शालिनी अंगणात जास्वंदीच्या फुलाला अलगद कुरवाळत होती. बाबांना कळायचं नाही इतका वेळ त्या फुलांसोबत ती काय करत असते. त्यांना तर इतका वेळ स्वतःच्या बायको बरोबर घालवायलाही जमत नसे. लोकं बोलायचे, तुम्ही शालिनीला शिकवायला पाहिजे होतं स्वतःसारखं, काहीही करून. पण शालिनीला जबरदस्ती शाळेत पाठवून तिच्या मनावर ओरखडे पाडायचे नव्हते त्यांना. नाशिक मधल्या प्रसिद्ध नंबर एक च्या शाळेत तर घालू शकत होते ते तिला पण स्वतःच आयुष्य तर तिलाच घडवावं लागणार होतं. पटापट लिहिता येत नाही, अक्षर खूप घाणेरडं आहे, गोष्टी डोक्यात शिरत नाहीत म्हणून शिक्षक चिडलेले आणि शाळेतली मुलं सतत चिडवणारी. दिसायलाही सामान्य. कुणाच्या लक्षात यावं असं काहीच नाही. पण सामान्य माणसासारखं जगता आलं असतं तरी तिला चाललं असतं. पण बुद्धीमत्ता साथ देईना. तिच्या डोक्यात जसा जगातला व्यवहारीपणा शिरत नव्हता तसं गणितही शिरत नव्हतं आणि इतिहासही शिरत नव्हता. त्यातून कमालीची अबोल. शाळेत कुणी चिडवलं तरी कुणाचं नाव घेऊन तक्रार नाही. चिडवलं म्हणून सांगून हमसाहमशी रडायची फक्त. राग फार कमी, दुःख जास्त. अनेक वर्ष एक इयत्ता करत ती कशी बशी काही वर्ष शिकली. पण तिचा मानसिक त्रास आणि तिचा वाढत जाणारा अबोला बाबांना दिसत होता. कधी कधी बाबांसमोर लोकं बोलायची, तुमची मुलगी तुमच्यावर अजिबात नाही गेली. बिचारी… वगैरे वगैरे. पण तिला असं तुलनेच्या मापात तोलून तिच्यावर तोंडादेखत शेरे ओढणाऱ्यांनाही ती जणू काही समजून घ्यायला लागली होती.
पण ती अंगणात मात्र हरवून जाऊन रमायची. अंगण साफ करणं, शिंपणं, फुलझाडं लावणं, नवीन नवीन फुलं शोधून ती रोपवणं हे ती सातत्याने करत आली. ती माणसांपासून दूर आणि फुलांना जवळ जवळ होत चालली होती. कदाचित यासाठी, की ती फुलांवर प्रेम करू शकत होती. ती फुलं तिला तोलत मोलत नव्हती. तिच्या बद्दल बोलत नव्हती. निरपेक्ष निस्वार्थ होती ती. ती त्या अंगणाची होती आणि अंगण तिचं होतं.
मग बाबांनी ठरवून तिला छान नर्सरी काढून दिली. स्वतः अभ्यास करून तिला सगळं शिकवलं. तिने विविध रोपं वाढवून विकायला सुरुवात केली. आजूबाजूच्या अनेक बंगल्यातील अंगण तिने सुशोभित केलं. तिच्या मावस भावाकडे अनेक कल्पना होत्या तिचा बिझनेस वाढवायच्या आणि तिला नवीन नवीन शिकवायच्या. ती स्वतःच्या अंगणात रमून गेली.
पण वयाच्या बावीसाव्या वर्षी सुध्दा तीचं असं जास्वंदात रमून जाणं बाबांना काही रुचत नव्हतं. त्यांनी तिच्या लग्नाचे प्रयत्न चालू केले होते. आज संध्याकाळी येतील राऊत. निरव राउत फार श्रीमंत नव्हता, पण सरळ आणि सालस माणूस म्हणून त्याला सगळे ओळखायचे. मुलाच्या अपेक्षांमध्ये शालिनी बसत होती. फोटो पसंती, पत्रिका जुळणीही व्यवस्थित झाली होती. पावसाच्या आगमनाने हवा धुंद व्हावी तसं बाबांचं मन धुंद झालं होतं. आता हे जुळुनच येईल असं कुटुंबातल्या प्रत्येकाला वाटत होतं.
संध्याकाळी घरात फार लगबग होती. शालिनीची आत्त्या आणि मावशी दोघी पण आल्या होत्या. शालिनीने कसं वागावं पाहुण्यांसमोर याचं व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जात होतं. आणि आत्त्या ने तोंडाचा पट्टा सोडला होता. “हे जुळून आलं ना की खरं शालिनीचं आयुष्य मार्गी लागेल. नाहीतर त्या अंगणातल्या मातीतच मिळालं होतं. नशीब त्या मुलाने बाकी पसंत केलंय. आजकाल फार अपेक्षा असतात हो मुलांच्या. पैसे कमावणारी अप्सरेसारखी कामवाली बाई हवी असते आमच्या मुंबईतल्या पोरांना तर. आणि मुलींचीही नाटकं काही कमी नाही. शालू तुला जे पदरात पडेल ते गोड मानून घे. सहनशील बनून राहा कळलं का…” शालिनी आरशासमोर तयार होत होती. तितक्यात बाबा आत आले. शालिनीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले “छान! कृत्रिम दिसण्याचा प्रयत्न नाही केलास ते. आपल्याला चेहऱ्यावर भाळणारा जावई नकोच आहे.”
मुलाकडचे आले. शालिनी शयन घराच्या पडद्या आडून बघत होती. तिचे श्वास उंचावले होते. नवीन नात्याच्या थंड शिडकाव्याने तिला ताजंतवानं बनवलं होतं. मध्यस्थ कांबळे काकूंनी सांगितलं होतं, मुलगा माहिती ऐकून आणि फोटो पाहून ‘मला अशीच मुलगी हवी’ म्हणाला होता. हे ऐकताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव नक्षीदार बनताना बाबांनी पाहिले होते.
ती चहा नाश्ता घेऊन बाहेर गेली… ती आत आली तेव्हा तिला फक्त आठवत होती एकमेकांशी हलकेच झालेली नजरानजर… आणि त्या नजरांत असणारा संपूर्ण स्वीकार. बाबांनी म्हटलं, एकमेकांशी पुरती ओळख होऊ दे. एकमेकांना नीट जाणू दे. मग होऊ दे लग्न. सगळ्यांनी समजून घेतलं.
तो जून महिना होता. मनासारखा पाऊस सुरू झाला होता. शालिनी आणि निरव पहिल्यांदा भेटत होते गावा बाहेरच्या ओढ्यावर. अस्वस्थ शांततेत बसलेलं असताना दोघांनाही कळत नव्हतं कशी सुरुवात करायची.
निरव: “मी ऐकलं तू फार बोलत नाहीस!”
शालिनी: “बोलते आई बाबांशी. मनापासून बोलायला मनाला भिडणारं माणूसही हवं ना.”
निरव: “वा! तू तर सुंदर बोलतेस.”
शालिनी हलकसं हसली.
शालिनी: “तुम्ही मला कसं पसंत केलं?”
निरव: “म्हणजे? हा काय प्रश्न आहे? खरं तर हा प्रश्न का आहे? एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू आपल्याला का आवडते याचं वर्णन करू शकतो. जसं मी सांगू शकतो तुझा हलकासा गव्हाळ रंग माझ्या मनाला खुलवतो. सांगू शकतो… तुझे निरागस गूढ डोळे मला खेचून घेतात. तुझा अबोल भाबडा स्वभाव मला हेलावून टाकतो. खूप बोलू शकतो. पण एखादी गोष्ट आपल्याला आपोआप आवडलेली असते. खरोखर काही माहीत नसतं. बस आवडतं आपल्याला… खूप आवडतं…”
आणि निरवने शालिनीच्या दुसऱ्या हातात अजून अडकवून ठेवलेल्या हातावर अलगत हात ठेवला. पहिल्या प्रेमाच्या पहिल्या स्पर्शाने शालिनी मोहक झाली. तिच्या मनात फुलंही दरवळायला लागली आणि चांदण्याही लखलखू लागल्या. निरवने तिला जवळ घेतलं आणि तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. कितीतरी वेळ असाच गेला. एकमेकांत गुंतण्याचा आणि एकमेकांना जपण्याचा पहिला वाहिला क्षण, ज्याला शब्द पकडू शकतात पण आहे तसं कधीच व्यक्त करू शकत नाहीत…
शालिनी आणि निरवच्या आयुष्यात असे अनेक क्षण येत राहिले. असे आणि यापेक्षाही उत्कट!!!
अशीच एकदा दोघं गावातल्या देवळात गेली होती. शालिनीने घंटा वाजवली व देवाला नमस्कार करून तीने प्रार्थना करायला डोळे मिटले. तिला पटकन वाटलं, निरव तिच्याकडे बघत राहिलाय. तिने निरव कडे पाहिलं. निरव हाताची घडी घालून तिच्याकडे बघत होता.
शालिनी: “प्रार्थना नाही करत?”
निरव: “मला तू मिळालीस अजून काय हवं!”
शालिनी मनापासून हसली.
निरव: “तुही माझ्यासाठी काही मागू नकोस.”
शालिनी: “का?”
निरव: “मी फक्त तुझ्यासाठी बनलो आहे. बाकी माझं काही अस्तित्व नाही.”
शालिनी ने हसून त्याला प्रेमाने कवटाळलं.
अंगणात बसली होती दोघं. घरात कुणीच नव्हतं. निरव ने तिचा हात हातात घेतला.
निरव: “थांब मी तुला तुझं भविष्य सांगतो.”
शालिनी: “भविष्य कळतं तुम्हाला?”
निरव: “मग… बघच आता. ही रेषा इथून इथे सरळ जाते. म्हणजे तुला देखणा प्रामाणिक आदर्श नवरा लवकरच मिळणार आहे.”
शालिनी हसायला लागली.
निरव: “बघ ह्या इथे फुल्या आहेत. म्हणजे तू खूप प्रेमळ हळवी आहेस.”
शालिनी: “हो का!”
निरव: “आणि ही बाजूची छोटी रेषा… म्हणजे तुला एक बाळ असेल.”
शालिनी: “हे पण कळलं तुम्हाला!”
निरव: “मग काय! बाळ तर असणारच! एकच बस ना की जास्त करूया?”
शालिनी: “बाई! जास्त काय!”
ती हसायला लागली
निरव: “अगं आपलं अंगण भरलेलं राहील!”
एक दिवस ओढ्याच्या काठी
निरव: “तुला काय आवडेल सुट्टीच्या दिवशी? बाहेर नातेवाईकांकडे फिरायला की घरातंच कामं करत एकमेकांसोबत राहायला?”
शालिनी: “तुमच्या सोबत काहीही चालेल.”
निरव: “मी ऑफिस मधून उशिरा घरी येईन कधी कधी. तू काम करून दमलेली असशील. मग मी अलगद तुझा हात हातात घेईन. आणि तू सगळे श्रम, त्रास विसरून जाशील. दुसऱ्या दिवशी मी काही करून लवकर घरी येईन. तुला खूप मदत करेन. थकूच देणार नाही.”
शालिनी तिच्या अंगणातल्या फुलांसारखी फुलत होती. बाबा तिला “जगताना” बघत होते आणि निश्चिन्त पावत होते. आठ महिन्यांनी साखरपुडा झाला. दोघांनी अंगठीच्या रूपाने आयुष्याचा भाग एकमेकांना सुपूर्त केला.
एक दिवस शालिनी घाईघाईत आईकडे आली.
शालिनी: “आई ही गाठ बघ कसली…”
शालिनी च्या उजव्या वक्ष स्थळावर लागणारी टणक गाठ जाणवून आईला खरं तर भीती वाटली होती. पण ती म्हणाली
“बायकांना अशा गाठी येतात. पण आपण डॉक्टरांना दाखवून घेऊ.”
शालिनीने या किरकोळ गाठीबद्दल निरवला काही सांगितलं नव्हतं अजून. डॉक्टरांनी सांगितलेले सगळे सोपस्कार झाले.
एक दिवस शालिनी कामं आटपून निरवला भेटायला निघत होती. तितक्यात बाबा दारातून आत आले. बाबा फार गंभीर दिसत होते. शालिनी बाबांकडे बघत राहिली. बाबांनी पिशवीतले रिपोर्ट्स काढले. “बेटा… घाबरू नकोस. रडू तर मुळीच नको… कॅन्सर आहे रिपोर्ट मध्ये.” शालिनीचे डोळे ताणले गेले. एक क्षण तिला काहीच कळलं नाही…. निरवचा निरागस चेहरा तिच्या डोळ्यांसमोर तरळत होता फक्त. तिने ताबडतोप निरवला फोन लावला.
निरव: “अगं येत आहेस ना. फोन कशाला केला.”
शालिनी: “नीट ऐका… मला कॅन्सर आहे.”
पलीकडे थोडा वेळ शांतता गेली.
निरव: “काय बोलतेयस?”
शालिनी: “हो. एक गाठ होती पुढे. तिचे रिपोर्ट्स आले आहेत. मला कॅन्सर आहे.”
अजून खूप वेळ शांतता गेली. निरव च्या आवाजात कंप आला.
निरव: “बघू आपण काय ते. मी तुला एकटं सोडणार नाही.”
शालिनी: “आणि तुमचे आई बाबा…”
निरव भांबावला
निरव: “मला माहित नाही ग… मला खरच माहीत नाही.”
शालिनीने आवेगाने फोन ठेवून दिला.
डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन, सहा किमो, एकवीस दिवस रेडिएशन करावं लागेल. अशा प्रकारचा कॅन्सर होता की हॉर्मोन्स चे इंजेक्शन पाच वर्ष घ्यावे लागतील. आणि शालिनीने गरोदर तर राहूच नये. परत कॅन्सर होऊ शकेल. शालिनीच्या डोळ्यात पाणी तरळताना बाबांनी पाहिलं. आणि ते तिने शिताफीने मागे परतून लावलं हेही बाबांना जाणवलं. उपचार लवकरात लवकर घेणं गरजेचं होतं. शालिनी निरवच्या भेटीगाठी, बोलणं बंद झालं होतं. शालिनी रोजचा दिनक्रम व्यवस्थित करत होती. पण तिचे लाल झालेले डोळे लपत नव्हते. तिला रडताना समजवायला जायची हिम्मत बाबांमध्ये नव्हती.
त्या दिवशी निरवच्या घरची सगळी मंडळी आणि निरव शालिनी च्या घरी आले होते. शालिनीचेही नातेवाईक आले होते.
राऊत: “फार वाईट झालं”
शालिनी ची आई स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. शालिनी एका कोपऱ्यात उभी होती.
राऊत: “आम्हाला खरंच कळत नाहीय. पण हे कसं करायचं… सगळंच कठीण…”
बाबा उठले आणि टेबलवरची अंगठी घेऊन आले.
बाबा: “ही घ्या अंगठी.” आणि त्यांनी मनःपूर्वक हाथ जोडले. निरव चे दाबलेले हुंदके शालिनी च्या कानावर पडले पण शालिनी निश्चल, निर्विकार राहिली. दूरचा एक नातेवाईक थोड्या वेळात उठला. निघावं तर लागणार होतं. निरवने भरल्या डोळ्यांनी शालिनी च्या वडिलांची माफी मागितली. शालिनी कडे बघण्याची पण हिम्मत नव्हती त्याला.
सगळे निघून गेले. शालिनी ची आत्त्या पुढे आली. “जाऊदे ग बेटा. नशीब! दुसरं काय. तू बिलकुल धीर सोडू नकोस. अग अर्धा पेला भरलेला असतो नेहमी.”
शालिनी हसली. म्हणाली,
“कसला पेला? कुठे आहे? कुणी पाहिला?” शालिनीने बाबांकडे पाहून निश्वास सोडून मोकळं स्मित दिलं. कोपऱ्यातला झाडू उचलला. आणि अंगणात जाऊन केर काढायला लागली. अनेक महिने तिने अंगणात पूर्ण वेळ दिला नव्हता. झाडून झाल्यावर ती जास्वंदीच्या फुलांजवळ गेली आणि त्यांना गोंजारू लागली. बाबा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले आणि त्यांच्या डोक्यात विचार आले.
‘इतकी शांत आणि परिपूर्ण आहे शालिनी. कदाचित निरवच्या सुंदर आठवणींची फुलं तिने मनाच्या अंगणात जपून ठेवलीत. जी फक्त आणि फक्त तिची आहेत. तिने कटू दुःखी विचारांचा केर कचरा साफ करून टाकलाय. कदाचित नवी फुलं फुलतीलही. पण तिचं अंगण फक्त तिचं आहे. त्या अंगणाचा बगीचा करण्याचं सामर्थ्य एकवटून ती समृद्ध झालीय…’