सीता फार वैतागली होती… हा ही व्हॅलेंटाईन फुकट जाणार… तिच्या मनात आलं ‘सौरभ ने थोडं उशिरा ब्रेक अप केलं असतं तर काय झालं असतं… माझा पहिला व्हॅलेंटाईन तरी साजरा केला असता… एक तर कुणी नसतं आणि कुणी मिळालंच तर फेब्रुवारी च्या आधी ब्रेक अप होतं… मला व्हॅलेंटाईन साजरा करायचा आहे यार….’
फ्रस्ट्रेशन मध्ये ती मोबाईल चाळू लागली… ‘यु ट्यूब, इंस्टा, एफ बी काय बघू हे विचार टाळायला… नवीन आहे का काही या जगात की तेच रटाळ आयुष्य… शी…’ ती नावीन्याच्या शोधात गुगल प्ले वर गेली… आणि तिची नजर एका ऍप वर थांबली…टिंडर… ‘करू का परत टिंडर इनस्टॉल… सगळी हपापलेली लोकं असतात तिकडे… टिंडर इज नॉट फॉर जेनुईन लव्ह… पण हा भयंकर एकटेपणा घालवायचा कसा… कॉलेज मधून सुट्टी टाकून घरी जाऊ का… आईला घट्ट मिठी मारेन मग बरं वाटेल…’ आईच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी आलं… तिने डोळे पुसले, एक क्षण वर फिरणाऱ्या पंख्याकडे पाहिलं आणि तिला वाटलं ‘लाईफ ह्याज टू मूव्ह ऑन…’ तिने टिंडर इनस्टॉल केलं…
स्वाईप लेफ्ट स्वाईप राईट चा खेळ सुरू झाला… आणि मॅच… ‘सुधीर… नाव खास नाहीय… पण दिसतो चिकना… करू का याला मेसेज?’ आणि तितक्यात तिला मेसेज आला… “हाय डिअर…मी सुधीर… तू मराठीच आहेस ना… आडणावावरून वाटलं… मी पण मराठी आहे…”
सीता: “मी इकडे सेक्स चॅट साठी आले नाहीय हा!”
सुधीर: “हे तुझं वाक्य ऐकून मी चॅट पडलोय lol”
सीता: “मस्करी नकोय मी खरच बोलतेय…”
सुधीर: “मग रिया कोणत्या उदात्त हेतूने तू टिंडर वर आगमन केलंयस???”
सीता: “माझ नाव सीता आहे”
सुधीर: “लोल मग रामाच्या शोधात आली आहेस का तू? रिया नाव का ठेवलंस?”
सीता: “मला आवडत नाही सीता हे नाव”
सुधीर: “ओके ओके मग मी तुला रिया म्हणू की सीता?”
सीता: “जाऊदे आता सीताच नाव आहे तर सीताच बोल”
सुधीर: “असं कोण नाव ठेवतं यार लोल”
सीता: “एए… माझ्या आईने ठेवलंय. काही बोलायचं नाही…”
सुधीर: “बरं बरं… पण आली आहेस का तू इथे…”
सीता: “माझं मागच्या आठवड्यात ब्रेक अप झालंय… एकटं वाटतंय…”
सुधीर: “अरे माझी दहावी जी एफ मला कालच सोडून गेली… त्यात काय मोठंस…”
सीता : “दहावी ”
सुधीर: “सिगरेट सोड म्हणून मागे लागली होती… शेवटी तीच गेली सोडून…”
सीता: “ओह सॉरी.”
सुधीर: “सॉरी काय त्यात… लाईफ है चलता है…”
सीता: “मग तुला अजिबात वाईट नाही वाटत?”
सुधीर: “हो वाटतंय… मी व्हॅलेंटाईनसाठी तिला घेतलेलं गिफ्ट फुकट जाणार म्हणून लोल”
सीता: “व्हॅलेंटाईनच नाव काढू नकोस”
सुधीर: “का ग?”
सीता: “मी आजपर्यंत एक पण व्हॅलेंटाईन साजरा केला नाहीय ”
सुधीर: “काय बोलते माझे पाच सात तरी झाले असतील!”
सीता: “कमाल आहे तुझी. गिनीस बुक मध्ये नाव टाकायचंय की काय!!!”
सुधीर: “लोल तू विनोद पण करतेस…”
सीता: “हो कधी कधी”
सुधीर: “म्हणजे मूड चांगला असला की… मान्य कर माझ्यामुळे तुझा मूड चांगला झालाय.”
सीता: “हो केलं मान्य. चल मग बाय”
सुधीर: “बाय काय! आत्ताच तर ओळख झाली आपली.”
सीता: “झाली ना ओळख मग आता काय उरलं? तुझ्या सारख्या असंख्य गर्ल फ्रेंड्स बनवणाऱ्या माणसात मला पुढे काही इंटरेस्ट नाहीय.”
सुधीर: “तू मला जज करते आहेस . मी शपथ घेऊन सांगतो. एकीलाही मी सोडलं नाहीय. त्या गेल्या मग मी काय करणार!”
सीता: “सॉरी जज नव्हतं करायचं मला… रिअली सॉरी”
सुधीर: “तू चांगली मुलगी आहेस. आपण दोघेही बोअर होण्यापेक्षा व्हॅलेंटाईन डे साजरा करूया का?”
सीता: “ओ एम जी! आपण असं का करायचं?”
सुधीर: “मित्र पण व्हॅलेंटाईन असू शकतो”
सीता: “म्हणजे तू स्वतःच ठरवून माझा मित्र पण झालास ”
सुधीर: “बस काय… मी तुझा मूड चांगला केला ना… ज्याच्याबरोबर आपला मूड छान होतो तोच तर मित्र असतो.”
सीता: “बरं बरं पण आपण करायचं काय”
सुधीर: “सगळंच आधी कशाला ठरवायचं… रुईया च्या कट्ट्यावर भेट… मला तिथे भेटलेले मित्र छान टिकतात…”
सीता: “ओके… माझं कॉलेज सुटल्यावर मी येईन…”
सुधीर: “अगं बंक मार, व्हॅलेंटाईन डे आहे… एकटी तूच असशील वर्गात…”
सीता: “हे हे हे”
सुधीर: “मग रुईया च्या कट्ट्यावर रुईया कॉलेज समोर दहा वाजता भेटू.”
सीता : “बरं ”
सीता दहाच्या आधीच ठरलेल्या जागी पोचली. इकडे तिकडे बघत ती कॉलेज समोरच्या भागाकडे गेली… लाल टी शर्ट घालून एक मुलगा बाजूला मोठ्ठ गिफ्ट आणि हातात लाल गुलाब आणि फुगे घेऊन बसला होता… तिने हाक मारली,
“सुधीर”
आणि त्या मुलाने वळून पाहिलं सुधीरच होता तो…
सीता: “एव्हढं मोठं काय आणलं?”
सुधीर: “तुझंच गिफ्ट आहे खोलून बघ… आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे!”
असं बोलत त्याने तिला लाल गुलाब आणि फुगे दिले … सीताला खूप आनंद झाला… तिने घाई घाईत ते गिफ्ट खोललं आणि आतून भला मोठा गुलाबी टेड्डी बेअर निघाला.
सीता: “ओह व्वा मस्त आहे. तुला माहीत आहे मला लहानपणापासून असा मोठ्ठा टेडी असावा असं वाटायचं, पण बाबांकडे कधी मागितला नाही आणि कुणी मला दिला नाही… थँक यू सो मच… पण आता करायचं काय…”
सुधीर: “तुला काय आवडतं?”
सीता: “मला पोट भरून गप्पा मारायला आवडतात आणि जेवणात चायनीज आवडतं.”
सुधीर: “मग बसूया की कट्ट्यावर… चायनीज पण जवळच आहे…”
थोड्या वेळ शांतता गेली… सीताचं पहिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट ती कुरवाळत होती. हातातले फुगे तीने टेडी च्या हाताला बांधले.
सुधीर: “तू सकाळपासून टिंडर वर दिसत नाहीयेस.”
सीता: “मी काढून टाकलं”
सुधीर: “का???”
सीता: “मी अशीच आले होते… कंटाळा आला म्हणून… मग आता काढून टाकल…”
सुधीर: “मग सांग ना तुझ्याबद्दल.”
सीता: “काय सांगू?”
सुधीर: “तुला जे पोटभर बोलावसं वाटतं ते”
सीता: “हे हे…मला ना माझी आई खूप आवडते… पण खूप देव भक्त आहे ती… आणि बाबा आर्मी मध्ये… ते देव बिलकुल मानत नाहीत.”
सुधीर: “मग त्यांचं कसं जमलं?”
सीता: “अरेंज होतं रे… पण दोघांचं खूप छान जमतं… दोघे एकमेकांना स्वातंत्र्य देतात.”
सुधीर: “लकी आहेस मग… माझ्या आई बाबांचा डिव्होर्स झालाय.”
सीता: “ओह सॉरी!”
सुधीर: “तू कशाला ग सारखी सारखी सॉरी…. हे घे.”
सुधीरने खिशातून चॉकलेट काढून दिलं.
सुधीर: “चॉकलेट खा आणि मजेत राहा.”
सीता: “ओ एम जी! चॉकलेट पण… अरे मी तुझ्यासाठी काहीच नाही आणलं…”
सुधीर: “चलता है… अजून तरी आपल्या संस्कृतीत पुरुष सत्ताक पद्धती आहे…”
सीता: “बावळट हे घे.” आणि तिने पर्स मधून गिफ्ट काढून दिलं.
सुधीर: “मला पण गिफ्ट…”
सुधीरने गिफ्ट खोललं. आतून ऍव्हेंजर्स ची सॉलिड की चेन निघाली.
सुधीर: “वा तुला कस कळलं मला ऍव्हेंजर्स आवडतात?”
सीता: “माझ्या बॉयफ्रेंड ला आवडायचे… त्याच्यासाठी घेतली होती… पण देण्याची संधी मिळाली नाही…”
सुधीर: “चालतय की… उदास होऊ नकोस… आयुष्य आपल्याला घुमवत राहतं… शॉक असतात तसे सरप्रायझेस पण असतात ना… मग कशाला वाईट वाटून घ्यायचं?”
सीता: “तुझ्या एव्हढी मॅच्युरिटी नाहीय माझ्याकडे.”
सुधीर: “हा हा हा माझ्या आईला सांग तिला जरा बरं वाटेल.
आणि काय”
सीता: “मी लहान होते ना……”
आणि सीता खूप बोलत राहिली… सुधीर ऐकत राहिला….
दुपार झाली तसे दोघे रेस्टॉरंट मध्ये गेले… दोघांनी मस्त चायनीज खाल्लं… सीता तेव्हाही बोलत राहिली… सुधीर ऐकत राहिला…
सीता: “चल सात वाजले मी निघते.”
सुधीर: “चाललीस…खूप बरं वाटलं तुझ्या गप्पा ऐकून… माझ्याकडे एव्हढे विषयच नसतात… खरच… एक जी एफ सोडून गेली मला मी काही जास्त बोलतच नाही म्हणून…”
सीता: “हे पण काय ब्रेकअप च कारण आहे!”
सुधीर: “लाईफ है चलता है…”
थोडी शांतता गेली.
सुधीर: “अजून एक सांगायचं होतं.”
सीता: “आता काय आय लव्ह यु बोलणार आहेस की काय”
सुधीर हसला
सुधीर: “प्रेम काय असतं मला खरंच माहीत नाही… पण हा टेड्डी माझ्या जी एफ साठी घेतला नव्हता… तीचं गिफ्ट टाकून दिलं मी कचऱ्याच्या डब्यात… तुला काय आवडेल याचा खूप विचार करून आणला मी टेड्डी… आणि तू एक्स बीएफ चं गिफ्ट मला दिलंस म्हणून पण मला वाईट वाटलेलं नाहीय…”
सीता भावनिक झाली आणि सुधीर च्या जवळ गेली… त्याने ओठ पुढे केले… सीता ला हसायला आलं.
सीता: “बावळट…” आणि तिने त्याचा चेहरा फिरवला आणि गालावर किस दिलं.
सुधीर:” बरं एव्हढं पण चालेल…”
दोघेही हसले… शेवटचं बाय करून सीता निघाली… थोडं पुढे गेल्यावर तिला आठवलं आपण सुधीर चा नंबर च घेतला नाहीय… तिने वळून बघितलं पण सुधीर कुठेच दिसत नव्हता………
वर्ष २०२१ महिना फेब्रुवारी… तारीख १४… सीताने व्हॅलेंटाईनचा मस्त प्लॅन केलेला होता… सकाळी मस्त गार्डन मध्ये जायचं तिथे भेळ खायची… मग एकटंच चायनीज खायचं… मग संध्याकाळी मस्त समुद्रावर जाऊन सूर्य मावळेपर्यंत बसायचं…
ती तयारी करत होती तितक्यात फोन वाजला… अननोन नंबर… तिने फोन उचलला…
“हॅलो आता तुला बी एफ आहे की नाही?”
सीता: “कोण बोलतंय आणि डायरेक्ट हा काय प्रश्न आहे?”
“मी सुधीर बोलतोय”
सीता: “सुधीर….अरे कसा आहेस आणि माझा नंबर कुठून मिळाला?”
सुधीर: “एफ बी वरून… जास्त मेहनत नाही पडली. सीता पवार कुणाचं नाव असतं तसंही.”
सीता: “मग कसं चाललंय?”
सुधीर: “अरे बारावी जी एफ सोडून गेली काल… म्हटलं तू आहेस का बघू…”
सीताला फार हसायला आलं.
सीता: “अरे पण काय करायचं आपण?”
सुधीर: “तुला काय करायचं?”
सीता: “सकाळी गार्डन, भेळ, दुपारी चायनीज आणि रात्री मस्त समुद्र किनारा.”
सुधीर: “डन मग हेच करू…”
सीता: “मला खरंच नाही वाटत आहे तू फोन केला आहेस.”
सुधीर: “भेटलीस की चिमटा काढतो तुला मग खरं वाटेल.”
सीता: “यू नॉटि!”
सुधीर: “काय नॉटि किस तर गालावरच देणार तू…”
सीता हसली.
सुधीर: “हसतेस म्हणजे यावेळी ओठांवर देणार वाटतं…”
सीता: “गप्प बस!”
आणि सीता हसत राहिली… दोघांचे विषय संपतच नव्हते…………