मी “त्या”ला मेसेज केला ‘मीस यू’
“त्या”चं उत्तर आलं ‘हे काय नवीन?’
मी हसले.
मी: “मनाचे खेळ”
“तो”: “तुला माहीत आहे माझं तिच्यावर प्रेम आहे. तिच्या नुसत्या आठवणीत मी उरलेलं आयुष्य घालवू शकतो”
मी पण काय वेडी आहे. माहीत असून पुन्हा पुन्हा…
मूर्ख आहे “तो”. “त्या”चं कसलं प्रेम!! ती एका फटक्यात त्याला सोडून गेली. मागे वळूनही पाहिलं नाही. याला काय प्रेम म्हणतात…
मी पुढे निघून जायचं ठरवलं. या वेळेस पक्कं. सहज म्हणून मॅट्रिमोनिअल साईट्स मधेही नाव नोंदवलं. निरनिराळे नमुने भेटू लागले. कुणाशी मन जोडायला काय लागतं माहीत नाही. ह्या आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी. खुप दिवस निघून गेले. “त्या”ची आठवण येत असे… पण…
एक दिवस वहिनीला भेटायला गेले. वहिनी म्हणाली “तुझे आधीच इतके प्रॉब्लेम्स… कशाला लग्नाच्या फंदात पडतेस? नुसते रिलेशन्स ठेव हवं तर… एक अनुभव आणि गरज म्हणून!” तीचं बोलणं संयुक्तिक होतं. मला किती जबाबदाऱ्या झेपणार होत्या!!!
आणि “हा” भेटला… बऱ्यापैकी देखणा. आर्थिकरित्या स्थिरस्थावर.
हा: “तू एकटी आहेस. मी पण एकटा. आपण दोघं एकमेकांना समजून घेऊ शकतो. मला दृढ नातं हवंय. एकमेकांना समजून घेणारं. लग्न करून किती लोक तडजोडीत राहतात. आपण रिलेशन ठेऊ… लग्नाचं स्वतःच महत्व आहे. पुढे मागे करू वाटलं तर लग्न.”
वाहिनीचं ऐकून माझी वन नाईट स्टॅन्ड ची हि तयारी होती. “हा” तर जन्मभराचं नातं बोलत होता… त्या रात्री खूप गप्पा झाल्या… पण मन रमेना. काहीतरी ठुसठुसत होत. दुसऱ्या सकाळी “ह्या”ला मेसेज केला “मला कदाचित जमणार नाही…” “ह्या”चा लगेच फोन आला
“हा”: “हे बघ. तुला नक्की काय वाटतंय? काल एव्हढे छान बोललो आपण. मला खूप पॉझिटिव्ह वाटलं…” आणि मला वेगवेळ्या प्रकारे पटवून दिलं… पण असं प्रेम थोडच बांधलं जातं? तरीही मला वाटलं एक संधी देऊ. दुसऱ्या रात्रीही खूप गप्पा… पण मन रमेना… एक प्रकारचं रितेपण… आणि “ह्या”ला दुसऱ्या सकाळी मेसेज केला “नाही जमणार. माफ कर…” “ह्या”चं वैतागणं योग्य होतं. एका प्रकारे मी “ह्या”ला झुलवत होते. शेवटी रागाने “हा” बोलला “याच स्वभावामुळे तू एकटी आहेस. आणि असं करत राहिलीस तर एकटीच राहशील.” जखम उघडी पडली. डोळ्यात पाणी तरारलं आणि अस्वस्थ होत मी त्याला म्हटलं “माझं एका मुलावर प्रेम आहे आणि “त्या”च्या आठवणीत मी अख्ख आयुष्य काढेन…” “ह्या”ने फोन कट केला…
माझं प्रेम परिपूर्ण नव्हतं पण एका अनुभवाने मी परिपूर्ण होते… प्रेमाच्या! मी “त्या”ला मेसेज केला “मीस यू” “त्या”चं उत्तर आलं “तूझ आपलं जुनंच” मी हसले. मनात एक हळुवार गाठ बांधली जाणं आणि “त्या”च्या किंवा “ती”च्या साठी अलगत डोळ्यातून निखळ पाणी येणं म्हणजे प्रेम. तुमचा प्रेमाचा अनुभव काय आहे? तुमची प्रेमाची व्याख्या काय आहे?