‘घणाघणा अलार्म वाजला आणि खडबडून जाग आली. हे नेहमीचं, तरी अजून सवय झाली नाही. मागच्या वेळी मंदा आत्त्या धडपडून पडली. पश्चाताप झाला गाढ झोपले त्याचा! होउ शकतं ना कधीतरी. नथिंग इज इन्फ़ोलीबल. आत्या सुद्धा पडू शकते, त्यात काय! दमले आहे खरंतर मी!! आत्या वारल्यावर दुःख होईल… की आनंद…’ हा विचार तिने दाबून टाकला!
‘मंदा आत्त्याने मला लहानपणापासून सांभाळलं. मला काहीच धड जमलं नाही म्हणून मी दिवसभर आत्त्याला सांभाळते, आत्त्याचं कुणी नाही म्हणून आत्त्याला सांभाळते, की आत्त्याच्याच पैशावर मी अवलंबून आहे म्हणून आत्त्याला सांभाळते…’ हे ही विचार इतर विचारांसारखे दाबून टाकले. ‘आयुष्य एक भयानक रुटीन झालंय. मंदा आत्त्याचा आजार मलाच गुरफटून राहिलाय. कधी वाटतं या लंग फाय्ब्रोसीस ची सवय झालीय मला, पण नाही. झोपेचं खोबरं होतं आणि डोक्यावर आठ्या पडतातंच. मनात चीड येते. मग मी मुद्दाम आत्तेच्या डोक्यावरून हात फिरवते. तिला माझी ही चीड समजू नये म्हणून की काय… असेल… नथिंग इज इन्फ़ोलिबल! माणूस सवयींचा गुलाम असतो. पण फक्त व्यसनाधिन सवयींचा…’
*********
दरवाजावर बेल वाजली आणि गितिकाने दरवाजा उघडला. बाहेर कुणी अनोळखी माणूस उभा होता. शॉर्ट्स आणि रंगीत बनियान घालून.
रंजित: “हलो मी रंजित! रंजित रानडे… मला थोडीशी साखर हवी होती… सॉरी… म्हणजे मी नविन शेजारी असून आल्या आल्या मागायला सुरुवात केली…”
गितिका थोडी भांबावली. तिचं बोलणं भाजी वाल्यांशी, ऑटो वाल्यांशी, असंच कामाधामा पुरतं. असा स्मार्ट माणूस अचानक बोलायला आल्याने धांदलच झाली तिची. थोडा वेळ तिला काय चाललंय कळेना. स्वतःला सावरत ती बोलली “हो हो आणते आणते!” स्वयंपाक घरातून तिने साखर आणून दिली आणि काही न बोलता दरवाजा बंद करून टाकला. रंजितला धन्यवाद बोलायची ही संधी मिळाली नाही. अनपेक्षित अचानक समोर आलं तर गोंधळ उडणारच ना! ‘वाटी देताना बोटांचा स्पर्श झाला आणि शहारेच आले अंगावर. असं का व्हावं? माझं आयुष्य आत्त्याबरोबरच जोडलय. मी तिच्या उपकारांची फेड काही केल्या करू शकत नाही’
*********
वाळवंटात फसलेल्या माणसाला मृगजळ दिसावं तशी गितिका फसत चालली. भाजी आणायला, औषध आणायला जाता येता तिला रंजित दिसायचा. त्याची नजर तिच्यावर पडताच पहिल्या पावसाने धरा बहरून यावी तशी ती बहरायची. ‘त्याचे डोळे… त्या डोळ्यांत अर्थ भरत चाललाय. तो बोलायचा प्रयत्न करतो माझ्याशी! मी तशी सुंदर नाही पण वाईटही नाही. त्याच्या हसण्यातून बरंच काही कळतं मला… थुंकी, उलटी, थकवा… हेच माझं आयुष्य! यातून सुटका होऊन माझं आयुष्यं फुलेल का? कोंदट हवा आणि घाणेरडे वास यातून काय मार्ग मिळेल?’
तितक्यात आत्त्याला खोकल्याची उबळ आली. गितिकाने विचार केला आत्ते तर काय मरणाच्या दारावर उभी आहे. उद्या गेली काय, आज गेली काय… आपला तारुण्याचा उंबरठा ओलांडून चाललाय. आपण अजून किती सहन करायचं हे? आत्ते खोकत होती……. गितिका आत्तेपर्यंत गेली. तिच्या नाकातली ऑक्सिजन ची नळी तिने काढून टाकली… ‘हे काय आपण काहीच करत नाही…. सगळे भासच!!!’
पण आत्ते घुसमटायला लागली. तिची कमकुवत फुफूसं थडथडायला लागली… तिचे डोळे लाल झाले. फिरले. आता फक्त पांढरी बुबुळ आणि आत्तेच तड्फडण. जितकं मरण गितिका जगली त्याच्या क्षण भागात आत्त्या थंड झाली. गितिका बधीर झाली. हे आपणच केलं काय! गितिकाला काही कळेना. मटकन खाली बसली, हंबरडा फुटला. रंजितला आवाज गेला. तो धावत आला. गितिकाने दरवाजा उघडला. “आत्त्या गेली…”
*********
एकटेपण खायला उठत होतं. त्यात एक स्वप्न रोज पडायला लागलं. बुबुळ नसलेली आत्ते भयंकर रागीट चेहरा करून तिच्याकडे बघतेय .
रंजित हाय हॅलो च्या पुढे जातच नव्हता आणि गितिका कमालीची उतावळी होत होती. दिवसेंदिवस उद्वेग वाढत गेला.
एक दिवस जेवण बनवताना मागे आत्ते दिसली.
आत्ते: “कापून टाक तुझी नस त्या चाकूने आणि ये माझ्याजवळ. माझ्या उपकारांची फेड कर.” आवाज हळू हळू वाढत गेला. गितिकाला सहन होईना. तिने हातातल्या धारदार चाकूने स्वतःची नस कचाकचा कापून टाकली. रक्ताची धार वाहू लागली आणि गितिका जमिनीवर पडली.
*********
रंजित त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर सी सी डी मध्ये बसला होता.
रंजित: “कसं असतं ना! सतत तिने आत्तेची सेवा केली आणि आत्ते मेल्यावर आत्महत्या करून टाकली.”
सारिका: “हो माणसाला जगण्यासाठीही कारण लागतं ना! इमोशनल अटॅचमेंट असेलच.”
रंजित: “हो लहानपणापासून सांभाळलं म्हणे आत्तेने तिला. बांधली गेली असेल.” सारिका: “देव तिच्या आत्म्याला शांती देवो…”