Marathi Short Stories

मोकळीक

‘ट्रेन दुरून दिसायला लागली आणि सगळे सावरले. अशा वेळेला हृदयाचे ठोके वाढतातंच माझे. ट्रेन जवळ जवळ येते आणि सगळे बॅगा, सामान सावरतात तेव्हा हेच ते भयानक आयुष्य असं वाटून जातं मला. ट्रेन थांबता थांबता सगळे आक्रमण करू लागले. मीही जोर काढून मुसंडी मारली. खिडकीचा मोह नसतो मला पण सी. एस. टी. येईपर्यंत बसायला चौथी सीट तरी. अरे… ऐन वेळेला जेवणाचा डबा निसटला खांद्यावरून. असा कसा निसटला… कळलंच नाही…  आपण नियतीच्या हातातलं कळसूत्री बाहुलं आहोत हे मला आता शंभर टक्के पटलं. आतापर्यंत योगायोग म्हणून सगळे अंधश्रध्दा वाटणारे विचार आपण टाळत आलो.  पण असं अजिबात नाहीय. डबा उचलण्याच्या अथक परिश्रमात पूर्ण अवसान घात झाला होता. सगळे धक्काबुक्की करू लागले. मागचे “अरे क्या हुआ… क्या हुआ” म्हणून ओरडू लागले. आणि सगळ्या बाजूने लोटालोटी करून लोकं ट्रेन मध्ये शिरली. डबा उचलून कसाबसा मी शेवटी चढलो. पण गर्दीचा समुद्र नुसता उफाळला होता. काठ काही मिळेना. सगळ्या सीट भरल्या होत्या. आपण कपाळ करंटेच. उलट आज बसायची गरज होती. जीव नुसता थकून गेलाय मीनाक्षीच्या बोचऱ्या बोलांनी.’

मीनाक्षी: “चौदा नंबर च्या चौघुल्यांनीही घर घेतलं दुसरं. आपणच अडकलो आहोत इथे.”

मी: “अगं होईल आपल्या बिल्डिंग चं रिडेव्हलपमेंट… वाट बघूया थोडी.”

मीनाक्षी: “थोडी??? १५ वर्ष होतील आता. घर डोक्यावर पडेल आता. तुमची ऐपत नाही हे सांगा ना… बापाच्या जीवावर घर मिळालं नाहीतर काय केलं असतं.”

मी: “तुला माहीत होतं लग्नाच्या वेळी… माझा पगार माझी ऐपत सगळं.”

मीनाक्षी: “आम्हीं म्हटलं कमवेल नंतर मुलगा. कशाला घेतलात जॉब मधून ब्रेक मधेच. तरी मी सांगत होते.”

मी: “पॉलिटिक्स ने जीव घुसमटला माझा कळतंय का तुला.”

मीनाक्षी: “हो जगात तुम्हीच एकटे जॉब करता आणि तुमच्याचबरोबरच पॉलिटिक्स होतं. लायकीच नाहीय ते सांगा ना.”

‘एक संतापाची लाट तळपायापासून मस्तकापर्यंत गेली. मला वाटायचं हे सगळं वर्णन पुस्तकी असतं. पण सगळ्या नकारात्मक भावना मला अनुभव देऊन जात आहेत आजकाल.

त्यात आयुष मागे लागलेला…’

आयुष: “बाबा मला जायचंय यु. एस. ला. मागच्या वर्षीहि तुम्ही शाळेच्या पिकनिकला जाऊ दिलं नव्हतं मला.”

बाबा:” अरे यु. एस. हि काय पाचवीतल्या मुलांनी जायची जागा आहे… तू थोडा मोठा झालास ना कि आपण सगळे जाऊ.”

आयुष: “बाबा फसवताय मला नेहमीप्रमाणे तुम्ही. वाढदिवसाला ड्रोन मागितला तर नंतर देतो म्हणालात. आता वर्ष संपत पण येईल.”

‘हे असं आता रोजचंच झालं होतं…

अनिच्छेने ऑफिस मध्ये पोचलो.’
बॉस: “सी. एस. के. च मेन डिझाईन बनवलंय निरव ने. आतले सगळे पेजेस बनवायला घ्या. आजच पूर्ण करायचंय. इट्स अर्जंट यु नो…”
‘काम खूप होतं म्हणून दुसरा डिझाइनर आणला कंपनीने. पण त्याचं कौशल्य माझ्यापेक्षा उजवं निघालं. आता तो मुख्य डिझाइनर बनला आणि उरलेलं साधं काम माझ्याकडे…माझ्या बाबतीत वाईट होतंच राहणार. हे स्वीकारूनच टाकलं आहे मी. पण मन हळू हळू आयुष्यावरून उडत चाललंय. 

कसली डेड लाईन… कसली नोकरी… कसली बायको… कसली मुलं… सगळ्या नुसत्या अपेक्षा आणि माझं हरणं… आयुष्य एक भयानक अपयश बनलंय. हे काय होतंय आपल्याला… असं करून नाही चालणार… या अशाच आयुष्याचा स्वीकार करावा लागणार… जगावच लागणार!!! मन विटून गेलं. मॉनिटर ऑफ करून टाकला आणि निघालो… पण कुठे? तेच ऑफिस… तेच घर… मनःशांती होती कुठे? आपला स्वीकार करणारी लोकं आहेत कुठे? कुठे निघालो माहीत नाही… मन नेईल तिकडे… वाट दिसेल तसं… निर्विकार विझलेलं आयुष्य घेऊन… परत त्याच ऑफिसात आणि त्याच घरी जावं लागेल याचं भान न ठेवता. 

वाटेत एक बाग दिसली. घुसलो आत. एक बेंच बघून बसलो. शून्यात नजर लावून… तितक्यात गाण्याचे बोल ऐकू आले.’ “तू न जाने आस पास है खुदा… तू न जाने आस पास है खुदा…” ‘आवाजाच्या दिशेने पाहिलं. एका कोपऱ्यात काळे कपडे घातलेला प्रसन्न फकीर बसला होता. आंधळा होता बहुतेक तो. हो आंधळाच. फकीर, त्यातून आंधळा… तरी एव्हढे प्रसन्न भाव… फकीर गातच होता…’ “खुद पे डाल तू नजर… हालातो से हारकर…कहा चला रे…” ‘आपसूकच त्याच्या जवळ जाऊन बसलो. त्याला माझी चाहूल लागली. तो गायचा थांबला आणि विचारलं’ 
फकीर: “कोण तू?”
मी: “एक हरलेला माणूस!”
फकीर: “कुठे लावलंय लेबल?”
मी: “कसलं लेबल?”
तो: “‘हरलेला माणूस’ असं लेबल.”
मी: “ते माझ्या मनात आहे. बाहेर नाही दिसत.”
फकीर: “जे डोळ्यांनी दिसत नाही ते फक्त कल्पनेत असतं. ते कल्पनेतून विश्वासात टाकायचं अघोरी कृत्य झालंय तुझ्या हातून.” 
मी: “कृत्य? माझं कृत्य??? ते माझ्या मनात आलंय घडलेल्या घटनांमुळे.” 
फकीर: “काय रंग आहे त्याचा?”
मी: “त्या हरलेपणाच्या भावनांचा रंग?????”
फकीर: “जे काही आहे तुझ्याकडे त्याचा.”
मी: “भावनेला रंग असतो???”
फकीर: “जे तुला दिसत नाही आणि दुसऱ्यानाही दिसत नाही त्याला का उगाच महत्व देतोस?”
मी: “हेच आहे आता…”
फकीर: “अरे मरणार आहेस का आज तू?”
मी: “मी मेलोय आधीच.”
फकीर: “कुणी मारलं?”
मी: “अनुभवांनी.”
फकीर: “अनुभव कुणी दिले?”
मी: “माणसांनी.”
फकीर: “तू म्हणजे ती माणसं का?”
मी: “माझी महत्वाची माणसं आहेत ती…”
फकीर: “कुणी दिलं महत्व त्यांना?”
मी: “मलाच वाटतं.”
फकीर: “तुला जाणवतंय ना? मागासपासून सगळं तुलाच वाटतंय. ती माणसं ते अनुभव त्या भावना तुझ्या का?… फक्त तू म्हणतोस म्हणून!”
मी: “मग?”
फकीर: “मग तू सगळं माझं असं नको मानूस.”
मी: “मग काय करू?”
फकीर: “तुला काय हवंय?”
मी: “काहीच नको, फक्त मनःशांती!”
फकीर: “मग फक्त तीच ठेव तुझ्याकडे. बाकी सगळ्यांचं सगळं सगळ्यांना देऊन टाक. सगळे तुझे आहेत हा भ्रम तोडून टाक.”

‘काय झालं कळलं नाही नीट. पण काहीतरी मिळालं. डोक्यात काहीतरी चमकलं… मेंदूला मोकळीक मिळाली. उठलो आणि चालायला लागलो. ऑफिस मध्ये आजची डेडलाईन होती ना. बागेच्या गेट पर्यंत गेलो. अरे त्या फकिराला धन्यवाद म्हणायचं राहूनच गेलं. मागे वळलो तर फकीर तिथे नव्हताच!!! कुठे गेला अचानक?? त्यातून आंधळा… इतक्या पटकन कुठे जाणार!!! धावत मागे गेलो. तो बसला होता तिथे फिरून पाहिलं. पण कुठेच नाही… छे… हे काही वेगळंच! तितक्यात वॉचमन आला.’ 
वॉचमन: “साब क्या कर रहे हो? गार्डन बंद है. चार बजे खुलेगा. गेट पे लगाया है. ओपन एन्ट्रन्स है तो आपने देखा नही होगा. जाओ अब…”
‘काय करणार. निघालो.

ऑफिस मध्ये आलो. चौफेर नजर फिरवली. बरेच दिवस मित्रांशी नीट बोललोही नव्हतो. आधी काम बघूया. मेन डिझाईन निरव ने बनवल्यावर जास्त काही काम नव्हतं. होईल आज. निरव आहे ते बरंच आहे. आपल्याला डोकेफोड नाही. पण आपण रिक्वायरमेंट समजून घेण्यात एक्सपर्ट आहोत ना. बघू विचारून बॉस ला क्लाएंट को-ऑर्डिनेशन देणार का. या विचाराने कामाचा वेग वाढला. आतल्या पेजेस मधेही इनोव्हेटिव्ह काम होऊ शकतं की. वेगळ्या लेव्हल ने विचार करायला लागलो. आणि निरव ची भन्नाट काही निर्माण करायची कलाही आपण आत्मसात करू शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे?

कामात दिवस कधी संपला कळलंच नाही. अर्धा तास होता निघायला. प्रतीक शेलारकडे लक्ष गेलं. प्रतीक शेलार खूप बोलका मोकळा होता. त्याच्या आईच्या ऑप्रेशन चा काही प्रॉब्लेम ऐकून होतो मी. आपण लक्षच देत नाही कुणाकडे. पण मित्र म्हणून चौकशी तर… मागून जाऊन थाप मारली त्याच्या पाठीवर. आणि तो खुश झाला.’ 
प्रतीक: “आज काय रे. वेगळाच वाटतोयस.” 
मी फक्त हसलो.
मी: “आई कशी आहे तुझी?”
प्रतीक: “बघू रे. पैशाची कशी सोय होते. प्रयत्न चालू आहेत.”
मी: “हं… काळजी घे.”
प्रतीक: “हो रे… विचारलस बरं वाटलं…”
‘मी स्मित करून निघालो.

घरी आलो. बायकोने नेहमी प्रमाणे निस्तेज चेहऱ्याने दरवाजा उघडला.’ 
मी: “काय ग नेहमी तुझा चेहरा पडलेला…”
बायको: “कशासाठी खुशीत राहू?”
मी: “श्वास घेतेयस म्हणून…”
‘हसलो. ती मान झटकून निघून गेली. मी तिच्या मागे स्वयंपाक घरात गेलो.’ 
मी: “बाकीच्या बायका बघ. नवरे त्यांना कमवायला पाठवतात. बॉस ची बोलणी खायला. मी एकटा पैशाची बाजू सांभाळतोय ना. ऐकून पण घेतो तुझी बोलणी.”
‘बायको चिडते.’
बायको: “काय संभाळताय असं. काय आहे काय असं???”
मी:” तू तुझे निर्णय घ्यायला समर्थ आहेस. मी जसा आहे तसा स्वीकार करायला जमतं का बघ. नाहीतर सोडूनच दे सगळं. सगळं टेन्शन जाईल तुझं.” 
‘बायको भांबावली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.’ 
बायको: “कुठे जाऊ मी? कोण आहे माझं?”
मी:” मी आहे तुझा. म्हणूनच सांगतोय. मी नसेन इतकंही वाईट समजू नको आयुष्याला. मार्ग निघतील. माझं मन सांगतंय.”
‘तिला हुंदका फुटला. आणि कधी नव्हे ती, ती मला बिलगून रडू लागली. तितक्यात आयुष बाहेरून धावत आला. आम्हाला मिठीत बघून त्याने जीभ चावली आणि वळून जायला लागला.’ 
मी: “ये रे आयुष ये. मिठी पूर्ण होउदे.” 
आयुष: “बाबा का मिठी?”
मी: “तू मला समजून घेणार आहेस म्हणून.”
आयुष: “म्हणजे?”
मी: “हे बघ… बाबांकडे आत्ता जास्त पैसे नाहीत. पण बाबा खूप प्रयत्न करतील तुझी स्वप्न पूर्ण करण्याचा. बाबांना साथ देशील ना?”
आयुष: “म्हणजे मला यु. एस. ला नाही जायला मिळणार…”
मी: “बाबा सांगतोय ना तो पूर्ण प्रयत्न करेल. तू बाबांचा आहेस की यु. एस. चा?”
‘आयुष हसतो.’ 
आयुष: “यु. एस. चा कसा असेन मी? मी भारताचा आणि बाबांचा.” 
‘मी त्याला जवळ घेतलं आणि पाठ थोपटली.’ 
मी: “शाब्बास!”
‘तितक्यात खालून रस्त्यावरून गाण्याचे बोल आले. हो… आवाज तर तोच… फकीर…’
फकीर: “तू ना जाने आस पास है खुदा.”
‘मी धावत बाल्कनीत गेलो. पण रस्त्यावर फकीर दिसेना.’ 
मी: “मीनाक्षी अग आवाज कुठून आला गाण्याचा?”
बायको: “कसलं गाणं?”
मी: “अगं ते पिक्चरचं गाणं”
बायको: “माझं नाही लक्ष. मला नाही आलं बाई ऐकू.”
‘मी आश्चर्याने पुन्हा बाल्कनीतून बाहेर बघितलं…आणि रस्त्यावर शोध घेऊ लागलो…’

2 thoughts on “मोकळीक

  1. छान ! लघुकथेचा विषयही मनाला भावणारा आहे. थोडक्यात बरंच काही सांगून जाते ~’मोकळीक’
    सर्वांनी छान प्रकारे कथेचे वाचन केले आहे, अगदी छोट्या आयुषनेही.
    गाणारा आंधळा फकीर लाजवाबच!
    अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा !!

    1. धन्यवाद! आवड असेल तर बाकीच्या कथाही वाचा व अभिप्राय द्या 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *