Marathi Short Stories

जादुई मनःशांति

बसमध्ये सगळ्यांचा गोंधळ चालू होता. रोहित तर खूप खुश होता. तो परीक्षेत वर्गातून पहिला आला होता. त्याच्या चेहऱ्यावर पुरेपूर समाधान आणि प्रसन्नता झळकत होती… आणि इकडे निशांत खूप उदास होता. एव्हढे प्रयत्न करून तो दुसरा आला होता. त्याची अपेक्षा होती यावेळी तरी तो पहिला येईल. तरी कितीपण अभ्यास केला तरी रोहित पहिला आणि निशांत दुसराच येई.

बस निशांतच्या स्टॉप वर थांबली. निशांत बसमधून उतरला. निशांतच्या आईला लगेच समजलं काहीतरी गडबड आहे.
आई: “बाळा काय झालं?”
निशांत: “एव्हढा अभ्यास करून पण मी दुसरा आलो.”
आणि निशांत रडायलाच लागला. आईला हसू की रडू कळेना.
आई: “अरे दुसरा आलास ना मग छान आहे की.”
निशांत: “मी नेहमीच दुसरा येतो.”
आई: “अरे मग छान आहे ना. दुसरा नंबर सोडला नाहीयेस तू…”
निशांत थोडा वेळ रडतच राहिला आणि आई समजावत राहिली.
आई: “चल आईसक्रीम खाऊया.”
निशांतने नुसतीच मान हलवली…
आईस्क्रीम खात असतानाही निशांत काही खुश दिसत नव्हता. आईला सहन होत नव्हतं. आपलं बाळ दुसरं येऊनही इतकं दुःखी असावं…
आई: “चल गार्डन मध्ये जाऊ…”
निशांत: “नको ग… माझा मूड नाही.”
आई: “नुसतंच गप्पा मारत बसूया. मस्त हवा येत असेल. सगळे मस्त खेळत असतील किंवा मोकळं बसलेले असतील… थोडं बरं वाटेल तुला.”
निशांत ने नुसतीच मान हलवली.

दोघे गार्डन मध्ये आले. निशांत आईच्या बाजूला शांत बसून होता. तितक्यात त्याचं लक्ष एका शांत झोपलेल्या कुत्र्याकडे गेलं… कुत्रा आरामात झोपला होता. कशाची पडली नव्हती त्याला. निशांतने आईला विचारलं
“आई कुत्रे बोअर नाही का ग होत? दिवसभर खाण्या आणि झोपण्याशिवाय काहीच करत नाहीत…”
आई हसली.
आई: “दुसरा नंबर येऊनही तू आनंदी नाहीस मग कुत्र्याने का बरं बोअर व्हावं?”
निशांत: “म्हणजे ग आई?”
आई: “हे बघ तुला कळत नाहीय ना की तुझ्या दुसरं येण्याचा कुत्र्याच्या बोअरडम शी काय संबंध…
मी सांगते ते आता नीट समजून घे. माणूस हा प्रगत प्राणी आहे. पण प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतात ना… माणूस बुद्धीचा वापर करत राहतो आणि विचार करतो, मोजमाप करतो, तुलना करतो… भला उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे?”
निशांत हसला.
आई: “कुत्र्याचं तसं नसतं रे… त्यांना फक्त कळतं पोट भरायचं. आणि पोट भरलं की ते खुश असतात. जादुई शांतीचं गमक असतं त्यांच्याकडे. ते नाही विचार करत, आज पण धावताना टॉमी पहिला आणि मी दुसरा आलो. आनंदाचं रहस्य असतं त्यांच्याकडे. जर वाघाने जीराफाची शिकार करताना जीराफाने वाघाला जोरात लाथ मारली तर वाघ लक्षात ठेवत नाही काही, की या जीराफाने मला लाथ मारली आणि मी ते कायम लक्षात ठेवणार. त्यांच्याकडे आपल्या एव्हढी मेमरीच नसते. म्हणून ते एव्हढ्या बळी तो कान पिळी या वातावरणातही आनंदात समाधानाने जगतात. आनंद, समाधान, शांती हेच तर आपल्याला हवंय. मग उगाच जास्त विचार कशाला करायचा. कुत्र्याला हेही कळत नाही.”
आईने निशांतचा हात हातात घेतला आणि ती काकुळतीने बोलली.
“पण आपल्याकडे बुद्धी आहे… आपल्याला तर हे कळायला हवं ना निशांत”
निशांत च्या काळजीने आईच्या डोळ्यात हलकेच पाणी आलं.
निशांत ला कळलं…
“सॉरी आई.”
आई: “इतकं सोपं नाहीय बरं का… पण प्रयत्न करत राहणं आनंदी समाधानाने राहायचं हे आपलं काम आहे.”
आणि आईने निशांतला जवळ घेतलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *