‘आज ट्रेन ची गर्दी जास्तच त्रासदायक आहे. कधी एकदा घरी जाऊन बिछान्यात कोसळते असं झालं आहे. शक्तीच नाहीशी झाली आहे.
धादांत खोटा आरोप आहे माझ्यावर! मी फाईलची महत्वाची पानं फाडून पुरावे नष्ट केलेच नाहीत, तरीही मला मेमो मिळाला आहे. काय करावं कळत नाही. तिथेच नोकरी सोडून द्यावी असा विचार आला. पण आजकालच्या महागाईत शक्य आहे का ते? आणि चांगली सरकारी नोकरी… ‘
विचार करताना गाडीत ढकलले गेले. धक्केच धक्के… कोलाहल! गुंतागुंत! टोकदार आवाजांनी आणि अस्पष्ट चित्रांनी मन भरून गेलं. डोळ्यात पाणी तरळलं…
“ओ बाई जरा आत सरका!”
कोणतीतरी बाई मलाच म्हणत होती बहुतेक. मी गुपचूप आत सरकण्याचा निष्फळ प्रयत्न केला. ती बाई मला नको तसे धक्के मारून आत शिरली…
‘इमाने इतबारे काम केलं च्योवीस वर्ष… जरा सुध्दा वेळ वाया घालवला नाही कधी… बाई वेळेत बिलं तयार करतात, अशी माझी ख्याती. कुणाचं काम आधी करून देण्यासाठी लाच घेतली नाही कधी. त्याची ही फळं… शक्यच वाटत नाहीय! ‘
लोंढ्याच्या लाटेबरोबर स्टेशनवर उतरले… अस्ताव्यस्त विस्कटलेल्या रस्त्यांमधून आपला रस्ता काढत घरी चालले. कधी नाही ते आज ऑटो ने जावं म्हटलं तर ऑटोला भली मोठी रांग… घरी जायचीही ओढ… डोळ्यांतून अश्रूंची धार वाहू लागली… कशीबशी गर्दी पासून अश्रू लपवत गुपचूप रांगेत उभी राहिले.
‘सगळं अंतर्गत राजकारण… दोन गटांमधला वाद… आपण कुणाच्या अध्यात ना मध्यात आणि आपलंच मरण… सख्ख्या मैत्रिणीने आळ घेतला. पदाने मोठी असली म्हणून काय झालं? तिला माहीत आहे मी असं काही कधीच करणार नाही… स्वतःच्या अहंकाराला गोंजारण्यासाठी या थराला पोचली… ‘
एकदाची ऑटो मिळाली आणि मी घरी पोचले. ऑटोवाल्याला शंभर ची नोट दिली.
“छुट्टा नही है मॅडम…”
“माझ्याकडेही नाहीत सुट्टे…”
ऑटोवाल्याने अक्राळ विक्राळ बडबड केली. तिखट आंबट चेहरे केले. कुठेतरी सुट्टे आणायला गेला. मिळाले एकदाचे सुट्टे.
पायऱ्या चढून वर आले आणि चावीने दार उघडलं. बघते तर हे आज घरी. हे इतक्या लवकर कसे काय आले? यांना पाहून ओकसाबोक्षी रडायलाच लागले…
“काय झालं अगं! ये बस.”
सगळी हकीकत भडाभडा बोलून मोकळी झाले. यांनी मला जवळ घेतलं आणि डोक्यावरून मायेने हात फिरवू लागले. सगळा शिण त्रास नष्ट होत गेला. आज असंच का, तसंच का नाही… तुझं हे चुकलं, ते चुकलं नाही… हे कर अन ते कर नाही… डोक्यावरून फक्त मायेचा हात… आणि वाटलं अनेक वर्ष झाली… कुठे होता असा हात? आईने फिरवला होता प्रेमाने, काळजीने… आपण आई झालो आणि तो हातच हरवून गेला… जबाबदाऱ्या, कामं आणि पुन्हा जबाबदाऱ्या… आपण सगळं नेटाने करायचं. पिलांच्या डोक्यावरून मायेने फिरणारा हात बनायचं… आणि इतक्या ओढाताणीत आपला हात मात्र हरवलेला… आयुष्य दिनाक्रमाच्या यंत्रात चिपाड बनून निघतं… रात्री थकून सुस्तावल्यावर डोक्यावर पांघरूण म्हणून हात मात्रं नाही. काहीतरी हरवलेलं मिळालं असं वाटलं. आणि वाटलं अशा मायेच्या हातासाठीच मन उपाशी असतं. त्या दरीत लोटलेल्या क्षणी, मदतीच्या ज्या हाताची गरज होती तो हात मिळाला… आता जे होईल ते होवो, पुढचं आयुष्य नेटाने बांधण्यासाठी मी पदर खोचून खंबीर झाले !