Marathi Short Stories

हुरहूर

अरेंज मॅरेज…श्रध्दा ने कधी विचारच केला नव्हता. तिने तर लग्नाचाच विचार केला नव्हता. नॅशनल लेव्हल वर कबड्डी खेळताना तिच्या मनात फक्त जिंकण्याचेच विचार असायचे. पण घरचं प्रेशर! वय निघून जाईल, चांगले मुलगे संपतील आणि काय काय! पहिल्याच मुलाची सांपत्तिक स्थिती, घर दार, सगळं चांगलं निघालं. चौकशीतही मुलगा छान आहे असं कळलं. तिला नाहीतरी कुठे काय कळत होतं लग्नातलं. तिने विवेकला होकार देऊन टाकला.

लग्नाचे प्लॅन्स बनायला लागले. नवरा बायको लग्नाआधी भेटायला लागले. पहिल्या भेटीत हाय हॅलो, तुझी आवड काय, लग्नानंतरचे प्लॅन्स काय अशा गप्पा झाल्या. मुलगा तर चांगला वाटला तिला. पण हुरहूर होतीच. काय असणार, काय नाही, काय होईल, सगळेच प्रश्न. पण ती सगळ्याच प्रश्नांकडे दुर्लक्ष करत होती. शक्य तेव्हढ आशावादी राहात होती.

साखरपुड्याच्या दिवशी श्रध्दा खूप नटली. एक साडी माहेरची आणि एक साडी सासरची. सासरचे मोठे आसामी! त्यांनी अतिशय भरजरी साडी आणली होती. श्रध्दाला काही ती साडी बरी वाटली नाही. तिच्या तोंडातून पटकन निघालं. “बापरे हे काय आहे.” जवळच उभ्या असलेल्या विवेक ने ऐकलं. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. श्रध्दा ने नोटीस केलं. तिने पटकन हावभाव बदलले. जाऊदे एकदा घालू. लग्न म्हणजे तडजोड, हे आजीचे शब्द तिला आठवले. ती शांत झाली. सोहळा मजेत चालला होता आणि अंगठी घालायची वेळ आली. विवेकने तिला घालण्यासाठी हातात घेतलेली अंगठी पाहून तिला एकदमच कसतरी झालं. एव्हढी मोठी आणि डिझाईनवाली. तिने आयुष्यात अशी अंगठी घातली नसती आणि ही अशी कायम मिरवायची. तिचा चेहराच पडला. आपल्यापुढे आता काय काय वाढून ठेवलंय, स्वातंत्र्य एकदम संपलय आणि आता नुसती तडजोड उरलीय आशा भावना तिच्या मनात आल्या. तिचे डोळे पाणावले. विवेकने तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं. आणि त्याला कळायचं ते कळून चुकलं.

लग्नाची साडी आणि रिसेप्शन चा डिझायनर ड्रेस घ्यायचा होता. श्रध्दा ला कळून चुकलं होतं, यातही तिची आवड कुणी विचारणार नाही. तीचा मूड ऑफ होता. लग्न करावं की नाहीच करावं असे विचार तिच्या मनात येत होते. तिला वाटलं आईला आत्ताच जाऊन सांगावं, नको मला लग्न बिग्न… मी एकटीच सुखात राहीन… तितक्यात फोन वाजला. विवेक होता.
विवेक: “लवकर कॉर्नर ला मला भेट मी कार मध्ये वेट करतो.”
श्रद्धा: “का काय झालं?”
विवेक: “अगं ये तर… सांगतो मी तुला.”
श्रद्धा तयारी करून विवेकला कॉर्नर ला भेटली. गाडीत बसली.
श्रध्दा: “कुठे जायचंय?”
विवेक: “जिथून उद्या कपडे घेणार आहोत त्या दुकानात.”
श्रद्धा: “कशाला?”
विवेक: “तुझ्या आवडीचे कपडे शोधून ठेवायला…”
श्रध्दा: “म्हणजे??? कशाला???”
विवेक: “एकदा तुझ्या आवडीचे कपडे निवडून ठेवले ना की उद्या तेच घ्यायला मी प्रेशर आणणार माझ्या आईवर. मला आवडले असं सांगून. ती ऐकेल.”
श्रद्धा च्या चेहऱ्यावर आनंद पसरला…,ती खूप खूश झाली. तिला पटकन मनात विचार आला. असाच नवरा आपल्याला हवा.

दोघे दुकानात गेले. खूप वेळ शोधून श्रध्दा ने कपडे फायनल केले. मग दोघं कार मध्ये बसले. पण विवेकने घरच्या रस्त्यावर गाडी न नेता दुसरीकडेच वळवली.
श्रद्धा: “आता कुठे जातोय आपण?”
विवेक: “ज्वेलर कडे.”
श्रद्धा: “का?”
विवेक: “तुला हवी तशी अंगठी घे. साखरपुड्याची अंगठी आपण ठेऊन देऊ.”
यावर काय प्रतिक्रिया द्यायची हेच श्रद्धा ला कळेना. ती फक्त कृतकृत्य होऊन विवेककडे बघत राहिली. विवेकने मंद स्मित केलं. श्रद्धा ची हुरहूर आता पूर्णतः गेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *