“गण्या…. कुठे मेलास… लवकर आण मिसळ पाव यांची….”
‘मालक नेहमीच असे ओरडतात… कस्टमरला असा स्पेशल मस्का लावल्याने कस्टमर वाढतात का? कुणाला माहीत… जेव्हा माझं हॉटेल होईल तेव्हा कळेल… वा स्वतःच्या हॉटेलच्या कल्पनेने भारी वाटतं… पण आपल्याला जमेल का… होईल का स्वप्न पूर्ण? कसं होईल, कुठून येतील पैसे, मदत… त्या सीक्रेट वाल्या पुस्तकात वाचलं होतं… मनापासून इच्छा असली आणि व्यक्त केली की सृष्टी ते घडवून आणते… खरं असेल का ते… मग आई का गेली… मी नेहमी तिचं दीर्घायुष्य मागत असायचो… शी नको… जाम वात आणतात हे विचार डोक्याला… डोक्याला बटण हवं होतं चालू बंद चं… गणेश चं परिस्थिने गण्या वेटर झाल्याचं तरी कुठे मी मनात आणलं होतं? काका काही झालं तरी आपलं शिक्षण पूर्ण नाही करू शकणार… स्वतःच्या मुलांचं करायची जेमतेम क्षमता… मी वेटर म्हणूनच आयुष्यभर जगलो तर… ही कल्पनाच सहन होत नाही. परिस्थितीने जे घालवलंय ते नशिबानेच परत मिळू शकतं. खुपसा अभ्यास रात्री वर्गातच केला पाहिजे. उप्स….’
“गण्या…. काय पडलं रे?????”
‘हा ट्रे पण ना…मालकाला ओरडायची संधी देतो. आता पटापट आवरतो आणि कॉलेज ला निघतो……………….…………………ओह थकायला झालं…..हॉटेल नाही झालं तर जाऊदे पण एक चांगली नोकरी मिळण्याइतकी तरी ऐपत झाली पाहिजे………..…………………..
इतका आवाज का येतोय सायकल चा…परत काहीतरी खराब झालं तर काकांकडे द्यायला पैसे नसतील…….
ओह फारच आवाज आहे हा……………….
जोराने सायकल चालवून असं होतं का? पण हळू चालवली तर उशीर होईल…….
ओह लेक्चर सुरू झालं…………………
आह काय चाललंय… ओह मी चक्क झोपलोय काय…. नशीब सरांनी नाही बघितलं…. असं करून आपण वर्गातच अभ्यास कसा करणार… शी पुन्हा काळजी…. या काळजीने रात्रीही नीट झोप येत नाही मग… आता हा विचार करत बसलो तरी कुठे अभ्यास होणार… लक्ष देतो…लक्ष…
घरी जावसंच वाटत नाही. विटलोय मी या परिस्थितीला… आपलं भविष्य कसं असेल… मला हे असं आयुष्य नाही जगायचंय… नशीब साथ देईल का… हे विचार आणि त्यात हा सायकलचा आवाज… या जगात देव असेल तर आणि माझं स्वप्न पूर्ण होणार असेल तर आज रात्री पाऊस पडेल… हे काय बोलतोय मी… उन्हाळ्यात कसला पाऊस… असेल देव आणि माझ्या मेहनतीला फळ येणार असेल तर का नाही पाऊस पडणार…
आडवं तर झालोय पण झोप येणार आहे का… फक्त झोपेसाठी सुध्दा आपल्याला प्रयत्न करावे लागत आहेत… काय मूर्खपणा माझा… असा माझ्यासाठी पाऊस पडणार…….
हा कसला आवाज…”मी तुझ्या पाठीशी आहे” असं कोण बोलतंय… ही पांढरी तेजस्वी आकृती… कसला आवाज……
ओह… स्वप्नं होतं तर…बाहेर कसला आवाज… माझा विश्वास नाही बसत आहे… खिडकी खोलतो… बापरे पाऊस… पाऊस कसा आला उन्हाळ्यात… खरंच आला काय तो माझ्यासाठी… वा… या पावसात भिजलंच पाहिजे………..वा… माझं कुठलही स्वप्न पूर्ण होणार… नक्कीच पूर्ण होणार…..’
गणेश आपल्या स्वप्नांच्या पावसामध्ये नखशिखांत भिजून गेला… त्याने स्वतःतला “मी” पणा पुरेपूर साजरा केला…