सारिका ने जिलेटीन पेपर चा एक मोठ्ठा हार्ट कापला. तो कार्ड पेपर वर ठेवला आणि हार्ट च्या कडे कडे ने ती गिरवू लागली. कार्ड पेपर वर हार्ट कापून मागच्या बाजूने ती जिलेटीन पेपर लावणार होती. व्हॅलेंटाईन डे दुसऱ्या दिवशी होता… आणि स्वतःच्या हाताने बनवलेलं आणि स्वतःची कविता लिहिलेलं ग्रीटिंग कार्ड ती तिच्या व्हॅलेंटाईन ला देणार होती.
सौरव पण आणलेलं गिफ्ट सजवत होता. घरातल्या कोणालाच त्याने सांगितलं नाही की तो काय गिफ्ट देणार त्याच्या व्हॅलेंटाईन ला.
फॉर अ चेंज आज बाबा पण गिफ्ट रॅप करत होते. आईला काहितरी मस्त गिफ्ट मिळणार बहुतेक.
हे सगळं चालू असताना आजी एका कोपऱ्यात बसून होती. वयोपरत्वे तिला आता बाहेर फिरायला ही झेपत नव्हतं. ती घरातल्या घरात फेऱ्या मारायची आणि झोपून राहायची. सारिका सौरव च्या आईने नोकरी सोडून घरची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. या वयात तरी आजीला आराम.
आजीला कळेना अख्ख घर कशाची तयारी करतय. आजी तर शाळेत गेली नव्हती. व्हॅलेंटाईन डे तिला कसचा ठाऊक. आणि तिच्या वेळेस नवऱ्याशी वर नजर करून बोलत नसत. व्हॅलेंटाईन राहिला दूरची गोष्ट…
न राहवून तिने विचारलंच..
“कायं रे सौरव अरे चाललंय काय तुमचं?”
सौरव: “आजी तुला नाही कळणार..”
आजी: “अरे संगीतल्यावर न कळायला मी काय मंद बुद्धी आहे????”
सौरव: “उद्या व्हॅलेंटाईन डे आहे… कळलं का काही तुला?”
आजी: “अरे समजावून सांग की.. कसला डे आणि फे…”
सारिका: “आजी मी सांगते… उद्या ना असा दिवस आहे की आपल्या प्रिय व्यक्तीला प्रेमाने भेट द्यायची. म्हणजे जो कोणी आपला व्हॅलेंटाईन असेल त्याला…”
आजी: “अरे असा काही एक दिवस असतो का… प्रिय व्यक्तीसाठी नेहमी काही न काही करत राहावं. त्याला दिवस कशाला लागतो…”
सौरव: “आजी मी म्हटलं होतं तुला नाही कळणार…”
आजी: “अरे कळलं मला… फक्त पटलं नाहीय…”
बाबा: “कळून काय उपयोग आहे मग.”
आजी: “अरे या तरुण पोरांचं ठीक आहे… तू पण या वयात काय डे की फे साजरा करणार आहेस.”
बाबा: “ऑफ कोर्स… करणार म्हणजे एकदम साजरा करणार… रात्री जेवायला बाहेर जायचंय आपण.”
आजी: “अरे माझ्या म्हातारिचं काय करणार आहात… मला काही झेपत नाहीय तुमच्या त्या हॉटेलात यायला… आणि ते जेवण ही पचत नाही मला आता.”
तितक्यात आई किचन मधून बाहेर येते. आणि बाबा पटकन गिफ्ट ड्रॉवर मध्ये ठेवून देतात..
आई: “तुमच्यासाठी घरी खिचडी बनवू… पण आम्हाला जायला काय…”
आजी डोळे विस्फारून आईकडे बघते.
आजी: “मला टाकून जाणार तुम्ही?”
बाबा: “अरे तू जेव मग आम्ही जाऊ.”
आजी उठते आणि तरा तरा रागाने जायला लागते.
आजी: “मी म्हातारी आता तुम्हाला अडचण झालीय.”
आजी बेडरूम मध्ये बिछान्यात लवंडते…
आजीच्या मनात विचारांचं जाळं बनतं ‘आता या वयात कुचकामी झालेय तर म्हातारीची अडचणच होणार.’
नकळत तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले… आणि जुने दिवस डोळ्यासमोर तरळायला लागले…
‘सौरव चार वर्षांचा होता तेव्हा… ताप उतरत नव्हता म्हणून त्याला कडेवर घेऊन आपण डॉक्टर कडे नेलं होत. आणि सारिका झाली तेव्हा सून केव्हढी कामात असायची… सारिका ला मीच तर संभाळलंय… हव नको ते सगळं पाहिलं आपण… कुटुंब आणि आपण वेगळे नव्हतोच कधी… सुनेच्या ऑफिस मध्ये राजकारण झालं तेव्हा किती दुर्बल झाली होती ती… घरचं सगळं तेव्हा मीच सांभाळत होते… आणि आता काय तो व्हॅलेंटाईन का फॅलेंटाईन साठी मला एकटं सोडून जाणार आहेत…”
रडता रडता आजी चा कधी डोळा लागला कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी चिमण्या चिवचिवायला लागल्या, कावळे ओरडायला लागले तशी आजीचे डोळे उघडले… डोळ्यांसमोर काही ठेवलंय असं वाटलं तिला… सावरत सावरत ती उठून बसली तर तिला कालचे सगळ्यांचे गिफ्ट्स दिसले… आणि तितक्यात घरची सगळी मंडळी मागून ओरडली “हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आजी” आजीला आश्चर्य वाटलं आणि फार आनंदही झाला…
आजी: “अरे काय रे हे”
सारिका: “आजी आमच्या सगळ्यांची प्रिय व्यक्ती तुझ्याशिवाय कोण असणार…”
आजी: “मग काल काय बनवलत तुम्ही मला…”
सगळे हसायला लागले आणि आजीच्या बिछान्यात जमा झाले…
बाबा: “आई भेटी तरी आवडल्या का बघ”
आजी एक एक भेट खोलायला लागली. बाबांनी आणि आईने तिला नवीन हिअरिंग एड दिलेला होता.
सौरव ने पहिल्या कमाईतून आजीला साडी दिलेली होती…
सारिका: “आजी माझ्याकडून स्वतः बनवलेलं ग्रीटिंग आणि कविता मी वाचून दाखवते
जिने आमच्या व्यतिरिक्त
आयुष्य काहीच पाहिलं नाही
जिने जीव ओतला संसारात
झेललं बरंच काही
जिने वळण ही लावलं
सेवा ही केली सतत प्रत्येकाची
अशी माझी खास आजी
व्हॅलेंटाईन आम्हा सगळ्यांची”
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि आजी आनंदात बुडून गेली….