स्नेहा ने काठी घेतली, पर्स घेतली, चपला घातल्या व ती निघाली. तिचा एक पाय तोकडा आणि वाकडा असल्याने तिला काठी घ्यावी लागायची. वडील तर वारलेच होते, या वर्षी आईही वारली. आता ती पूर्ण एकटी होती. ती अजूनच घुमी झाली होती. ऑफिसच्या लोकांशी बोलणं कामापूरतच होई. थोडे शांत एकटे क्षण मिळाले की तिच्या डोळ्यात अश्रू येत व ती देवाला रागाने दूषणं देई. ‘का असं लंगडीचं आयुष्य दिलं आहेस मला.’ तशी आधी ती फार बोलकी होती अशातला भाग नाही. तुसड्या स्वभावासाठी ती प्रसिद्ध होती. तिला पटकन राग येई. पण आई गेल्यानंतर ती आणखीन कडवट झाली होती. तिने समजून घेतलं होतं आपल्याला आपल्या कमतरतेमुळे एकटंच जगायचंय आणि हा एकटेपणाच तिला भेडसावत होता.
स्नेहा ऑफिस ला पोचली तेव्हा कोपऱ्यातल्या डेस्क वर खूप कल्ला चालू होता. कुणीतरी नवीन व्यक्ती आला होता. तो फार विनोद करत होता आणि सगळे जण हसत होते. स्नेहा डेस्क वर बसली आणि कामाला लागली. पण आवाजामुळे तिचं लक्ष लागेना. स्नेहा बसल्या जागेवरूनच ओरडली… “अरे काय गोंधळ आहे… कामं नाहीत का तुम्हाला?” सगळे वैतागले… ‘बोलली खडूस’
पण सगळे आपापल्या जागेवर निघून गेले. तो नवीन व्यक्ती स्नेहाच्या टेबला जवळ आला… स्नेहाच्या टेबलवर हात टेकून उभा राहिला… स्नेहाला त्याचा आगाऊपणा जराही आवडला नाही.
“हाय मी रितेश. देशमुख नाही हा…” आणि तो स्वतःच हसायला लागला. स्नेहाने कम्प्युटरमध्ये डोकं खुपसल…
“थोडे तरी मॅनर्स दाखवा… मी तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्ही सरळ दुर्लक्ष करताय” स्नेहा वैतागली
“ऑफिस मध्ये गोंधळ घालणाऱ्या लोकांनी मला मॅनर्स शिकवू नये… आणि ऑफिसला मी काम करायला येते, गप्पा मारायला नाही…”
रितेश: “तुमचं लॉजिक छान आहे. पटलय मला…” आणि त्याने हात मिळवण्यासाठी पुढे केला. स्नेहा ने त्याच्याकडे ढुंकून पण बघितलं नाही.
रितेश: “एव्हढं स्वतःला कोंडून कशासाठी ठेवलंय तुम्ही?”
स्नेहा त्याच्याकडे बघत बसली… तिचं दुःख उफाळून आलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले… तिने त्यांना मागे सारलं…
आणि पुन्हा आपल्या कामाला लागली… रितेश थोडा वेळ तिच्याकडे बघत राहिला आणि निघून गेला…
दुसऱ्या दिवशी स्नेहा ऑफिसमध्ये काम करत होती… रितेश तिच्या जवळ आला… तिने दुर्लक्ष केलं…
रितेश: “शरीराची काठी मनाला कशाला वापरताय तुम्ही?”
स्नेहा ओरडली.
“तुम्ही कोण आहात माझ्या आयुष्याबद्दल बोलणारे…”
रितेश: “तुमचा मित्र समजा”
स्नेहा: “मला कुठल्याही मित्राची गरज नाही.”
रितेश: “मेल्यावर पण खांदा द्यायला आपली माणसं लागतात. तुम्ही तर जिवंत आहात.”
स्नेहा पुन्हा त्याच्याकडे बघत बसली आणि मग कम्प्युटर मध्ये डोकं घातलं….
संध्याकाळचे चार वाजलेले होते… सगळे चहा प्यायला गेलेले होते… रितेश स्नेहाकडे आला.
रितेश: “मला तुमच्याबरोबर चहा घ्यायला आवडेल.”
स्नेहाने त्याच्याकडे बघितलं… आणि यावेळेला उठली… रितेशच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं… दोघे कँटीन मध्ये गेले आणि चहा घेतला…
रितेश: “कुठे राहता तुम्ही?”
स्नेहा: “डोंबिवली”
रितेश: “मी मुलुंड मध्ये राहतो.”
स्नेहा: “ओके. तुम्ही का सारखे माझ्याशी बोलायला येत आहात?”
रितेश: “मी मनमोकळा मनाला येईल तसं वागतो… एव्हढा विचार नाही केला, का, कशासाठी कसं… मी तर म्हणेन तुम्ही पण जास्त विचार करू नका… गो वुइथ द फ्लो!”
स्नेहा: “आयुष्य एव्हढं सोपं असतं तर…”
रितेश: “तुम्ही आजपर्यंत खूप विचार केले असतील… काय बदललं त्याने?”
स्नेहाला पटलं. पण ती गप्प राहिली…
स्नेहा: “संपला माझा चहा. बाय”
आणि टेबलकडे गेली.
सगळे कामात होते… रितेश एकटक स्नेहाकडे बघत होता… स्नेहाला ते जाणवलं. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं… पण रितेश तिच्याकडे बघत राहिला… मग ती वैतागली… ती काठी घेऊन उठली आणि रितेश च्या टेबलकडे गेली…
“तुम्हाला काम नाहीय का? का बघताय माझ्याकडे?”
रितेश: “मी पण हेच शोधायचा प्रयत्न करतोय. की मी तुमच्याकडे का बघतोय…”
स्नेहाने डोक्याला हाथ लावला… आणि जायला वळली… रितेशने तिचा हाथ पकडला…
स्नेहा भांबावून वळली… पुरुषाचा पहिला स्पर्श… तिच्या शरीरातून एक लहर गेली… तिला कसं वागायचं कळत नव्हतं… ती हतबल होऊन बघत राहिली… रितेशने तिचा हाथ सोडला… ती टेबलवर गेली… पण आता ती तिची नव्हती…
स्नेहा ला रात्री झोपच येत नव्हती… तिला सारखा रितेश दिसत होता. ती त्रासून रडायला लागली… पण तिला उपाय हवा होता… तिने ठरवलं… रितेशला बोलायचं… ही अशी लगट मला खपणार नाही…
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आल्या आल्या स्नेहा रितेश कडे गेली.
“मला तुमच्याशी बोलायचंय.”
रितेश आणि ती कँटीन मध्ये गेले…
स्नेहा: “तुम्ही लांब राहा माझ्यापासून.”
रितेश: “का?”
स्नेहा: “मला नाही आवडत.”
रितेश: “नाही आवडत की खूप आवडतंय म्हणून टाळायचंय मला?”
स्नेहा हाताची घडी घालून गप्प राहिली… तिला कसं वागायचं कळत नव्हतं…
रितेश: “का स्वतःला त्रास देताय तुम्ही?”
स्नेहा: “एका लंगड्या मुलीचं मन कोणालाच कळू शकत नाही.”
रितेश: “तुमचा त्रास हा तुमच्या शरीरामुळे नाहीय… तुम्ही कोंडून घुसमटून ठेवलेल्या मनामुळे आहे… का इतके कठोर नियम मनाला घातलेत ज्यामुळे तुम्ही मनमोकळ्या हसत पण नाही… तुम्हाला असंच राहायचं की बदलायचंय ते सांगा…”
स्नेहा: “का सांगू मी तुम्हाला?”
रितेश: “कारण मला तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे…”
स्नेहा रितेश कडे बघत राहिली… तिला जोरात हुंदका फुटला… आणि ती रडायलाच लागली
रितेशने तिला जवळ घेतलं… तिच्या डोक्यावरून हाथ फिरवायला लागला.
रितेश: “बस पुरे… आजचे शेवटचे अश्रू… यापुढे हसायचं… खुश राहायचं… म्हणजे तुम्ही मला अजून हो म्हटलेलं नाहीय… पण मी तुमचं हो गृहीत धरतो…”
स्नेहाला हसायला आलं… तिने डोळे पुसले… हातातली काठी सोडून दिली… आणि मनमोकळं रितेश ला मिठी मारली….