banner for marathi story virgin
Marathi Short Stories

व्हर्जीन

दरवाजा आवेशात उघडला आणि ते दोघे एकमेकांना बिलगून बेडरूम मध्ये शिरले. त्याच्या मजबूत घट्ट मिठीत तिच्या श्वासांची लय उत्तेजित होत होती. त्याच्या पिळदार बाहूंत तिने स्वतःला विरघळून टाकलं. त्याने तिला उचलून बिछान्यावर फुलासारखं अलगद झोपवलं आणि तो तिला बिलगला. ओठांना ओठांची भेट घडणार… तितक्यात टेबल वरच्या पर्स मधला फोन वाजायला लागला. मेघाचं लक्ष फोन कडे गेलं. बाईचा टाईप बघून सर्विस द्यायची हे राज चं सूत्र होतं. तो कुठल्याही प्रकारच्या स्त्रीला संतुष्ट करण्यात तरबेज होता. राज तरी त्याचं खरं नाव कुठे होतं म्हणा… पण राज की करण की अर्जुन काय फरक पडतो? व्हॉट मॅटर्स इज क्वालिटी ऑफ सर्विस! त्याने प्रेमाने मेघा चा चेहरा स्वतःकडे वळवला… पण मेघाचं लक्ष लागेना.

मेघा: “महत्वाचा फोन असू शकतो… फक्त एक मिनिट…”

आणि त्याने तिला मिठीतून मोकळं केलं.

राज: “अशी थांबून थांबून गाडी ठेसनात पोचत नाय!”

राज देखणा असला तरी त्याने तोंड उघडलं की तिचे सेक्स सर्विस घ्यायचे विचार उलटे फिरायचे.

तिने पर्स मधून फोन काढला आणि उचलून बोलायला सुरुवात केली.

मेघा: “येस सर! आय ऍम वर्किंग ऑन युअर प्रोजेक्ट ओन्ली सर!! नो अदर प्रोजेक्ट… ओह्ह!! आय विल इमिजिएटली लूक इन टू द मॅटर सर… डोन्ट वरी सर, यु विल गेट बेस्ट ऑफ द बेस्ट सर्विस!!!! ओके सर ओके…”

मेघाने फोन ठेवला आणि पळत भिंतीला टेकून ठेवलेल्या लॅपटॉप बॅग कडे गेली. लॅपटॉप बॅग उघडून तिने लॅपटॉप चालू करून टेबल वर ठेवला आणि कामात गढून गेली.

राज गुडघ्यावर कोपर आणि तळव्यावर डोकं टेकवून संत्रस्त अवस्थेत बसला.

राज: “ओ बाई!!”

मेघा: “शी बाई काय!!”

राज: “म काय ताई म्हणू!”

राज ओंगळ हसला! मेघाने त्याच्याकडे वैतागून पाहिलं.

राज उखडला.

राज: “मी फुल पेमेंट घेनार हा!!!”

मेघा अजून वैतागली.

मेघा: “एक काम कर ना! घे तुझे पैसे आणि निघून जा.”

मेघा पर्सकडे वळली.

राज: “ओ बाई!! फुकटचे पैसे नाय घेत आपण!”

मेघा: “वा!!! काय पण नीतिमत्ता! मला काम करू दे आधी कळलं.”

घड्याळ टिक टिक करत राहिलं…

राज बसल्या बसल्या डुलक्या घ्यायला लागला आणि झोपेत तो शेजारच्या टेबल वरच्या फुलदाणी वर कलंडला. फुलदाणी पडून फुटली आणि झालेल्या जोरदार आवाजाने मेघा दचकली आणि वैतागली

मेघा: “काय चाललंय काय!”

राज: “जरा झोप लागली… मॅडम माझ्या पेमेंट मधून कापून घ्या काय ते. टेन्शन नाय!”

मेघाने डोक्यावर हाथ मारला आणि पुन्हा लॅपटॉप कडे वळून कामात मग्न झाली.

टिक टिक घड्याळ वाजत राहिलं.

मेघाने आपलं काम संपवलं आणि फोन लावला.

मेघा: “हॅलो. आय हॅव फिक्स्ड इट सर!! एव्हरीथिंग इज परफेक्ट नाउ. येस सर… येस सर… डेफिनाइटली सर… ओके… ओके…”

मेघाने फोन आणि लॅपटॉप बंद केला आणि बिछान्यावर राज बसलेल्याच्या दुसऱ्या बाजूला डोळे बंद करून डोक्यावर हाथ आडवा ठेवून कलंडली. राज लगेच हळू हळू जवळ यायला लागला आणि त्याने तिला गुढग्यावर बसून दोन्ही हातांनी पकडलं. मेघा दचकून किंचाळली…

राज: “अरे मीच हाय! तुमच्या हक्काचा… फुल पेमेंट देणार हाय तुम्ही.”

मेघा घाई घाईत उठून बसली आणि राज ला ओरडायला लागली.

मेघा: “तिकडे बस आधी!!!! बस तिकडे!!!! तू पैसे घेऊन जा आता. नाहीतर खुद्दार असशील इतका तर न घेता जा. मला आता जमणार नाही.”

राज: “असं काय करताय… मी जमवतो ना सगळं…”

म्हणत परत जवळ यायला लागला.

मेघा: “ए!!! खबरदार!! बस तिकडे!! बस”

राज: “मग बोलावलतच कशाला मला!!”

मेघा विचारात पडली… तिने सुस्कारा सोडला.

राज: “बरं मी डील पेंडिंग ठेवतो. तुम्ही मूड असल तवा बोलवा आणि पैसे द्या!”

मेघाला त्याचं हसूच आलं.

मग तिने कुस्सित हावभाव दिले आणि स्वतःशीच बोलली.

मेघा: “मूड असलाच तरी इच्छा असायला हवी ना… आतून आवाज येतो जाऊदे नको दुनियादारी आणि नको ते शरीराची गरज भागवण्यासाठी लाचार होणं…

राज: “आतून!!! कुटून??”

मेघाला आता खरंच हसायला आलं.

मेघा: “जाऊदे… तू नको लोड घेऊस. तुझं काय रोजचंच आहे. तू वेगळं मटेरियल आहेस. तुझ मन कधीतरी काहीतरी बोलत असेल का!”

राज: “मी फकस्त तोंडातून बोलतो!”

मेघाने अतिशय तुच्छतेने त्याच्याकडे पाहिलं.

राज रागावला.

राज: “बाई!! असं बघू नका हा माझ्याकडे! जशा तुमि त्या गावच्याच नाय…”

मेघा चिडली.

मेघा: “नाहीच आहे मी… त्या गावची…”

राज ने डोळे मोठे करून तिच्याकडे बघितलं.

मेघाने विचित्र हावभाव दिले. 

मेघा: “आय ऍम व्हर्जिन…”

राजने आशचर्याने तिच्याकडे पाहिलं.

राज: “चाळीशी पर्यंत…”

मग तो मिश्किल झाला.

राज: “कोणता योगा करता… ते आपलं… बॅलन्स ठेवायला…”

आणि हसला

मेघा: “गप्प बस!!”

मेघा उठून खिडकीकडे गेली आणि तिने खिडकी उघडली. बाहेर सगळं शांतच होतं. थोड्या वेळ शांतता गेली.

राज: “एक विचारू का?”

मेघाने फक्त त्याच्याकडे वळून पाहिलं.

राज: “प्रेम बीम झालं नाय तुमचं?”

मेघा बिछान्यावर येऊन बसली.

मेघा: “झालं होतं.”

राज: “म… बिछान्या पर्यंत नाही गेलं का?”

मेघाने  तिरकस नजरेने त्याच्याकडे बघितलं आणि उफाळून आली.

मेघा: “नाही… मी जाऊ दिलं नाही. प्रेम ना एक स्वार्थी भावना आहे. प्रेम माणूस स्वतःच्या गरजा भागवायला करतं. त्यात समोरच्या साठी तसं तर काहीच नसतं. म्हणजे मनाप्रमाणे सगळं झालं तर प्रेम… नाहीतर नुसतं फ्रस्ट्रेशन!! प्रेम नव्हतं चुका होत्या फक्त चुका… मला नाही माहीत काय असत प्रेम.”

राज: “म गरजा असतात तर गरजा तरी भागवून घ्यायच्या ना!”

मेघा: “नाही वाटलं मला तसं… आणि खरं सांगू आताही नाही वाटत.”

तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने डोळे पुसले.

राज: “काय कळत नाय बाई तुमचं!… मग येवडा खटाटोप कशासाठी? म्हणजे माज्या नुकसानीच काय नाय… पण तरी कशासाठी?”

फ्लॅशबॅक.

मेघा खंडाळ्यात नयनरम्य ठिकाणी झाडाला टेकून बसलेली होती. तिच्या बाजूला होती तिची शाळेतली जीवश्च कंठश्च मैत्रीण स्वरा.

स्वरा: “वाटतच नाही ना! इतकी वर्ष मध्ये गेली आहेत म्हणून. आणि तू तर एकदम तशीच दिसतेस अजून.”

मेघाने तिला प्रेमाने कवटाळलं.

स्वराने तिला जवळ घेतलं.

स्वरा: “एक विचारू?”

मेघा: “विचार ना.”

स्वरा: “तुला वाटत नाही… कुणी असावं प्रेम करणारं… काळजी घेणारं… ऐकणारं… समजून घेणारं…”

मेघा: “नाही… कारण तसं कुणी असतं यावर माझा विश्वासच नाहीय. आणि तुला माहीत आहे माझा स्वभाव. मला नाही जमत मनाविरुद्ध वागायला. तुम्ही लग्न वाले लोक ना खूप तडजोड करता. किंवा जाऊदे… तुम्ही नशीबवान आहात असं म्हणूया. पण जे माझ्यासाठी नाही होत त्याचा कशाला मी विचार करू? मी स्वीकारलंय. मी एकटी मजेत राहाते. मला माझं आयुष्य खूप छान वाटतं. एक कणही खंत नाहीय मला.”

स्वराने तिच्याकडे शंकापूर्ण नजरेने बघितलं.

मेघा: “असं नको बघूस माझ्याकडे… ठेवायचा असेल तर विश्वास ठेव नाहीतर सोडून दे.”

स्वरा: “आठवण नाही येत विराज ची? तुमचे इंटेन्स क्षण…”

मेघा: “हम्म… इंटेन्स क्षण… वादाचे…”

स्वराने गंभीरपणे मेघाचा हाथ पकडला.

स्वरा: “सेक्स च काय?”

मेघा: “मी खोटं नाही बोलणार… वाटतं कधी कधी… पण भावना वीरूनही जातात दुःखात… प्रेम न मिळाल्याच्या दुःखात. मला नाही माहीत काय असतं सेक्स.”

स्वरा: “म्हणजे”

मेघा: “मी व्हर्जिन आहे.”

स्वरा: “काय!!!! तू खरं सांगतेयस???”

मेघा: “एव्हढं काय ओरडतेयस?? होते मी फिजिकल नाही असं नाही. पण तेव्हढं नाही.”

स्वरा: “कसा केलास कंट्रोल?? तू तर जाऊदे त्याने कसा केला?”

मेघा चिडली

मेघा: “जा त्याला जाऊन विचार. मी त्याला एकट्याने भेटलेच नाही. मला शंकाच होती. हा जाणार सोडून मला…”

स्वरा: “अगं वेडी… मजा तरी करून घ्यायची.”

मेघाने विचित्रपणे स्वराकडे बघितलं.

मेघा: “मजा काय मजा!”

स्वरा: “तुला माहीत नाही तू काय मिस करतेयस… एव्हढी बावळट असशील असं वाटलं नव्हतं… तू तर जगतच नाहीस… इन फॅक्ट तू जिवंतच नाहीस… मेलेली आहेस तू मेलेली… म्हणून तुला कशानेच काही फरक पडत नाही.”

मेघा वैतागली आणि उठून गेली…

राज ती हे सांगताना गालावर हाथ टेकून ऐकत होता.

राज: “हम्म… हे बघा बाई. मला फार काय कळत नाय तुमच्या सारक आनि मी विचार करून डोक्याला शॉट पन लावून घेत नाय. मला पन बोलनारे खूप लोक हायेत… तू हे काय करतोस… कसं करतोस… म्हंजी मला वापरनार्या बाया बी मला मान देत नाहीत. पन तुमाला सांगतो… बिंधास्त सांगतो मला काय बी फरक पडत नाय. असे पैशे इतक्या कमी वेळात कुटं मिळणार? लोकं काय करतात माझं? कि त्यांचा इचार करू? आनि त्यांच खरं मानू? माजं आयुष्य माजं हाय… आनि मी हवं तसं जगणारं काय??  राज!! नाम तो सुना होगा!!”

मेघाला हसायला आलं.

मेघा: “डोकं आहे तुला थोडं…”

राज: “मॅडम इन्सुलेट करू नका….”

मेघा मनापासून हसली.

राज: “मी जातो आता. गरज पडली तर आपल्यालाच बोलवायचं.”

मेघा त्याला दारापर्यंत पोचवायला गेली.  दार बंद केलं आणि दाराला पाठ टेकवून डोळे बंद करून सुटकेचा निःश्वास टाकला. तिच्या बंद डोळ्यात शांतताहि असते आणि निर्धार सुद्धा. वेगळं आणि हवं तसं जगण्याचा.

मेघा ऑफिस मध्ये होती. लंच टाइम चालू होता. तिच्या मैत्रिणीने तिला हळू आवाजात विचारलं. “फ्री-लान्सिंग च्या प्रोजेक्ट चे पैसे मिळाले का?”

मेघा: “हो सुरुवातीचं पेमेंट केलं.”

मैत्रीण: “आणि त्याचं काय झालं?”

तिने डोळा मारला.

मैत्रीण: “मला वाटलं आल्या आल्या सांगशील… अबाऊट एक्स्टसी!!!!”

मेघा: “ते रद्द केलं मी.”

मैत्रीण: “का???”

मेघा: “मला नवीन तंत्र सापडलंय. स्पिरिच्युअल सेक्स!!!”

मैत्रीण: “कसलं? ए मला पण दे लिंक… बघू तरी काय असत…”

मेघा हसली.

मेघा: “बावळट… लिंक कसली लिंक… डब्बा खा डब्बा…”

मैत्रीण: “अअअअ काय बोलतेयस सांग ना” मेघाने डोक्यावर हात मारला आणि ती हसत राहिली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *