पाऊस प्रत्येकाचा असतो आणि प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो… पाऊस ही एक गरज… कुणासाठी मानसिकही…
उदासीच्या कोपऱ्यात रुसून बसलेलं कुणी एक कवीमन अचानक येणाऱ्या पहिल्या पावसात न्हाऊन निघतं आणि आयुष्यात काहीच नसलं तरी ते सुंदर आहे याची अनुभूती देऊन जातं…
अचानक येतो पाऊस… आणि मोबाईल, पर्स… अशा व्यवहारीक गुंत्यात गुंतून बसलेल्या मनाला प्रसन्न की जबाबदार या द्विधा मनस्थितीत घर गाठावं लागतं…
बेदरकार तारुण्यात उसळणारी कॉलेजची मुलं, असलेली छत्रीही न उघडून मुक्तपणे पावसात गहिवरून निघतात… कुणाचं हे जिवंतपण आयुष्यभर राहतं आणि अनेक पावसाळे त्यांचं आयुष्य समृदध करत राहतात…
अनेक पावसाळे पाहिलेलं कुणी वृद्ध मन पावसाच्या सरीबरोबर पिंजून निघतं आणि बऱ्या वाईट आठवणींच्या खेळात डोळ्यांच्या कडा ओलावून जातं…
असेही असतील… इतके व्यग्र… कि आयुष्याच्या दिनक्रमात पाऊस एक घटना फक्त… पण गरज म्हणून आयुष्याचा एक अविभाज्य भाग…
कुणा भावनाशील मनाला पाऊस फक्त खिडकीत बसून बघायचा असतो.. पाऊस अतःमनात जावा आणि मन फुलून यावं अशी माफक अपेक्षा…
बालपणाच्या निरागसतेतून पावसाला एकच अर्थ… मज्जा!… आयुष्य या मोठ्या मज्जेतला पाऊस हा एक सुंदर भाग!
प्रेमात पडलेल्या युगुलांसाठी पाऊस म्हणजे एक अदभुतरम्य अनुभव… एकत्र भिजणं आणि भिजून एकत्र येणं…
कधी नशिबाच्या फेऱ्याप्रमाणे पाऊसही रौद्र रूप धारण करतो… आणि मग तो आहे आणि आपण आहोत!!! कसाही असला तरी हवाहवासा वाटणारा पाऊस… आपल्या प्रेमाच्या माणसासारखा!
तुमचं पावसाशी काय नातं आहे? कारण पाऊस प्रत्येकाचा असतो आणि प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो…