मी बसलो होतो. हो प्यायलाच बसलो होतो. एकटाच… दर वेळेस कोण चिअर्स करणार? रात्रीचे ११:३० वाजले होते. आणि अचानक व्हॉटसऍप वर रिंग आली. व्हॉटसऍप तर वाजतंच असतं फक्त वातावरण निर्मिती व्हावी म्हणून हे अचानक वगैरे… घटनाच तशी होती. प्रसन्न नावाच्या माणसाने व्हॉट्सअँप वर ग्रुप बनवला होता. नाव ओळखीचं वाटलं. फोटो पाहून लक्षात आलं. अरे हा तर आपल्या शाळेतला… शाळेचा ग्रुप! बरं वाटलं. अनेक वर्षांनी मित्र भेटणार… पण हि ख़ुशी थोड्याच वेळ टिकली. ग्रुप मध्ये ती असेल तर? भराभर सगळी नाव तपासली…ती नव्हती त्यात… आणि जीव भांड्यात पडला.
ग्रुप वर निरनिराळ्या गप्पा सुरु झाल्या. आणि कुणीतरी तिचा विषय काढला. ती प्रीती कुठे आहे? सध्या काय करते? दुसरं कुणी म्हणालं डॉक्टर झालीय. प्रीती बेलांडे आता. दोन मुलं सुध्दा आहेत. क्षणभर हृदयात कळ आली. असं असेल हे ठाऊक असूनही… मी असाच बसून राहिलोय… हि नाही ती नको मग शेवटी कुणीच नाही… माझ्यावर प्रेम आहे म्हणून रडली होती मग ती असं कसं करते… कुणी तरी म्हटलं बिझी असते फार… पण दोन दिवसात व्हॉटसऍप वर येईल… दोन दिवसांत येईल… कुठेतरी हुरहूर वाटली. ती आता काय बोलेल माझ्याशी!!! त्याच दिवशी मस्त दाढी केली, केसांचा कट मारला… तारुण्य पुन्हा हाकारु लागल.
दोन दिवस वाट पाहून मन थकलं आणि ती ग्रुप वर आली. चौकशा गप्पा सुरु झाल्या… मीही हळूच एक हाय टाकला… पण तिने उत्तरच दिलं नाही… अरे अशी काय करते हि… नंतर मला काही तिच्याशी बोलावसं वाटेना. ती फारशी ग्रुप वरहि नसे. कधी एखादा फॉरवर्ड आलातर. नाहीतर तिची काही खबर बात मिळत नसे… तिचे मेसेज येतील म्हणून मी उगाचच आपला सारखं व्हॉट्सअँप उघडून बघू लागलो. एका कलीग ने विचारलं पण “फोन नवीन घेतला वाटतं…” मी बावचळून म्हटलं “नाहीतर” “सारखा फोन वर लागलायस… म्हणून म्हटलं” मी तुच्छतेने त्याच्याकडे पाहिलं. प्रकरण नवीन नाही जुनंच आहे राव… मी उगाचच तीच पर्सनल चॅट उघडायचो आणि नवऱ्या बरोबरचे पोज मधले फोटो बघून बंद करून टाकायचो… तिला साधी माझी विचारपूस हि करावीशी वाटली नाही?
शेवटी भीड चेपून मी तिला फेसबुक वर ऍड केलं. नोटिफिकेशन आले कि लगबगीने बघायचो. पण भलतंच अलाना फलाना काही… बरेच दिवस गेले आणि माझी उदासीनता वाढू लागली… जेवणातही मन लागेना आईने काय विचारावं “डायटिंग करतोयस काय ढम्या… कर कर… बारीक तरी होशील…” आता हिचं काय करू???
एक दिवस बसलो होतो. हो प्यायलाच… आणि विचार आला, तिच्या मनात अढी आहे. म्हणजे ती अजून आपल्याला विसरली नाही. कदाचित तीचं अजून आपल्यावर प्रेम असेल. रुसव्या फुगव्याचं दुसरं नाव प्रेम… मला आधी कसं हे सुचल नाही… आणि मी खुश होऊन गेलो… तितक्यात फेसबुक वर नोटिफिकेशन आलं… तिने मला ऍड केलं होत… आणि मेसेंजर वर पिंग आलं
” हाय ढम्या!”
मनात आलं ढम्या नको म्हणू ग…
मी म्हटलं “कशी आहेस?”
ती: “मस्त!!! घर आणि प्रॅक्टिस दोन्ही उत्तम चाललंय.”
हे घ्या हीचं उत्तम चाललंय… मी मुद्दाम विषय काढायचा म्हणून म्हटलं. “मला वाटलं अजून रागावलीयस. माझ्या हाय ला उत्तर दिलं नाहीस, फेसबुक वर ऍड करत नाहीस…”
ती: “केलं कि फेसबुक वर ऍड. अरे फार बिझी असते… आणि तू कधी हाय केलंस? अरे कामा कामात मिस झालं असेल… अरे राग कसला दोन मुलांची आई झाल्यावर. तुला काय वाटेल म्हणून फक्त तुला पिंग केलं नाही. लहानपणीचे पोरखेळ कोण लक्षात ठेवतो? ” मी हादरून गेलो… माझ्यावर प्रेम पोरखेळ??? असं वाटलं उगाच हिच्याशी बोललो… उद्वेगाने फोनच स्विच ऑफ करून टाकला… आणि शेवटचा ठरवलेला पण नव्याने पहिला बनलेला पेग रिचवत मी विचार करत राहिलो “ती सध्या अशी काय करते ???”