रचना ऑफिसला जायची तयारी करत होती. रचना आजपर्यंत कधी लेट गेली नव्हती. ती खूप पंक्चुअल होती कामाच्या बाबतीत. म्हणून तर वयाच्या ३० व्या वर्षी ती कंपनीची मॅनेजिंग डिरेक्टर होती. प्रसाद बरोबर घटस्फोट झाल्यावर तर तिने कामाला जुंपून घेतलं होतं. तिला हायसं वाटायचं की तिला मुलं तरी नाहीत. मुलांची जबाबदारी घेऊन एकटीने आयुष्य कंठायचं कठीण वाटायचं तिला. पण तिला स्वतःविषयी खूप आदर होता. तिच्यामुळे कंपनी खूप नफ्यात आली होती. भन्नाट कल्पनांचं माहेरघर होतं तिचं डोकं. कमालीची केश रचना, अफलातून कॉर्पोरेट कपडे आणि उंची मेकअप करून ती ऑफिसला जायला निघायची तेव्हा अख्ख्या बिल्डिंगचं लक्ष तिच्याकडे जायचं. पण अख्ख्या बिल्डिंगमधे तिच्याशी बोलायची कुणाची हिंमत नव्हती, लक्ष्मी मामींशिवाय!
लक्ष्मी मामी ४० वर्षांच्या होत्या. हाऊस वाईफ! त्या कुठे वाटेत रचनाला भेटल्या तर आवर्जून तिच्याशी बोलायच्या. रचनाही त्यांचाशी तोंडदेखलं बोलायची. रचना स्वतःला महत्व तर द्यायचीच पण इतर घरगुती बायका तिला तुच्छ वाटायच्या. आपले सगळे गुण, कला, क्षमता नवऱ्याच्या स्वयंपाक घरात फोडणीसकट आगीत घालणं तिला जराही पटत नसे. त्यामुळे या बायका तुच्छ तर आहेतच त्याबरोबर नवऱ्याची गुलामी करणाऱ्या मूर्खही आहेत असं तिचं मत होतं. स्वयंपाक घरात आणि घरकामात वेळ घालवणं म्हणजे आयुष्य व्यर्थ घालवणं अशी तिची समजूत होती. लक्ष्मी मामी तिला काही गोड धोड नवीन बनवलेलं खायला देत आणि ती नको नको म्हणताना गळ्यात घालीत. रचना ला ते खायला आवडत असे पण उगाच उपकृत वाटत असे. ती कधीही बिल्डिंग च्या कुठल्या कार्यक्रमात सहभागी होत नसे, फक्त सोसायटी च्या ऑफिशिअल मिटिंग शिवाय.
एकदा रचना घरी येत असताना बागेतल्या बाकावर बसलेल्या लक्ष्मी मामींनी तिला हाक मारली. लक्ष्मी मामी एकट्याच होत्या. रचना इच्छेविरुध्द त्यांच्याकडे गेली.
लाक्ष्मिमामी: “ये ग बस अशी जरा. सतत काय काम आणि काम! सगळ्यांशी बोलत जा जरा.”
रचना (मनात): “माझ्याकडे वाया घालवायला वेळ नाहीय.”
लक्ष्मी मामी: “लग्न वगैरे करणार की नाही? किती वय तुझं?”
रचना (मनात): “माझं लग्न आणि माझं वय माझे वैयक्तिक विषय आहेत. दुसऱ्या कुणाला मला उत्तर द्यायची काही सक्ती नाहीय.”
लक्ष्मी मामी: “अगं बोल ना! काय घुम्यासारखी बसून राहिलीस?”
रचना: “माझं वय ३०. माझा घटस्फोट झालाय.”
लक्ष्मी मामी: “अगं काय बोलतेस!! पण एकदा लग्न मोडलं म्हणून एकटं रहायचं ठरवू नकोस. लग्न ही आपली फक्त शारीरिक गरज नाही. लग्न म्हणजे मानसिक आधार आणि जीवनभराची साथ असते.”
रचना (मनात): “मला लेक्चर नकोय.”
लक्ष्मी मामी: “अशी येत जा ना खाली. घरात एकटी कंटाळत नाहीस?”
रचना (मनात): “या घरगुती बायकांबरोबर चहाटाळ करण्यापेक्षा मी एकटीच बरी.”
रचना: “चला मी निघते. ऑफिस चा कॉल आहे एक आता.”
लक्ष्मी मामी: “जा जा… असं आयुष्य रितं ठेवू नकोस पण.”
रचनाने पटकन लक्ष्मी मामींकडे बघितलं. आयुष्य रितं??? तिला ती गोष्ट मनाला लागली. आपण जे मिळवलंय ते साधंसुध नाही. दिवसभर कामात मन रमवत असताना आपलं आयुष्य रितं?? या घरगुती स्वयंपाकीण बाईना काय कळतंय! पण तिला तरीही फार त्रास होत राहिला. ती घरी जाउन जुन्या आठवणी येउन ढसा ढसा रडली. प्रसाद बरोबर तिचा प्रेम विवाह झाला होता. दोघे ऑफिस मध्ये एकत्र होते. दोघेही कामात खूप हुशार. एकत्र काम करताना त्यांच्या वेव्हलेन्थ जुळल्या आणि त्यांनी लग्न केलं. प्रसादला माहित होतं रचना महत्वाकांक्षी आणि हुशार आहे. पण लग्न झाल्यावर प्रसादच्या अपेक्षा बदलल्या. तिने घराला जास्त वेळ द्यावा अशी अपेक्षा तो करू लागला. पण रचना तिच्या करिअर मध्ये खूप पुढे जात होती. अशा वेळी तिला अजून काम करायची स्फूर्ती येत असे. त्यात प्रसादचे इगो प्रॉब्लेम्स. दोघांमध्ये भांडणं सुरु झाली. रचनाला जाणवलं हे लग्न वगैरे आपल्यासाठी नाही. मला फक्त करिअर करायचं आहे, असं सांगून तिने प्रसादला घटस्फोट दिला. पण आज लक्ष्मी मामींनी केलेल्या रित्या आयुष्याच्या उल्लेखाने तिला रडूच आलं. काही म्हटलं तरी तिचं प्रसाद वर प्रेम तर होतंच ना.
रविवारी रचना उठली ती फोन च्या घणघणाटामुळे. पलीकडून तिच्या कलीगचा आवाज आला. “अभिनंदन रचना! तुझा ‘इट्स डिफरंट’ मॅगझीन मधे इंटरव्ह्यू छापून आलाय.
रचना खूप खुश झाली. अस काही झालं कि मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटतं. तिला दिवसभर अभिनंदनाचे फोन येत राहिले.
पण तिला बोलायचं होतं ते लक्ष्मी मामिंशी. माझं आयुष्य रितं नसून ते माझ्या कामांनी आणि मिळकतीनी भरलेलं आहे हे तिला दाखवायचं होतं.
संध्याकाळी रचना लक्ष्मी मामींच्या घरी गेली. रचनाच्या आगमनामुळे लक्ष्मी मामी थक्क झाल्या. त्यांनी आनंदाने रचनाचं स्वागत केलं.
लक्ष्मी मामी: “ये ये रचना. काय अहोभाग्य माझं की तू घरी आलीस.”
रचना आत येउन बसली.
लक्ष्मी मामी: “त्या दिवशीचं माझ बोलणं मनावर घेतलंस वाटतं. गप्पा मारायला आलीस. असंच मिळून मिसळून राहायचं ग. एकट एकट राहून डोकं भिरभिरतं.”
रचना: “मनावर तर घेतलंय मी. तुम्हाला हे दाखवायला आले होते.”
म्हणून तिने मासिकात आलेली मुलाखत लक्ष्मी मामींना दाखवली.
लक्ष्मी मामी: “अरे वा वा! अभिनंदन! अशीच प्रगती करीत राहा.”
रचना: “प्रगती तर करीनंच मी. माझ्या कामावर माझं खूप प्रेम आहे. तुम्हाला हेच सांगायचय की माझं आयुष्य रितं नाही. तुमच्या या घरगुती आयुष्यापेक्षा खूप उच्च आहे. मी मासिकात मुलाखत येण्याएव्हढी मोठी आहे. उगाच फुकटचे सल्ले देत जाऊ नका. मी तर म्हणेन तुमचं आयुष्य परावलंबी व क्षुद्र आहे . तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल करायला हवा. रिकाम्या वेळात चाहाटऴ गप्पा मारण्यापेक्षा काहीतरी करायला हवं.”
लक्ष्मी मामींना थोडा धक्का बसला. त्या म्हणत होत्या तसं नव्हतं म्हणायचं मला. पण रचना काही ऐकून न घेता तरातरा निघून गेली.
लक्ष्मी मामींना थोडा राग आला. पण समजून घेऊन त्यांनी तिचा राग केला नाही.
लक्ष्मी मामी रचनाशी नेहमी प्रमाणे बोलत राहिल्या. रचनाला आश्चर्य वाटत होतं. रिकाम्या वेळेत त्या नेहमीप्रमाणे काहीतरी खायला बनवत आणि रचनाला सुद्धा देत. रचनाला यावर कशी प्रतिक्रिया द्यायची कळत नव्हतं. ती नेहमी प्रमाणे हो नाही करत असे व त्यांनी दिलेले पदार्थ घेत असे.
एक दिवस रचना ऑफिसला जायची तयारी करत असताना तिचं डोकं खूप दुखायला लागलं. तिला ऑफिसला सुट्टी मारायची नव्हती म्हणून ती तयारी करत राहिली. पण तिचं अंगही दुखायला लागलं. सुट्टी घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. ती बेडवर झोपून गेली. थोड्या वेळाने बेल वाजली. रचनाने कसाबसा दरवाजा उघडला.
लक्ष्मी मामी: “दरवाजाला कुलूप नाही बघून या जिलेब्या द्यायला आले होते. पण काय ग तुझा अवतार… बरं नाहीय का?”
रचना: “हो सगळं अंग दुखतंय.”
लक्ष्मी मामी: “मग कुणालातरी मदतीला बोलवायचं ना!”
रचना काही न बोलता बेडवर जाउन झोपली.
लक्ष्मी मामींनी फॅमिली डॉक्टर ना फोन केला.
डॉक्टर: “वायरल फिव्हर आहे. मी औषध देतो त्याने या संध्याकाळपर्यंत बऱ्या होतील. पण औषध अजून दोन दिवस घ्यावं लागेल.”
लक्ष्मी मामी स्वतःच्या घरची कामं सांभाळत रचनाकडे येउन जाउन राहिल्या. लक्ष्मी मामींनी तिची खूप काळजी घेतली.
रचनाला खूप बरं वाटलं. नात्यातलंच कुणी असल्यासारखं. तिने मामींचे मनापासून आभार मानले.
लक्ष्मी मामी: “रचना आपल्या सोसायटीच्या महिलांनी गेट टुगेदर करायचं ठरवलंय, या शनिवारी. गच्चीवर हा! मलाच पुढाकार घ्यायला लावलंय सगळ्यांनी. माझं तुला मनापासून आमंत्रण आहे. नक्की ये. बाकी मला काही थँक यू वगैरे नको तुझं.
रचना: “बघते मी.”
लक्ष्मी मामी: “बघू बिघू काही चालणार नाही. सुट्टी असते ना तुला… एकदा तरी ये, बाकी मग तुझ्यावर आहे.”
शनिवार उजाडला आणि सकाळी सकाळी रचनाला गेट टुगेदरची आठवण झाली. कितीही अनिच्छा असली तरी लक्ष्मी मामींच ऐकायचं असं उपकृत भावनेने तिने ठरवलेलं होतं.
ती वेळेवर गच्चीत गेली आणि सगळ्या बायका हजर होत्या. ती एका खुर्चीवर जाउन बसली. बाजूच्या बाईने तिच्याकडे आश्चर्याने बघितलं. रचनाच्याही लक्षात आलं की “ही बाई कशी काय आली” असे विचार तिच्या मनात होते. तितक्यात लक्ष्मी मामींच लक्ष रचनाकडे गेलं. त्या रचनाकडे आल्या.
लक्ष्मी मामी: “थँक्स आल्याबद्दल. पहिलं माझं भाषण मग तीन डान्स, मग कविता वाचन आणि शेवटी संगीत खुर्ची असा कार्यक्रम आहे. पूर्ण बघ.”
रचना: “ओके.”
रचनाला आश्चर्य वाटलं. कसलं भाषण करणार लक्ष्मी मामी! भाषण करायला कसलंतरी ज्ञान असावं लागतं. की फक्त खाद्य पदार्थांच्या रेसिपीच सांगणार आहेत भाषणातून! असा तुच्छतापूर्ण विचार तिच्या मनात आला. पण तिने विचार केला, बघुया तरी.
लक्ष्मी मामी भाषणाला उभ्या राहिल्या.
लक्ष्मी मामी: “नमस्कार भगिनींनो! आज बंधू बोलण्यापासून मस्त सूट मिळालीय आपल्याला. आपला हक्काचा दिवस ठरवलाय आपण. कार्यक्रमाचे स्वरूप सगळ्यांना माहीतच असेल. तीन नाच, कविता वाचन आणि संगीत खुर्ची. सगळं मस्त एन्जॉय करायचं हा सगळ्यांनी. बरेच लोक असा विचार करत असतील, हाउस वाईफ चं कसलं जगणं. नोकरी करण्यात खरं कौतूक. पण आपलं आयुष्य आपण निवडलंय. इतरांना काही म्हणूदे पण आपल्याला आपल्या हाउस वाईफ पणाच कौतूक आहे की नाही. सकाळी लवकर उठून नवऱ्या मुलांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो आपण. आपल्या भूमिकेत त्याग आहे. सगळ्यांची सगळ्या प्रकारे काळजी घेतो आपण. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे काटेकोर लक्ष असतं आपलं. आपल्या भूमिकेमध्ये सतर्कता आहे. नवरा देईल त्या पैशावर आपण घर चालवतो. आपल्या भूमिकेमध्ये निरपेक्षपणा आहे, मॅनेजमेंट आहे. पाहुणे घरी आले की सगळ्यांच आदरातिथ्य व्यवस्थित करतो. सेवाभावी वृत्ती आहे आपल्या भूमिकेत. एखादा पदार्थ चांगला झाला की पुन्हा पुन्हा त्याची चव चांगली व्हावी म्हणून प्रयत्नशील असतो आपण. आपल्या भूमिकेत स्कील आहे. बाई नाही आली की कामाचा सगळा रगाडा एकट्याने काढतो. आपल्या भूमिकेत हिम्मत आहे. असं विविध आव्हानांनी आणि गुणांनी भरलेलं आपलं आयुष्य आपण आनंदाने जगतो आणि सगळ्यांना सुखी ठेवतो.”
टाळ्यांचा कडकडाट झाला. रचनालाही भाषण खूप आवडलं. ज्या घरगुती स्वयंपाकीणीच्या भूमिकेकडे ती तुच्छतेने बघत होती तिला वेगळ्याच कोंदणात बसवलं लक्ष्मी मामींनी.
लक्ष्मी मामी: “पण नोकरी करण्याला मी कमी लेखत नाही. प्रत्तेक भूमिकेची स्वतःची वेगळी आव्हानं असतात. म्हणून आपल्या सोसायटीतल्या अशाच यशस्वी भगिनीचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. प्लिज वेलकम रचना सावंत.”
रचना ला धक्काच बसला. ती गडबडीत पुष्पगुच्छ घेऊन जागेवर येउन बसली. रचनाला थोडी अपराधी भावनाही आली होती आणि आनंदही होत होता. ती पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत थांबली. काव्य वाचनातली एक ओळ तिला खूप भावली.
‘आनंदासाठी आनंद जपावा
आनंदार्थे जीवन अर्पावे
आनंदच ध्येय
आनंदाने जीवन भरून पावावे.’
दुसऱ्या दिवशी रचना लक्ष्मी मामींच्या घरी गेली.
रचना: “आय ऍम रिअली सॉरी.”
लक्ष्मी मामी: “असू दे ग. होतं असं. पण मला फक्त म्हणायचं होतं आनंदात राहा. सगळ्यांशी मिळून मिसळून राहा. कुढत बसू नकोस. प्रत्तेकाच आयुष्य वेगळं असतं. नशिबाचे खेळही वेगवेगळे असतात. आपल्या निर्णयांचा आणि मिळालेल्या जीवनाचा आनंदाने विचार करावा. दुख्ख शाश्वत आहे. पण आपण निग्रहाने त्यातून आनंदाची निर्मिती करावी. शेवटी आयुष्य वेगवेगळ्या अनुभवाचं गाठोडं… त्यातच आपली श्रीमंती.”
रचनाला भरून आलं. तिने लक्ष्मी मामींना मिठी मारली.
बदललं तर काहीच नव्हतं. ना लक्ष्मी मामींच आयुष्य, ना रचनाचं. पण रचनाला एक नवा द्रुष्टिकोन मिळाला होता. यापुढे तिने हाऊस वाईफ च्या भूमिकेला कमी लेखलं नाही. आणि शेवटी द्रुष्टिकोनच तर महत्वाचा असतो!!!