आनंदाने आरशात रुपडं न्याहाळलं आणि तिरपा भांग पाडून तो स्वतःकडे पाहातच राहिला. तो स्वतःच्या दिसण्यावरही खुश होता आणि असण्यावरही… दिनक्रम जगणं म्हणजे त्याच्यासाठी काहीच कसरत नव्हती. मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या तो सहजा सहजी पेलायचा आणि आयुष्यात पुढे पुढे जात राहायचा. आपल्या देखण्या अस्तित्वावर अत्तराचा फवारा मारून ते आणखी गडद करून तो घराबाहेर पडला. शीळ मारत, गाणं म्हणत हवेवर तरंगत तो बागेच्या दिशेने चालत राहिला. आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या नेटाने सांभाळून फावल्या वेळात तो आपले छंदही जोपासायचा. बागेत आठवड्यागणिक एक फेरफटका तर व्हायचाच. बाग हे आपलं अस्तित्व अनुभवायला अगदी योग्य जागा वाटायची त्याला.
चालताना अचानक वाटेत त्याला दुखी व भित्या दिसले. त्याने तर रस्ताच बदलला. लांबून फिरून गेलो तरी चालेल पण त्याला न आवडणारी दुखी व भित्या ची जोडगोळी दूरच ठेवणे योग्य असे त्याला वाटले. दुखीचा चेहरा सतत पडलेला, मलूल… काही ना काही संकटं त्याच्या आयुष्यात रांग लावूनच असायची. हा जगतो तरी का असा प्रश्न आनंदाला पडायचा. भित्याचही तसंच… सतत चेहऱ्यावर बारा वाजलेले. कशा न कशाची चिंता आणि त्यातून वाटणारी भीती त्याची पाठ सोडत नसे. आनंदाला दोघांचा अतिशय तिटकारा होता आणि या दोघांपासून तो चार हात लांबच राही.
पण तितक्यात आनंदाला नियती येताना दिसली. नियती अतिशय हुशार, चपळ, दिसायला सर्वसाधारण असली तरी तिच्या बुद्धीमत्तेमुळे आनंदा तिच्याबरोबर चांगली दोस्ती ठेवून होता. नियतीला टाळणं आनंदाला शक्य नव्हतं आणि तसं करण्यास तो इच्छूकही नव्हता. नियातीशी गप्पा मारताना दुखी आणि भित्याने आनंदाला पाहिलं आणि ते त्याच्यापर्यंत येऊन पोचले. आनंदा त्यांना टाळायचा हे त्यांच्या गावीही नव्हतं. कारण आनंदा कल्पक तर होताच पण कुणाला दुखविण्याचाही त्याचा मानस नव्हता.
नियती गप्पा मारून दुखी व भित्याशीही हस्तांदोलन करून निघून गेली. दुखी आनंदाला म्हणाला “मी आणि भित्या टेकडीवर चाललोय. थोडी चर्चा करू म्हणत होतो. जीवन जरा पेचात आहे त्याला कशी मदत करावी विचार करतोय.” जीवन हा दुखी आणि भित्याचा तिसरा मित्र. पायाने अपंग असला तरी अनंदालाही जीवन फार आवडत असे. तर्कशुद्धध आणि लाघवी पण असलेला जीवन आनंदाला पटायचा. जीवन त्रासात आहे हे कळल्यावर आनंदा सगळं विसरून भित्या व दुखी बरोबर टेकडीवर निघाला.
संध्याकाळ झाली… सूर्य मावळायला लागला… दुखीचं मन भरून आलं. जीवन थोडासा आर्थिक अडचणीत होता. दुखीकडेहि जीवनला मदत करायला पैसे होते कुठे. अपंग आणि आर्थिक अडचणीत असलेल्या जीवनला आनंदाच काही मदत करू शकेल असं वाटून दुखीने आनंदाकडे जीवन चा विषय काढला. भित्या मात्र पुढे काय होईल या भीतीने गांगरला होता. त्याच्याकडेही पैसे नव्हते. कुणास ठाऊक काय झालं …आनंदा टेकडी उतरताना जोरात ठेचकाळला… त्याचा तोल गेला आणि तो गडगडत खाली गेला. एका खडकाला तो अडकला पण तो खड्कही आपली जागा सोडायला लागला. दुखी आणि भित्या प्रसंगावधान राखून धावत खाली गेले. आणि तो दगड निखळायच्या आधी आणि आनंदा खोल दरीत पडायचा आधी त्या दोघांनी आनंदाला पकडले. कसेबसे धरून त्यांनी आनंदाला मुख्य रस्त्यावर आणले. जोरजोरात हात हलवून ते येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबवू लागले. दुखीला तर रडूच फुटत होत. भित्याही जाम घाबरला होता. आनंदाच्या डोक्यातून आणि पायांतूनही रक्त वाहत होत. पण नशीब त्याचं म्हणून आपला विसरलेला मोबाईल वाचनालयातून पुन्हा आणायला नियती दुचाकीवरून जात होती. रक्तबंबाळ आनंदाला नियतीच्या पाठी बसवून दुखी स्वतः त्याचा मागे आधाराला बसला. त्यांनी रुग्णालयाचा रस्ता धरला. भित्याची काही मागाहून जायची हिम्मत झाली नाही. तो घरी गेला आणि आनंदाच्या सागळ्या नातेवाईकांना फोन करून आनंदाची माहिती त्यांना सांगितली….
बरेच दिवस झाले. आनंदा सावरला होता. पण झालेल्या अपघातात त्याच्या मणक्यातली नस निकामी झाली आणि तो पायाने अधू झाला. दुखी आणि भित्या मन लावून त्याची सेवा करत होते, त्याला सोबत देत होते. नियातीहि होतीच मदतीला.
आनंदा प्रसंगापुढे हार मारणाऱ्यातला नव्हता. त्याला जाणवलं की ज्या दुखी आणि भित्याला आपण टाळत आलो तेच आपली मदत करत आहेत. त्यांनी आपल्याला वेळेत सावरलं नसतं तर उंच कड्यावरून पडून संपलो असतो आपण. आनंदाला त्याची चूक उमगली होती. दुखी आणि भित्या आपले मित्रच आहेत हे त्याला कळून चुकलं. जीवन सारखे असंख्य अपंग आर्थिक विवंचनेत असतात. त्यांचं दुःख दुखी व भित्या नसते तर आपल्याला कधीच कळलं नसतं. आणि दुखी व भित्याने आपल्याला सावरले नसते तर आपणही आयुष्यातील अडचणींवर मात करू शकलो नसतो.
इस्पितळातून सुटल्यावर आनंदाने अपंग लोकांसाठी एक संस्था उभारली. आज आनंदी, दुखी आणि भित्या जीवनला सोबत घेऊन अपंगांसाठी जागतिक स्तरावर कार्य करतात. अपंगांच्या अडचणी जगापुढे मांडतात. त्यांच्यासाठी मदत उभी करतात. आणि वेगवेगळे कार्यक्रमही आयोजित करतात. आनंदा, दुखी व भित्या जीवनचे जसे मित्र आहेत तसे आपलेही मित्र आहेत हे आपण कधीच विसरता कामा नये. त्यांच आपल्या घरी येणं जाणं चालूच राहील. तुम्ही कुणाचाच तिरस्कार करू नका. जीवन सफल झाला तो आनंदाच्या या सोबत्यांमुळेच. तुम्हीही आनंदा, दुखी व भित्याला योग्य दृष्टिकोनातून पहा… तुमचंही आयुष्य नियतीच्या चाकोरी मधून निघून सफल होईल….