहोत असं जवळच्या माणसांमुळे, विशेषतः सवितामुळे त्याला वाटून गेलं… आणि त्याची छाती पुन्हा एकदा अभिमानाने फुगली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *