डी. के. पाटील सेमिनारला आले. त्यांच्या मित्राने त्यांना जवळ जवळ जबरदस्तीच केली होती. नाहीतर हे सेल्फ हेल्प सेमिनार त्यांच्या गावीही नव्हतं. शाळेतला सख्खा मित्र म्हणून त्याच्या शब्दांचा मान डी. के. पाटील यांनी ठेवला. आता आलोच आहोत तर ऐकूया या वृत्तीने डी. के. पाटील सगळं ऐकायच्या तयारीत होते. डी. के. पाटील 40 वर्षांचे. आपल्या सी. इ. ओ. या हुद्द्यावर कंपनीचा सगळा कारभार सांभाळताना त्यांना क्वचितच वेळ मिळत असे. वेळ मिळाला की ते कलेची भक्ती करत. कला हे त्यांच्या बायकोचं नाव नाही बरं का! कला म्हणजे आर्ट! ते शास्त्रीय संगीताच्या मेहफिलीला जात. ‘आयुष्यावर गाऊ काही’ हा गाण्यांचा कार्यक्रम त्यांनी कित्तेक वेळा पाहिला होता. जमलं तर ते त्यांची बायको शांता हिला सुद्धा घेऊन जात. त्यांची दोन कॉलेज मध्ये जाणारी मुलं मेघ व तरल यांना काही शास्त्रीय संगीत, नृत्य याची आवड नव्हती. शांताच्या सहकार्याने त्यांचा संसार व्यवस्थित चालला होता. ते भरपूर कमवायचे आणि शांता व्यवस्थित कुटुंब चालवायची. मुलांची काळजी घ्यायची.
पण ‘कहानी मे ट्विस्ट’ तर हवा ना…आज तोच दिवस होता. डी. के. पाटील आज ‘सेल्फ हेल्प’ सेमिनार ला आले होते. जीवन बदलणारं सेमिनार. राजदीप सक्सेनाचं सेमिनार. राजदीप सक्सेना सकारात्मक विचार आणि सेल्फ हेल्प मध्ये नावाजलेलं नाव. त्याचे विचार ऐकून कितीतरी लोकांनी स्वतःच आयुष्य रुळावर आणलं होतं.
तितक्यात राजदीप सक्सेनाची एन्ट्री झाली. राजदीप सक्सेना अतिशय उत्साहात “स्वागत मित्रहो स्वागत! आजचं अजून एक सेमिनार तुमच्या नावे… जीवन बदलू शकतं!!! त्याच्या पाठोपाठ अख्खी पब्लिक ओरडली. “जीवन बदलू शकतं!!!” राजदीप सक्सेना चा उत्साह आणि फिटनेस पाहून डी. के. पाटील चाट पडले. हा माणूस नक्कीच काहीतरी चांगलं सांगणार असं त्यांना उगाचंच वाटायला लागलं. राजदीप सक्सेना खूप काही बोलला. पण त्याची महत्वाची वाक्य खालीलप्रमाणे.
“तर आपण नुसतं जगायचं नाही. आपण आनंदात जगायचं. आनंद कशात आहे? आनंद पैसे कामावण्यात आहे का? पैसे खर्च करण्यात आनंद आहे. पण तो क्षणिक. खरा आनंद आहे स्वतःला हवं ते करण्यात. खोल मनात आपली आवड तडफडत असते. त्या आवडीला मूर्त स्वरूप देण्यात खरा आनंद आहे. तुम्हाला गाणं आवडत असेल. पण अख्ख आयुष्यच गाणं बनलं तर? तुम्ही छातीवर हात ठेवून, डोळे बंद करून विचार करा की तुम्हाला खरंच काय आवडतं. तुम्हाला खरंच काय करायचंय…तुमचं उत्तर तुम्हालाच सापडेल!”
डी. के. पाटील यांनी कधीच स्वतःच्या छातीवर हात ठेवून स्वतःला काहीही विचारलं नव्हतं. तेव्हढी फुरसतंच नव्हती कधी त्यांना. वडील वारल्यानंतर ते आयुष्याच्या राहाटगाड्यात घुसले ते घुसले. मग थांबणं नाही आणि मागे वळून पाहणं नाही. पण राजदीप सक्सेनाचं ऐकून त्यांनी छातीवर हात ठेवला आणि डोळे बंद केले. सगळीकडे पूर्ण शांतता. डी. के. पाटील आपल्या मनाचा शोध घेऊ लागले. आणि त्यांना ऐकू येऊ लागले बासरीचे सूर…लहानपणापासून त्यांच्या मनात बासरी शिकायची अतृप्त इच्छा होती.
सेमिनार संपलं आणि ते उडतच घरी निघाले. बासरीच्या तालावर त्यांचं मन नाचत होतं. त्यांनी सेमिनार ला जायला सांगणाऱ्या मित्राला फोन केला. “थँक्स अ लॉट मित्रा. मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही.”
मित्र: “सांगितलं होतं ना की तुझं आयुष्य बदलेल…”
डी. के. पाटील दिवसभर विचार करत राहिले.
रात्रीची वेळ होती. डी. के. पाटील बायको शेजारी विचार करत पडले होते. एव्हढे शांत ते कधीच नसत. रोज दिवसभराचा अपडेट शांता पाटील यांना मिळत असे. आज डी. के. पाटील यांना गप्प बघून त्यांनाही कसंतरी व्हायला लागलं.
शांता पाटील: “काय झालं ओ?”
डी. के. पाटील यांनी खूप वेळ शांता पाटील च्या डोळ्यात पाहिलं. आणि हिम्मत करून ते म्हणाले
“मी नोकरी सोडतोय.”
शांता पाटील ना वाटलं ते मस्करीच करत आहेत. शांता पाटील ओशाळल्यागत हसल्या.
“काय म्हणताय काय नक्की!”
डी. के. पाटील: “खरंच सांगतोय मी. या नोकरीतून मला काहीच वेळ मिळत नाही. मी नोकरी सोडून बासरी शिकणार आहे.”
शांता पाटीलना हसू की रडू कळलं नाही
“आता चाळीशीत बासरी वादक बनणार तुम्ही”
डी. के. पाटील शांत.
शांता पाटील: “अहो आपला मेघ शेवटच्या वर्षाला गेलाय आत्ताच. तरल तर सेकंड इअर ला आहे…तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाहीय मला.”
डी. के. पाटील: “मी घुसमटतोय या जीवनाच्या चक्रात. मला माझं आयुष्य समरसून जगायचंय. बाबा गेले तेव्हापासून तेच तेच…त्याच त्याच जबाबदाऱ्या…तेच तेच डोकं पिकवून टाकणारं टेन्शन…बस झालं!! माझं हरवलेलं बालपण आणि तारुण्य मला हवंय.”
यावर काय बोलायचं ते शांता पाटील ना कळेना. पण त्यांना खूप टेन्शन यायला लागलं. कुठून डी. के. पाटील यांच्या डोक्यात हे खूळ भरलं. कूस बदलून त्या काशातरी झोपल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी डी. के. पाटील नेहमी प्रमाणे लवकर उठले नाहीत. शांता पाटील नेहमी प्रमाणे उठल्या. त्या हळूच मेघ च्या रूम पर्यंत गेल्या. दार ठोठावू लागल्या. मेघ डोळे चोळत उठला. त्याने दरवाजा उघडला.
“आई तू आत्ता!!! मी सहा वाजता उठतो आई. का उठवलंस मला” म्हणत वैतागला.
शांता पाटील: “खाली चल डायनिंग टेबलपाशी.”
मेघ: “काय झालं? बरी आहेस ना?”
शांता पाटील: “चल खाली. सांगते.”
मेघ ला डायनिंग टेबल कडे जायला सांगून त्या तरलच्या रूम कडे गेल्या. दार ठोठावू लागल्या. तरल पण कशीतरी उठली.
“आई तू? काय झालं?”
शांता पाटील: “चल खाली. डायनिंग टेबलापाशी.” तरल ला काहीच कळत नव्हतं. त्या दोघीही डायनिंग टेबलपाशी आल्या. मेघ बसला होता. त्या दोघीसुध्दा बसल्या.
शांता पाटील: “बाबांनी नोकरी सोडायची ठरवलीय. त्यांना स्वतःच आयुष्य जगायचंय.”
मेघ: “काय!!! मग… आमचं काय होणार???”
तरल: “एव्हढं सेविंग आहे बाबांकडे? नोकरी सोडून आपल्याला कसं पोसतील ते?”
शांता पाटील: “त्यांना स्वतःच आयुष्य जगायचंय.”
मेघ: “आम्हीच त्यांच आयुष्य आहोत असं वाटायचं मला काल पर्यंत.”
शांता पाटील: “मी सांगते तसं करा.”
शांता पाटीलनि मुलांसोबत काहीतरी खलबत केलं.
डी. के. पाटील आठ वाजता उठून खाली आले. बघतात तर सगळी मंडळी बसलियत डायनिंग टेबल पाशी. मेघ आपला लॅपटॉप उघडून काहीतरी शोधतोय. तरल वर्तमानपत्र उघडून काहीतरी लिहितेय. शांता पाटील शांत बसून आहेत. डी. के. पाटील पण येऊन बसले.
“काय चाललंय तुमचं? मेघ तरल कॉलेज ला नाही गेलात?”
सगळे शांतच कुणीच उत्तर देईनात.
डी. के. पाटील: “मी काय बोलतोय?”
शांता पाटील: “ते दोघे नोकरी शोधताहेत.”
मेघ: “हो बाबा. जॉब डॉट कॉम वर प्रोफाइल टाकलं मी. सर्च करतोय कुठला बॅक ऑफिस चा जॉब मिळतो का.”
तरल: “हो मी पण पेपरमध्ये शोधतेय जॉब.”
शांता पाटील: “तुम्ही सुखाने तुमचं आयुष्य जगा. मुलं तुमच्यावर भार होणार नाहीत. मी म्हटलं त्यांना, तुमच्या सुखासाठी बाबांनी खूप त्याग केलाय. आता त्यांना मोकळं करा. स्वतःच आयुष्य जगू द्या. त्यांचं बालपण जगू द्या.”
डी. के. पाटील शांतच झाले. मग ते त्रासून म्हणाले. “असं काही नाहीय. स्वतःची मुलं कुणाला अडचण होतील?”
मेघ: “तुम्हाला अजून त्याग करू द्यायचा नाही आम्हाला.”
शांता पाटील: “मी पण नोकरी करिन म्हणतेय. आता कोण कसला जॉब देणार मला… लोणची पापड करून विकेन.”
डी. के. पाटील: “अगं काय बोलतेयस तू. तुम्हा तिघांमुळे तर माझं आयुष्य सुंदर आहे.”
शांता पाटील: “याची जाणीव आहे ना तुम्हाला? तुमचे त्याग हे आमच्या आयुष्याचं सौंदर्य आहे. तुम्ही ज्या पदाला आहात ती खूप ग्रेट गोष्ट आहे. तुम्ही इतरांना आणि स्वतःलाही खूप सुखी आणि आनंदी केलंय. आता एका बासरीच्या वेडापायी सगळं विसरताय तुम्ही…”
मेघ: “हो बाबा वुई नीड यू अँड प्राउड ऑफ यू.”
तरल: “बाबा तुम्ही जसे आहात तसे छान आहात आणि आम्हाला हवे हवेसे आहात.”
शांता पाटील: “तुम्ही जे काही केलंत ते खूप भव्य दिव्य आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीही गमावलेलं नाहीय.”
डी. के. पाटील यांना भरून आलं. त्यांना जाणवलं कि आपलं कुटुंब आतापर्यंत आपलं सर्वस्व होतं. आणि पुढेही ते आहेत म्हणून आपण आहोत. ते खुर्चीवरून उठले आणि त्यांनी तिघांना कवेत घेतलं. बॅकग्राउंड ला बासरीची अव्यक्त धून वाजत राहिली.