लहानपणापासून गणपती म्हणजे देव अशी समजूत झाली. पण मोठे होता होता समजुतीत भगदाडं सापडली. देव आहे तर सगळे सुखी का नाही? देव आहे तर वाईट गोष्टी का होतात? देव आहे तर अस का तसं का? शास्त्राने प्रगती केली आणि अनेक चमत्कारांचे गूढ उकलल. माणूस शक्तिशाली प्राणी बनला. आणि कधी सवयीमुळे कधी कारणामुळे नतमस्तक व्हायचे ते क्षण दुरावले. देव देव्हाऱ्यात नाही ही दृढ समजूत बनली.
तरीही कधी कधी माणसाचे प्रयत्न जुळून येतात, कधी थिटे पडतात. आपण केलेला कठीण प्रश्नच पेपर मध्ये येतो. ते सुयोग्य पुस्तक आपल्यालाच दिसत. आपण पाठ केलेलाच भाग येतो. आपल्याला हवी तशी नोकरी मिळते. आपल्याला लॉटरी लागते, शेअर्स लागतात. या सर्वस्वी नशिबाच्या गोष्टी. आपल्या मेंदूवरच्या वळ्यांनी केलेल्या अद्भुत कलाकृती आपल्या हाताबाहेरच्या. अशा असंख्य गोष्टींची वीण आपल आयुष्य बांधून असते आणि सोहम आहे का असा प्रश्न पडतो.
सगळं कसं व्यवस्थित चाललं आहे. पैशाची कमतरता नाही. ऑफिस सुरळीत, घर सुखासीन.. आनंदाची काही उणीव नाही आणि नकळत माझे हात देव्हाऱ्यासमोर जोडले जातात. कृतज्ञतेने… देव देव्हाऱ्यात नसेल किंवा देव नसेलच मुळी … पण आपल्या पलीकडे गोष्टी घडत राहतात आणि प्रश्न पडतो “देव देव्हाऱ्यात नाही ?” आणि कृतज्ञतेने मन भरून आलं कि मी देव्हाऱ्यापुढे नतमस्तक होते आणि एखाद्या अद्भुत शक्तीला वंदन करते…