व्हाट्सऍप ग्रुप वर नुसती धमाल उडाली होती. शाळेच्या मुलींची फर्स्ट मिट… इतक्या वर्षांनी. मृणाल आणि विभावरी तर इतके बोलत होते की विचारू नका. ड्रेस कोड काय ठरवायचा, खायला कोण काय काय आणणार, कोणाचं शाळेतलं कोणतं टॉपिक चर्चेत आणायचं सगळं ठरत होतं. सगळ्या मिळून अकरा मुली स्मिता च्या घरी भेटणार होत्या. कधी गप्पांमध्ये शामिल न होणाऱ्या शांत मुलीही होत्या या मिट मध्ये म्हणून सगळ्यांना आनंद वाटत होता.
विभावरी: “सारिका तुझं नक्की झालं का?”
सारिका: “नाही ग अजून. आज संध्याकाळपर्यंत सांगते.”
विभावरी: “प्लिज जमव ग. पुन्हा कधी भेटू आपण सांगता येत नाही.”
सारिका: “हो मी येणारच आहे मोस्टली. पण आताच कन्फर्म करत नाही.”
निवेदिता: “अरे गुलाबजाम आणणार आहे का कोणी? मी गुलाबजाम आणण्याचा विचार करत होते.”
स्मिता: “अगं गुलाबजाम मी बनवतेय. तू दुसरं काहीतरी बनव.”
प्रेरीता: “अरे माझ्याकडे वन पीस नाहीय…”
मृणाल: “मग घे विकत.”
प्रेरीता: “बरं बघते. एक असलेला बरा, चेंज म्हणून.”
मृणाल: “पूर्ण एक आठवडा आहे रविवार ला अजून. व्यवस्थित तयारी करा.”
विभावरी: “अरे या हा सगळे. कुणी टांग दिली तर बघा.”
रविवारी स्मिता च्या घरी छान वातावरण झालं होतं. स्मिता चं थ्री बी एच के घर फार सुंदर सजवलं होत. सगळ्या जणी गोल खुर्ची लावून बसल्या होत्या आणि मधल्या टेबल वर खाण्या पिण्याची रेलचेल झाली होती. छान गप्पा रंगल्या होत्या. बेधुंद गप्पा, रंगतदार गप्पा, मोकळ्या आणि खोल गप्पा.
सविता: “मी या वेळेस चाळीस किलोमीटरची मॅरेथॉन करणार आहे. चौथ मेडल आणायच आहे.”
संजना: “सॉलिड आहेस तू. पंचेचाळीसव्या वर्षी मॅरेथॉन वगैरे म्हणजे सॉलिडच. आम्हाला बिल्डिंग चे जिने चढताना धाप लागते.”
रेखा: “नवरा पण तुझा फिट अँड हेल्दी असेल मग.”
सविता: “मग सोडते काय त्याला. माझ्या बरोबर त्याला फिटनेस ठेवावाच लागतो.
सगळे हसतात.”
विभावरी: “मला तर हेल्थ वगैरे मेन्टेन करणं फार कठीण. मी आणि अर्णव दोघे फुडी आहोत. आम्ही दोघे तर बाहेर खातच असतो. त्यात माझ्या ऑफिस च्या, सोसायटी च्या किटी पार्टीज. वाढलं वजन तर वाढुदे थोडं. कोण लक्ष देतंय.”
सविता:” हे बघ म्हातारपणी जाणवणार. लक्ष दे थोडं.”
स्मिता: “किटी पार्टीज म्हणजे मदिरापान तर होतंच असेल.”
सगळे हसतात.
विभावरी: “हो यार आम्ही दोघे घेतो. पण ते पिऊन तर्र होणं वगैरे नाही हा. फ्रेंड सर्कलच तसं आहे. सोशल ड्रिंकिंग इज मस्ट यु नो…”
स्मिता: “मला तर हेवा वाटतोय तुमच्या आयुष्याचा. सासू सासरे आणि दोन मुलं यांत आरशात तोंड बघायला मिळत नाही. शांत बसून प्यायला कुठे मिळणार. सगळं मीच बघते.”
विभावरी: “नवरा मदत करत नाही का.”
स्मिता: “अगं तो घरीच कुठे असतो. सारखा फिरतीवर नाहीतर घरी यायला उशीर. कधी कधी वाटतं त्याचा चेहरा पण विसरलेय मी.”
मृणाल: “मी नाही हँडल करू शकत हा फ्रस्ट्रेशन असं. नवरा रोज जवळ असून माझी वृत्ती डळमळत असते.”
सगळ्या: “ओ……..”
रेखा: “अगं काय बोलतेयस…खरच की काय.”
मृणाल: “डोन्ट टेक इट अदरवाईज हा… माझा बॉस खूप हँडसम आणि इंटलीजंट आहे. बायको वारली आहे त्याची फार वर्षांपूर्वी. आमची वेवलेंथ इतकी जुळली होती… खोटं बोलणार नाही आकर्षण झालं होतं. पण आम्ही दोघेही समजूतदार आहोत. प्रकरण पुढे नेलं नाही… ए कुणाला सांगू नका हा. पोचेल माझ्या नवऱ्या पर्यंत.”
सगळ्या हसतात.
विभावरी: “होतं ग असं. जाऊदे… जास्त विचार नाही करायचा.”
स्मिता: “अगं अक्षता कुठे गेली.”
मृणाल: “बाहेर गेली बघ बाल्कनीत. तशीही आल्यापासून एक वाक्य बोलली नाहीय ती.”
स्मिता: “का काही झालंय का?”
विभावरी: “अगं शाळेत पण आठवते ती मला. खूप शांत होती. निवडक मैत्रिणी होत्या आणि त्यांच्यात ही फार काही बोलायची नाही ती.”
रेखा: “माझं जरा वेगळं मत आहे.”
सगळ्या रेखा कडे बघायला लागतात.
रेखा गप्पच राहाते.
मृणाल: “अगं बोल ना काय मत.”
रेखा: “माझ्याच ऑफिस मध्ये आहे ना ती. तिला जरा चॅलेंजेस आहेत…म्हणजे दत्तक घेणार आहे ती आता आणि जरा फायनान्शिअल चॅलेंजेस पण आहेत. अगं सतत दुख्खी असल्यावर काय होणार.”
स्मिता: “अगं का पण दुख्खी?”
रेखा: “नवरा खूप ऑर्थोडॉक्स आहे ग. कपड्यांचं रिस्ट्रीक्षन. कुठे जाण्या येण्याला बंधन. जीन्स पण अलाउड नाहीय. सगळी कामं बाहेरची घरातली तीच करते. अजून काय काय असेल आपल्याला काय माहीत. आज पण बघ वन पीस कुठेय. सलवार कमीज सारखा पॅरलल आहे. घुसमट होणारच ना ग.”
विभावरी: “हम्म…”
अशाच गप्पा होत राहतात. खाणं संपतं आणि सगळे एकमेकांना निरोप देतात.
विभावरी: “अक्षता… तू स्टेशन ला जातेस ना. आपण दोघे एकत्र जाऊया ना.”
अक्षता: “चालेल ना.”
विभावरी आणि अक्षता रिक्षा पकडतात. थोडा वेळ जातो आणि विभावरी बोलते.
विभावरी: “अक्षता तुझ्याशी बोलायचं होतं मला. इफ यु डोन्ट माईंड.”
अक्षता: “बोल ना”
विभावरी: “मला कळलंय तुझ्या आयुष्या बद्दल.”
अक्षता प्रश्नार्थक नजरेने तिला बघते.
विभावरी: “हे बघ मी मैत्रिणच आहे तुझी. हक्काने सांगते. आयुष्य मनमोकळं जगण्यासाठी आहे. काही गरज नाहीय कुणासाठी घुसमटत राहायची. तुला काही मुलांची अडचणही नाहीय. आजकाल काही राहिलं नाहीय. सरळ घटस्फोट घे.”
अक्षता हसायला लागते.
अक्षता: “तुला काय सांगितलं कुणी…”
विभावरी: “मला कळलंय तू फार बंधनात घुसमटून जगतेयस. हसू नकोस उगाच.”
अक्षता: “विभावरी! डोक्यावर अक्षता पडतात ना तेव्हा एका गुलाबी बंधनाची माळ आपण स्वतःहून गळ्यात घालून घेतो. आमचं अख्ख कुटुंब मला मानतं आणि आदराने वागावतं. आणि याचं श्रेय फक्त यांना जातं. सगळ्यांच्या पुढ्यात माझी बाजू ठामपणे ते मांडतात ना तेव्हा मी त्यांना आपसूकच शरण जाते. सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये ते मला कधीही आरोपी न ठरवता भक्कम आधार देतात ना, तेव्हा माझ्यात असं बळ येतं की मी अख्ख कुटुंब एकटी सावरू शकते. मी त्यांच्या समोर मनमोकळं बोलू शकते आणि मला दुसऱ्या कोणत्या मैत्रीची गरज पडत नाही. आपलं परकं न करता प्रत्येकाला समजून घेतात आणि सगळ्यांच्या मदतीला जातात. मुल न होण्याचं नक्की कारण न कळल्यावर माझ्या कुटुंबासमोर ‘उणीव माझ्यात ही असू शकते’ असं बोलून मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला तेव्हा मी पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमात ओथंबून गहिवरून गेले. त्यांच्या मना सारखं वागणं हा माझा त्याग असेल तर त्यांच्या सारखा नवरा मिळणं हे माझं अपरंपार भाग्य आहे…”
विभावरी च्या चेहऱ्यावर शांत हसू पसरतं. ती अक्षता च्या गालावर प्रेमाने हाथ ठेवते आणि म्हणते
“अक्षता तू खूप नशीबवान आहेस.”